नियमभंग झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा : मिलिंद एकबोटे
सातारा : खटाव तालुक्यातील पुसेगाव येथील जनावरांच्या बाजारात प्राणी संरक्षण कायद्याचे उल्लंघन होत असल्याचा गंभीर आरोप अखिल भारतीय कृषी व सेवा संघाने केला आहे. याबाबत संघाने राज्य सरकारचे लक्ष वेधत तातडीने कठोर कारवाईची मागणी केली आहे.
टॅगिंग नसलेल्या पशुधनाची खरेदी-विक्री तात्काळ बंद करण्यात यावी. अन्यथा यात्रेच्या काळात उपोषणासह तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा स्पष्ट इशारा संघाचे प्रदेशाध्यक्ष मिलिंद एकबोटे यांनी पत्रकार परिषदेत दिला.
या पत्रकार परिषदेस मानद पशु कल्याण अधिकारी माधव घुमाळ, ॲड. दत्तात्रय सणस, गोशाळा व्यवस्थापक वैभव सणस यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
मिलिंद एकबोटे यांनी सांगितले की, पुसेगावच्या जनावरांच्या बाजारात मोठ्या प्रमाणावर टॅगिंगविना बैलांची खरेदी-विक्री सुरू असून काही जनावरे थेट कत्तलीसाठी विकली जात असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत आहेत. हा प्रकार प्राणी संरक्षण कायद्याचा थेट भंग असून तो अत्यंत गंभीर आणि चिंताजनक आहे.
राज्य शासनाने १ जून २०२४ रोजी पशुधनाच्या खरेदी-विक्रीसाठी जिओ-टॅगिंग अनिवार्य करणारा विशेष आदेश जारी केला आहे. मात्र, पुसेगाव बाजारात या आदेशाची अंमलबजावणी होत नसल्याने गोरक्षकांमध्ये तीव्र नाराजी आहे.
पुसेगावला धार्मिक व आध्यात्मिक महत्त्व असल्याचे नमूद करत एकबोटे म्हणाले की, येथे येणाऱ्या प्रत्येक जनावराचे जिओ-टॅगिंग सक्तीचे करण्यात यावे. टॅगिंग नसलेल्या जनावरांना यात्रेत प्रवेश देऊ नये. तसेच कसायांवर व त्यांच्या सहकाऱ्यांवर संपूर्ण बंदी घालावी.
गेल्या वर्षी गोरक्षकांनी जनावरांचे संरक्षण करण्याचा प्रयत्न केला असता पोलिस प्रशासनाकडून अपेक्षित सहकार्य मिळाले नाही, असा आरोपही त्यांनी केला. त्यामुळे यंदा यात्रेच्या कालावधीत स्वतंत्र पोलिस पथकाची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.
नियम न पाळल्यास बाजार रद्द करण्याची मागणी
“जर जिओ-टॅगिंगची काटेकोर अंमलबजावणी झाली नाही, तर पुसेगावचा जनावरांचा बाजार तात्काळ रद्द करण्यात यावा. अन्यथा महाराष्ट्रभरातील गोरक्षक पुसेगावमध्ये एकत्र येऊन तीव्र आंदोलन करतील,” असा इशाराही मिलिंद एकबोटे यांनी दिला.
