गतविजेत्या भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी २०१७ च्या आपल्या पहिल्याच सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला १२४ धावांनी नमवत दमदार सुरुवात केली. स्पर्धेच्या इतिहासात आता भारत-पाकिस्तान २-२ अश्या बरोबरीत आला असून पुढील सामना श्रीलंकेबरोबर ८ जूनला होईल. आय. सी. सी. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या इतिहासात जरी पाकिस्तान भारतावर भारी असला तरी रँकिंगमध्ये आठव्या क्रमांकावर असलेल्या पाकिस्तानला गतविजेत्या भारताविरुद्ध दोन हात करणे म्हणजे एका युद्धाप्रमाणेच होते. मागील काही वर्षांपासून मर्यादितीत क्रिकेटमध्ये आपला दबदबा सिद्ध केलेल्या भारतीय संघाने विश्वचषक २०१५ पासून जरी जास्त सामने खेळले नसले तरी कसोटी क्रिकेट व आय. पी. एल. चा दांडगा अनुभव असलेला भारतीय संघ आज मागील १० वर्षांत पहिल्यांदाच आय. सी. सी. स्पर्धेत महेंद्र सिंग धोनीच्या नेतृत्वाविना उतराला. भारताचा सावध पवित्रा जवळजवळ आठ महिन्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करणारा रोहित शर्मा त्याचा यशस्वी सलामी जोडीदार शिखर धवनच्या साथीने भारतीय डावाची सुरुवात केली. तत्पूर्वी पाकिस्तानचा कर्णधार सर्फराज खानने नाणेफेक जिंकत भारताला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाजांनी भारताच्या सलामीवीरांना सुरुवातीला चांगलेच जखडून ठेवले. मोहम्मद आमिरने रोहितला पहिल्या षटकात एकही चेंडू बॅटवर खेळू न देता षटक निर्धाव टाकले. दुसरीकडे पाकिस्तानने इमाद वासिमला चेंडू देत फिरकीचा मारा चालू ठेवला. भारत-पाकिस्तानच्या ‘हाय वोल्टेज’ सामन्यात नेहमीच दोन्ही संघांच्या खेळांडूंवर दबाव असतो आणि याचाच परिणाम सामान्यांच्या सुरुवातीला दिसत होता. पहिल्या चार चेंडूंत केवळ नऊ धावा केलेल्या भारतीय संघाने चेंडूला पुरेपूर पारखले आणि रोहित-धवन जोडीने सावधरित्या धावा करण्यातच धन्य मानले. पाचव्या, सहाव्या, सातव्या षटकात एक-एक चौकार ठोकत भारताने थोडासा दबाव कमी करण्याचा प्रयन्त केला. दहाव्या षटकात पावसाचा पहिल्यांदा व्यत्यय येण्याच्या आधी भारताने एकही गडी न गमावता ४६ धावा केल्या होत्या. पाऊस थांबल्यानंतर भारताने डाव चालू केला आणि पुन्हा एकदा सलामी जोडीने सावधरीत्या धावा करीत १५ षटकांत धावसंख्या ६६ वर नेऊन ठेवली. शिखर धवन एकेरी-दुहेरी धावा घेत होता तर रोहित शर्मा अजूनही जम धरण्यास चाचपडत होता. हसन अली व वहाब रियाझ यांच्या भेदक माऱ्यासमोर भारतीय सलामी फलंदाज सावध पवित्रा घेण्यातच धन्य मानत होते. रोहित-धवनचा किक स्टार्ट भारत-पाक सामन्यांत भारत पाकिस्तानच्या ज्या वेगवान गोलंदाजाला लक्ष करतो तो म्हणजे वहाब रियाझ. सोळाव्या षटकापासून भारताने तशी सुरुवातच केली. या षटकात १३ धावा ठोकत सलामी जोडीने आपण ‘सेट’ झालो आहोत याचे संकेत दिले. एकोणिसाव्या षटकात रोहित शर्माने शादाब खानला मिड-विकेटला खणखणीत षटकार खेचत आपले ३० वे अर्धशतक पूर्ण केले. त्याने इथपर्यंत पोचायला तब्बल ७१ चेंडू खर्च केले. रोहितचे अर्धशतक पाहताच धवनही पिसाळला आणि त्याने