शेवटपर्यंत रंगतदार झालेल्या सामन्यात यु मुम्बाला हरयाणा स्टीलर्सकडून ३१-३५ असा पराभव स्वीकारावा लागला. मुंबई: वरळीच्या एनएससीआय स्टेडियममध्ये प्रेक्षकांनी खचाखच भरलेल्या सामन्यात मुंबईवर दबाव होताच. कारण शनिवारी (१० ऑक्टोबर) झालेल्या सामन्यात एका छोट्या चुकीमुळे गुजरातविरुद्ध मुंबईला हातातला सामना गमवावा लागला. आजच्या सामन्यात मुंबईने सिद्धार्थला अंतिम सातमध्ये स्थान देत सुरुवातीपासूनच प्रतिस्पर्ध्यांना दबावात टाकण्याचा प्रयत्न केला. हरयाणा स्टीलर्सला त्यांच्या होम लेगमध्ये यु मुम्बाने दोन्ही सामन्यात चांगल्याच फरकाने पराभूत केले होते. त्यामुळे तो एक फायदा मुंबईच्या खेळाडूंकडे होता. होम लेगमध्ये बरेचसे संघ म्हणावी तशी कामगिरी करीत नसल्यामुळे मुंबईवरही तितकाच दवाब होता. हरयाणाचा कर्णधार मोनू गोयत याने रेड करून सामन्याचा श्रीगणेशा केला. पुढच्याच चढाईमध्ये रोहित बलयानला हरयाणाच्या मजबूत पकडीसमोर शरणागती पत्करावी लागली आणि सामन्याचा पहिला गुण त्यांनी आपल्या नावे केला. दोन्ही संघांच्या बचाव फळीने आक्रमक खेळ दाखवत एक-एक गुणांसाठी शर्तीचे प्रयत्न करावे लागले. पण जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या सिद्धार्थ देसाईने सातव्या मिनिटाला हरयाणाच्या मॅटवर उरलेल्या तिन्ही खेळाडूंना बाद करीत पाच गुणांची कमाई करीत हरयाणाच्या खेळाडूंना चांगलेच गोत्यात टाकले. १२व्या मिनिटाला यु मुम्बाही ऑल आउट झाली आणि दोन्ही संघांचे गुणही बरोबर झाले. पहिल्या हाफच्या उत्तरार्धात यु मुम्बाचा झंजावात काहीसा नरमला. परिणामी, मिळालेली आघाडी पहिल्या हाफ अखेरीस केवळ एक गुणाचीच राहिली. ‘अ’ गटात जरी यु मुम्बा अवलं स्थानी असलॆ तरी त्यांच्यासाठी घराच्या प्रेक्षकांसमोर प्रदर्शन करणे तितकेच अवघड होते. हरयाणाचा जबरदस्त बचाव यु मुम्बासाठी डोकेदुखी ठरत होता. पहिल्या हाफमध्ये समाधानकारक खेळ केलेल्या सिद्धार्थला मात्र दुसऱ्या हाफमध्ये पाहिजे तसा खेळ करता आला नाही. हरयाणाच्या दोन्ही कॉर्नर्सनी सकस खेळ पेश करीत मुंबईच्या खेळाडूंना चांगलेच अडचणीत टाकले. त्यात भर म्हणजे, स्टीलर्सच्या विकास कंडोला याने आणखी एक सुपर टेन करीत दुसऱ्या बाजूने संघाचं धावफलक धावत ठेवलं. सिद्धार्थच्या दुसऱ्या हाफमधील अपयशामुळे यु मुम्बाचा कर्णधार फझलने अभिषेक सिंगला जास्त काळ रेडसाठी पाठवले. पण,हरयाणाच्या ‘स्टील’ च्या पकडीसमोर त्याचाही जास्त निभाव लागला नाही. मुंबईसाठी आणखी एक बाब ज्याने त्यांना सतावले ती म्हणजे कर्णधार फझल अत्राचलीचा फॉर्म. फझलला या सामन्यात एकही प्रतिस्पर्धी खेळाडूला पकडता आले नाही. आणि हीच गोष्ट त्यांच्यासाठी शेवटपर्यंत डोकेदुखी ठरली. सामन्याच्या शेवटी यु मुम्बाने खूपच चुका केल्या आणि त्यांना त्याच प्रायश्चित भोगावं लागलं. विकास कंडोलाने चढाईत १५ गुण कमावत यु मुम्बाला चांगलेच धारेवर धरले. परिणामी, यु मुम्बा आपल्या घराच्या मैदानावर सलग दुसरा पराभव स्वीकारावा स्वीकारावा लागला. हरयाणा स्टीलर्सने मात्र आपल्या होम लेगच्या दोन्ही पराभवाचा वचपा काढला.]]>