मँचेस्टर: साधारणतः ११ वर्षांपूर्वी मलेशियाच्या क्वालालांपुरला दोन युवा कर्णधार आयसीसी अंडर-१९ विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत एकमेकांना भिडले होते. संघ होते भारत आणि न्यूझीलंड. भारतीय संघाचं नेतृत्व करत होता विराट कोहली तर न्यूझीलंडची कमान होती केन विल्यम्सनकडे होती. उद्या (दि. ९ जुलै) रोजी हेच दोन संघ, हेच दोन कप्तान आणखी एका आयसीसीच्या उपांत्य फेरीत एकमेकांना टक्कर देण्यास उतरतील ते मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानात. हा योगायोग म्हणा किंवा आणखी काही. जे नियतीत असतं ते घडतंच.
या सामन्यात भारताचा तेव्हाचा व सध्याचाही कर्णधार विराट कोहलीने किवींचा कर्णधार केन विल्यम्सनला बाद केले होते. शिवाय फलंदाजीतही ४३ धावांचं योगदान देत सामनावीराचा किताब फटकावला होता. जेव्हा या विषयी आजच्या पत्रकार परिषदेत कोहलीला प्रश्न विचारला गेला तेव्हा अगदी हसतमुखत किंग कोहलीने पत्रकारांना उत्तर दिले. कोहलीला तर हेही माहित नव्हते कि त्याने विल्यम्सनला बाद केले होते. असो. उद्याच्या होणाऱ्या सामन्यास भारतीय संघ तयार असून किवींशी दोन हात करण्यास पूर्णपणे सज्ज आहे असे कोहलीने यावेळेस पत्रकार परिषदेत म्हटले.
आज ४५ थरारक सामन्यांनंतर आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेची गाडी मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्डला येऊन पोचली आहे. भारताने येथे खेळलेल्या दोन्ही सामन्यांत विजय मिळवला असून उद्याच्या लढतीसाठीही संघ सज्ज आहे. पाकिस्तानला ८९ धावांनी तर वेस्ट इंडिजला १२५ धावांनी पराभूत केलेला भारतीय संघ आपल्या सर्वोत्तम फॉर्ममध्ये आहे. भारताने साखळी सामन्यांत खेळलेल्या नऊ सामन्यांपैकी सात सामन्यांत विजय, इंग्लडविरुद्ध पराभव तर याच न्यूझीलंडविरुद्धचा सामना पावसामुळे रद्द झाला होता.
न्यूझीलंडला हलक्यात घेणं पडू शकतं महाग
भारत साखळी सामन्यांत जरी ‘दादा’ ठरला असला तरी न्यूझीलंडचा संघही कमी नाही. विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडकण्याची त्यांची हि आठवी वेळ आहे. भारतही सात वेळेस उपांत्य फेरीत पोहोचला आहे. पण किवींचा संघही मोठ्या स्पर्धात मोक्याच्या क्षणी कसे खेळायचे हे जाणतो. न्यूझीलंडला ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, पाकिस्तान यांच्याकडून साखळी सामन्यात मात खावी लागली होती. त्यामुळे भारतासारख्या तगड्या संघाविरुद्ध खेळणे त्यांच्यासाठीही कठीणच असेल. कोहलीने पत्रकार परिषदेत हेही सांगितले कि, आम्ही फंलदाजी, गोलंदाजी व क्षेत्ररक्षण या तिन्ही क्षेत्रांचा दवाब हाताळण्यास सक्षम आहोत. टीम इंडियासाठी इतर सामन्यांप्रमाणेच हा सामना असेल ज्यात संघ आपला सर्वोत्तम खेळ करण्यास तयार असेल.
रोहित सध्याचा ‘टॉप‘ बॅट्समन
रोहितच्या सध्याच्या फॉर्मविषयी विचारले असता कोहली हसत उत्तर दिले. कोहली म्हणाला, “रोहित सध्या ज्या फॉर्ममध्ये आहे, माझ्यासाठी तो सध्याचा ‘टॉप’ फलंदाज आहे. एका विश्वचषकात, किंबहुना एका स्पर्धेत पाच शतके ठोकणे त्याच्यासाठी मोठी उपलब्धी आहे. आगामी दोन सामन्यांत (जात भारत फायनलमध्ये पोचली तर) त्याही दोन शतके लगावून अनोखा विक्रम करू शकतो. संघाच्या गरजेनुसार कसे खेळायचे त्याला माहित आहे. आशा करतो कि तो त्याचा फॉर्म असाच चालू ठेवो.”
]]>