वहाब रियाझच्या पुढच्याच षटकात सलग तीन चौकार व एक दुहेरी धाव घेत त्याच्येही अर्धशतक पूर्ण केले. धवन इथवर न थांबता पुढच्याच षटकात शादाब खानला षटकार खेचत भारताची धावगती जवळजवळ सहावर आणली. शादाब खानने २५ व्या षटकात पाकिस्तानला पहिली सफलता मिळवून दिली आणली पाकिस्तानने सोडलेले सोपे सोपे झेल व चेंडू यांचा दबाव काहीसा कमी केला. डीप मिड विकेटला षटकार मारण्याच्या नादात बाउंड्री लाईनजवळ असलेल्या अझर अलीकडे झेल देत बाद झाला. त्याने ६५ चेंडूंत १ षटकार व ६ चौकार खेचत ६८ धावा केल्या. धवन बाद झाल्यानंतर आलेल्या कोहलीनेही सावध पवित्रा घेतला. तर दुसरीकडे रोहित शर्माने सेट झाल्यानंतर पाकिस्तानी गोलंदाजांचा भरपूर समाचार घेतला. वहाब रियाझला चांगलेच ठोकून काढत भारताने पाकिस्तानच्या आक्रमक वेगवान गोलंदाजीला दबावात टाकले. पावसामुळे ४८ षटकांचा झालेला सामना रोहित शर्माने मनावर घेतले आणि विराट कोहलीने बोलावलेल्या एकेरी धावेवर तो धावबाद झाला. ११९ चेंडूंचा सामना करीत ७ चौकार व १ षटकार ठोकत तो ९१ धावा करू शकला आणि पुन्हा एकदा शतकापासून वंचित राहिला. तिकडीचा ‘फिनिशिंग टच’ एकीकडे भारत पहिल्या चार चेंडूंत केवळ नऊ धावा करू शकला तर फिनिश करताना भारताने शेवटच्या चार षटकांत तब्बल ७२ धावा कुटल्या. यात ‘स्पेशल’ धन्यवाद द्यावे लागेल ते हार्दिक पांड्याच्या शेवटच्या षटकातील सलग तीन षटकार. रोहित शर्मा बाद झाल्या नंतर धोनीला मागे ठेवत भारताने चौथ्या क्रमांकावर युवराज सिंगला पाठवले. युवराज सिंगने वहाब रियाझला चौकार मारत आपले चौथ्या क्रमांकावर धडाल्याची पावती दिली. जर कोणत्या संघाची फिल्डिंग खराब असेल तर तो संघ पाकिस्तान. सोपे सोपे चेंडू सोडत भारताला केवळ धावा करण्याची संधी न देताच भारताच्या फॉर्मातील खेळाडूंनाही जीवनदान दिले. ३९ व्या षटकातील चौथ्या चेंडूवर शादाब खानच्या गोलंदाजीवर हसन अलीने युवराजचा सोपा झेल सोडला आणि भारताला एक मोठी संधी दिली. युवराजने मिळालेल्या संधीचा पुरेपूर फायदा उचलीत पाकिस्तानच्या गोलंदाजीची पिसे काढली. ४४ व्या षटकात मोहम्मद आमीर चेंडू टाकताना जखमी झाला आणि त्याला मैदान सोडावे लागले. वहाब रियाझने आमिरची ओव्हर चालू ठेवली आणि शेवटच्या चेंडूवर फखर झमानने कोहलीचा झेल सोडत आधीच्या जखमेवर जणू मीठ चोळले. कोहलीने मग आपल्या गाडीचा गियर वाढवत पुढच्या षटकात १७ धावा कुटल्या. याच ओव्हरमध्ये कोहलीने आपले अर्धशतक पूर्ण केले. अगोदरच भरपूर मार पडलेल्या वहाब रियाझला आणखी चोपत ४६ व्या षटकात तीन चौकार व एक षटकार ठोकत २१ धावा कुटल्या. युवराजनेही आपले अर्धशतक केवळ २९ चेंडूंत ठोकत भारतातर्फे चॅम्पियन्स ट्रॉफीत सर्वात वेगवान अर्धशतक ठोकण्याचा पराक्रम केला. ४७ व्या षटकात हसन अलीने युवराज सिंगला बाद करीत भारताला तिसरा धक्का दिला. युवराज बाद झाल्यानंतर आलेल्या हार्दिक पांड्याने शेवटच्या षटकात इमाद वासिमला सलग तीन षटकार ठोकत भारताचा आकडा ३०० च्या वर नेऊन ठेवला. पावसाने तिसऱ्यांदा व्यत्यय आणल्यापूर्वी भारताने ४८ षटकांत तीन गडी गमावत ३१९ धावा केल्या आणि पावसामुळे