“जहांगीर आर्ट गॅलरीत पाटील दाम्पत्याचे चित्रप्रदर्शन”
मुंबई : चित्रकार मीना व महावीर पाटील दाम्पत्याचे पाचवे ‘सोबती’ चित्रप्रदर्शन मुंबईच्या जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये सुरु आहे. अभिनेते कंवलजीत सिंह यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. या पाचव्या प्रदर्शनात ५७ कलाकृती ॲक्रेलिक आणि ऑइल या माध्यमातील आहेत. ‘सोबती’ या संकल्पनेतून या प्रदर्शनाची सुरुवात झाली आहे. यामध्ये आयुष्यातील जोडीदार, निसर्गाशी जवळीक आणि गाय व वासरासोबतचे बालपण हे विषय घेऊन ही चित्रे साकारलेली आहेत. या प्रदर्शनाचे उदघाटन करताना ज्येष्ठ अभिनेते कंवलजीत सिंह म्हणाले की, निसर्ग आणि माणूस यांचे यांचं एक आगळंवेगळं अतूट नाते आहे. थोर तत्वज्ञ जे. कृष्णमूर्ती म्हणाले की, माणूस हा निसर्गाचाच एक भाग आहे. तो निसर्गाशी जवळीक साधून आपलं जीवन सुखाने जगू शकतो. निसर्ग माणसाला जीवन जगायचे कसं आणि निसर्गाचा आस्वाद घेत आपणच आपले जीवनगाणे हे कसे सुमधुर करायचे ते शिकवत असतो. पाटील यांची ही चित्रे पाहताना आपण आपल्या गावाकडे फिरून आल्याचा भास होतो. जी काहीतरी नव्याने सांगताना व आपल्याला शिकवताना दिसतात. महावीर पाटील यांनी फाईन आर्टमधून पदवी घेतली असून, कलाशिक्षक पदविका घेतली आहे. त्याचप्रमाणे पाटील दांपत्य गेली तीस वर्षे कला क्षेत्रात कार्यरत असून, सध्या गिरगाव येथील मुंबई कला महाविद्यालयात ते कार्यरत आहेत. माणगाव येथील शेतकरी कुटुंबातील हे दाम्पत्य आपल्या बालपणीच्या आठवणींची कास धरून परिसरातील निसर्गाचे रंग-रूप व आकार घेऊन चित्रप्रदर्शन साकारत आले आहेत. प्रदर्शन कार्यक्रमाच्या प्रसंगी नुक्कड फेम अभिनेते हैदर अली, कमांडर हैरद सिंग रावत, ज्येष्ठ साहित्यिक प्रल्हाद जाधव, मराठी वृत्तपत्र लेखक संघाचे अध्यक्ष रवींद्र मालुसरे उपस्थित होते. मुळचे माणगाव (ता. हातकणंगले) येथील चित्रकार मीना व महावीर पाटील यांच्या ‘सोबती’ या चित्र प्रदर्शनाला रसिकांचा प्रतिसाद मिळतो आहे.