दोन तुल्यबळ संघांत एकतर्फी झालेल्या सामन्यात संजू सॅमसन व अकील होसेन यांनी मुंबई इंडियन्सला वानखेडेवर लाजिरवाणा पराभव दिला.
मुंबई (भास्कर गाणेकर): गुजरात टायटन्सविरुद्ध विजय मिळवल्यानंतर मुंबई इंडियन्सच्या गोट्यात आलेल्या आनंदाला पारंपरिक प्रतिस्पर्धी चेन्नई सुपरकिंग्सने विरजण घालत एक लाजिरवाणा पराभव देत जणू हवाच काढून टाकली. २०८ धावांचा पाठलाग करण्यास उतरलेल्या मुंबईला पहिल्या तीन षटकांत तीन हादरे मिळाल्यानंतर चेन्नईच्या फिरकी गोलंदाजांनी तालावर नाचवत १०४ धावांत गारद करीत आपला तिसरा विजय संपादित केला.
वानखेवर स्पर्धेचा श्रीगणेशा करीत मुंबई इंडियन्सने केकेआरचा दोनशे धावांचा पल्ला सहज गाठला होता. त्याच आशेने मुंबई इंडियन्सने धावांचा पाठलाग करण्याचा निर्धार केला असावा. रोहित शर्माच्या अनुपस्थित सलामी जोडीची झालेली पडझड याही सामन्यात पाहायला मिळाली. चेन्नईने माजी टी-२० नंबर १ स्पिनर अकील होसेनला पहिले षटक दिले आणि त्याने आपल्या कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवीत दानिश मलवारला भोपळाही न फोडता माघारी धाडले. काही दिवसांपूर्वीच आईचे निधन झालेले असतानाही संघासाठी मैदानात उतरलेल्या मुकेश चौधरीनेही हुसेनला दुसऱ्या बाजूने साथ देत दुसरा सलामीवीर क्विंटन डी-कॉकला (७) त्रिफळाचित करीत सलामी भेदली. पुढच्याच षटकात हुसेनने नमन धीरला शून्यावर बाद करीत मुंबईची अवस्था तीन बाद ११ अशी केली.
दोनशेहून अधिक धावांचा पाठलाग करताना सुरुवातीलाच दमछाक झालेल्या मुंबईला काही काळ तिलक वर्मा व सूर्यकुमार यादव यांनी तारण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. अवस्था परंतु चेन्नईच्या गोलंदाजांनी आपले कौश्यल्य पणाला लावत मुंबईची केविलवाणी केली. १२व्या षटकात होसेनने तिलकला ३७ धावांवर त्रिफळाचित करीत मुंबईच्या आशा जणू विझवून टाकल्या. त्याला भरच म्हणून नूर अहमदने हार्दिक पंड्या (१) व शफरॉन रुदरफोर्ड (०) यांना सलंगच्या चेंडूवर बाद करीत मुंबई इंडियन्स समर्थकांना गप्प केले. हुसेनने पुढच्याच षटकात सूर्यकुमारला (३५) बाद करीत संघमालक आकाश अंबानी यांना मैदानाबाहेर जाण्यास भाग पाडले.
पावरप्लेमध्ये जेमतेम २९ धावा करणाऱ्या मुंबई इंडियन्सने सामना इथेच गमावला होता. फलंदाजीत सामर्थ्य असतानाही मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांनी बेजबाबदार फटके खेळत सामना चेन्नई सुपरकिंग्सला बहाल केला. अकील होसेनने एक निर्धाव षटक टाकत केवळ १७ धावांत चार गादी बाद केले तर नूर अहमदने २३ धावांत दोन गडी टिपले. मुंबईला १०४ धावांत बाद करीत चेन्नईने सामना तब्बल १०३ धावांनी जिंकत पाचव्या स्थानी झेप घेतली. आश्चर्याची बाब म्हणजे तिलक व सूर्यकुमारचा अपवाद वगळता मुंबईच्या एकही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही.
तत्पूर्वी, इंडियन प्रीमियर लीग २०२६ मध्ये धावांचा पाऊस पाडणाऱ्या मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकत चेन्नई सुपर किंग्सला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. यंदाच्या आयपीएलमध्ये पहिल्या डावाची सरासरी धावसंख्या तब्बल २०८ असल्याने धावांचा पाठलागही तसाच होतो हे जाणून हार्दिकने हा निर्णय घेतला. दोन्ही संघांना पाच-पाच आयपीएल ट्रॉफी जिंकून देणाऱ्या महेंद्र सिंग धोनी व रोहित शर्मा यांच्या अनुपस्थितीत खेळल्या गेलेल्या सामन्यात ताबडतोब सुरुवात करून दिल्यानंतर सीएसकेचा कर्णधार ऋतुराज २२ धावांत माघारी परतला. त्याचा हरवलेला फॉर्म याही सामन्यात दिसला. अल्लाह गझनफरने तिलक वर्माकरवी झेलबाद करीत पहिला हादरा दिला.
चेन्नई सुपर किंग्ससाठी मोठी धावसंख्या उभारण्यासाठी मधल्या फळीला टिकून राहणे आवश्यक होते. त्यासाठी एक तरी मोठी भागीदारी आवश्यक होती. पावरप्लेमध्ये दोन गडी गमावल्यानंतर दोनशेचा आकडा गाठण्यासाठी संजू सॅमसनने एका बाजूने किल्ला लढवण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आणि पारही केली. एका बाजूने विकेट्स जात असताना संजूने २६ चेंडूंत आपले अर्धशतक झळकावले. सर्फराज खान (१४) सोबत ४० धावांची भागीदारी केल्यानंतर मधल्या षटकांत पाहिजे तशी खेळी सीएसकेला करता आली नाही. शिवम दुबे (५) व डेवाल्ड ब्रेव्हिस (२१) यांना अनुक्रमे गझनफर व अश्वनी कुमार यांनी बाद केल्यानंतर ११व्या षटकाअखेरीस चार बाद १२२ अशी झाली. २२० धावांचा आकडा सहज गाठेल असे दिसत असताना बुमराने आपल्या जादुई यॉर्करच्या जोरावर अंतिम षटकांत धावसंख्येवर जणू ब्रेक लावला. पण संजूने वेट-अँड-वॉच भूमिका घेत शेवटचा चेंडूवर स्केयर-लेगला मोठा षटकार ठोकत यंदाच्या आयपीएलमधील आपले दुसरे शतक पूर्ण केले. त्याने ५४ चेंडूंत दहा चौकार व सहा षटकार ठोकत नाबाद १०१ धावांची खेळी केली.
मुंबईच्या या पराभवामुळे बाद फेरीत प्रवेश करण्याच्या आशा धूसर होताना दिसत आहेत. उर्वरीत सात सामन्यांत चांगली कामगिरी तेही नेट रन रेट चांगला राखत जिंकण्याचे खडतर आव्हान मुंबईने असेल.