पाकिस्तानला ४८ षटकांत ३२४ धावांचे लक्ष दिले. पाऊस, भारतीय गोलंदाज आणि पाकिस्तानची सलामी सारखा सारखा पावसाने अडखळा आणलेल्या सामन्यात पहिल्या डावानंतर पावसाने लपंडाव चालू केला. ३२४ धावांचा पाठलाग पार करण्यास उतरलेल्या पाकिस्तानच्या सलामीवीरांनी भारताप्रमाणे सावध सुरुवात केली. भुवनेशवर कुमार व उमेश यादव यांनी भेदक सुरुवात करीत पाकिस्तानला दबावात आणण्याचा प्रयत्न केला खरा परंतु सर्वोत्तम क्षेत्ररक्षणासाठी नाव कमावणाऱ्या भारतीय संघाला पाकिस्तानची सांगत लागली आणि त्यांचेही गचाळ क्षेत्ररक्षण झाले. पाचव्या षटकात पावसाने पुन्हा एकदा अडथळा आणण्यापूर्वी पाकिस्तान बिनबाद २२ धावा करून बसला होता. अगदी आठव्या षटकापर्यंत सावध खेळणारे पाकिस्तानी सलामीवीरांना बाद करण्याची पहिली संधी या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर आली खरी परंतु हार्दिक पांड्या अझर अलीला धावबाद करण्यास हुकला. पाकिस्तानला मिळालेल्या या संधीचा मोठा फायदा उचलता आला नाही आणि त्यांना अहमद शहझादच्या (१२) रूपाने पहिला धक्का मिळाला. भुवनेश्वर कुमारने भारताला पहिली सफलता देत भारतीय प्रेक्षकांना खुश केले. पाकिस्तानचा मागील काही काळापासून सर्वोच्च फॉर्मात असलेला बाबर आझम आज काही तरी स्पेशल करेल अशी अपेक्षा असताना भारताच्या वेगवान गोलंदाजांनी त्याला धावा करण्यास अक्षरश रडवले. १२ चेंडूंत ८ धावा करून बाद होण्यापूर्वी दबावात त्याने बॅकवर्ड पॉईंटला उभ्या असलेल्या रवींद्र जडेजाकडे सोपा झेल देत पाकिस्तानच्या डावाला गळती लावण्यास सुरुवात केली. भारताचे ढिसाळ क्षेत्ररक्षण जर मागील काही वर्षापासून फलंदाजीसोबतच भारतीय संघ ज्या क्षेत्रात उत्तम असेल तर ते म्हणजे क्षेत्ररक्षण. भारताचे क्षेत्ररक्षण सर्वोत्तम आहे यात काहीच शंकाच नाही. पण जर आजच्या सामन्याचा विचार केला तर भारताचे क्षेत्ररक्षण हे अगदी ढिसाळ झाले. भुवनेश्वर कुमार, केदार जाधव सोबतच कर्णधार विराट कोहली यांनी सोपे सोपे झेल सोडत पाकिस्तानला आणखी संधी दिली. परंतु सामन्याचा विचार केला तर भारताप्रमाणे पाकिस्तानला या संधींचा मोठा लाभ घेण्यात यश आले नाही आणि त्यांना मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. पाकचा माजी एकदिवसीय कर्णधार अझर अलीचा अपवाद वगळता एकही फलंदाजाला खेळपट्टीवर तग धरता आला नाही. त्याने ८५ मिनिटे खेळपट्टीवर टिकून राहत ६४ चेंडूंत ६ चौकारांच्या सहाय्याने ५० धावा केल्या. औपचारिकता पूर्ण अझर अली बाद झाल्यानंतर पाकिस्तानच्या फलंदाजांनी केवळ मैदानावर हजेरी लावण्याचे काम केले. मोहम्मद हफीजने काही काळ संघर्ष केला पण तेही अपूर्ण पडले. भारताचे जावईबापू असलेले शोएब मलिकला जडेजाने आपल्या अफलातून क्षेत्ररक्षणाने चीत करीत पाकिस्तानची हवाच काढली आणि उरली सुरलेली कसर उमेश यादव व हार्दिक पांड्याने पूर्ण करीत पाकिस्तानला ३४ व्या षटकात ९ गड्यांच्या मोबदल्यात १६४ धावांवर रोखले. वहाब रियाझ गोलंदाजी करताना जखमी झाल्यामुळे फलंदाजी करण्यास उतरू शकला नाही आणि पाकिस्तान सामना डकवर्थ-लुईस नियमानुसार १२४ धावांनी हरला.]]>