पुणे सिटीने नॉर्थइस्टला बरोबरीत रोखले

जमशेदपूर (आयएसएल): हिरो इंडियन सुपर लिगमध्ये (आयएसएल) येथील इंदिरा गांधी अथलेटीक स्टेडियमवर नॉर्थइस्ट युनायटेड एफसी आणि एफसी पुणे सिटी यांच्यात १-१ अशी बरोबरी झाली. मध्यंतराच्या गोलशून्य कोंडीनंतर रॉलीन बोर्जेसने नॉर्थइस्टचे खाते उघडल्यानंतर आदिल खानने पुणे सिटीला एक गुण मिळवून दिला.

निर्धारीत वेळ संपण्यास एक मिनिट बाकी असताना नॉर्थइस्टच्या ज्योस लेऊदो याला रेड कार्डला सामोरे जावे लागले. चेंडूवर ताबा मिळविण्याच्या प्रयत्नात त्याने पुणे सिटीच्या दिएएगो कार्लोसला पाडले. कोलंबियाच्या लेऊदोने ढोपर मारून पाडल्यामुळे त्याला मैदानाबाहेर काढण्यात आले. नॉर्थइस्टच्या सुदैवाने याचा अंतिम निकालावर परिणाम झाला नाही.

नॉर्थइस्टने १७ सामन्यांत सातवी बरोबरी साधली असू सात विजय व तीन पराभव अशा कामगिरीसह त्यांचे २८ गुण झाले. त्यांचे तिसरे स्थान कायम राहिले. पुणे सिटीने १६ सामन्यांत चौथी बरोबरी साधली असून पाच विजय व सात पराभव अशा कामगिरीसह त्यांचे १९ गुण झाले. त्यांचे सातवे स्थान कायम राहिले.

खाते उघडण्याची शर्यत नॉर्थइस्टने जिंकली. ४७व्या मिनिटाला रॉलीन बोर्जेसने ही कामगिरी केली. त्याने बार्थोलोम्यू ओगबेचे याच्या साथीत चाल रचत आगेकूच केली. ओगबेचे याच्या प्रयत्नावर पुणे सिटीचा गोलरक्षक कमलजीत सिंग चेंडू नीट अडवू शकला नाही. त्यामुळे मिळालेल्या संधीचा फायदा घेत बोर्जेसने गोल केला.

पुणे सिटीने ६९व्या मिनिटाला बरोबरी साधली. आदिल खानने नॉर्थइस्टच्या ढिसाळ बचावाचा फायदा उठविला. आशिक कुरुनीयन याने ही चाल रचताना डावीकडील दिएगो कार्लोसला पास दिला. कार्लोसनेही मार्किंग नसल्याचा फायदा उठविला. त्याने आदिलला पास दिला. आदिलने मग व्हॉली मारत लक्ष्य साधले.

पहिली चाल दुसऱ्या मिनिटाला नॉर्थइस्टने रचली. डावीकडून किगन परेरा याने आगेकूच करीत मारलेला चेंडू मारलेला चेंडू मार्टिन डियाझने हेडींगकरवी बाहेर घालविला. तिसऱ्या मिनिटाला नॉर्थइस्टला मिळालेली फ्री किक फेडेरिको गॅलेगोने घेतली. त्याने मारलेला चेंडू मात्र स्वैर होता आणि बॉक्समधील खेळाडूंच्या डोक्यावरून बाहेर गेला.

पुणे सिटीच्या मार्को स्टॅन्कोविचने उजवीकडून प्रयत्न केला. त्याने बॉक्समध्ये मारलेला चेंडू नॉर्थइस्टच्या गुरविंदर सिंगने रोखला. आठव्या मिनिटाला थ्रो इनवर बार्थोलोम्यू ओगबेचे याला चेंडू मिळाला. तो मध्य क्षेत्रातून आगेकूच करीत असतानाच पुणे सिटीच्या आदिल खानने त्याला ढकलले.

दोन मिनिटांनी पुणे सिटीचा प्रयत्न अवैध ठरला. दिएगो कार्लोसने कौशल्य प्रदर्शित करीत क्रॉस शॉट मारला. त्यावर जोनाथन व्हिलाने हेडिंग केले, पण तो अचूकता साधू शकला नाही. हा चेंडू रॉबिन सिंग याच्या दिशेने गेला, पण तो प्रयत्न करण्याआधीच ऑफसाईडचा इशारा झाला.

व्हिलानेच १३व्या मिनिटाला बॉक्सलगतच्या जागेवरून मारलेला चेंडू नॉर्थइस्टचा गोलरक्षक पवन कुमार याने सहज रोखला. चार मिनिटांनी नॉर्थइस्टने प्रयत्न केला, पण गॅलेगोने उजीकडून बॉक्समध्ये मारलेला चेंडू पुणे सिटीच्या खेळाडूंनी बाहेर घालविला. त्यावर मिळालेल्या कॉर्नरवर काही विशेष घडले नाही.

नॉर्थइस्टच्या पॅनागीओटीस ट्रीयाडीसने १९व्या मिनिटाला डाव्या बाजूने चेंडूवर ताबा मिळवून उजव्या पायाने फटका मारला, पण अचूकतेअभावी चेंडू नेटवरून गेला. नॉर्थइस्टच्या गुरविंदरला २२व्या मिनिटाला यलो कार्डला सामोरे जावे लागले. त्याने आशिक कुरुनियनला पाडले.

ओगबेचेने ३१व्या मिनिटाला डावीकडून हेडिंगवर प्रयत्न केला, पण जास्त ताकद लावल्यामुळे तो फिनिशिंग करू शकला नाही. ३९व्या मिनिटाला लाल्थाथांगा खॉवल्हरिंगने आगेकूच करीत डावीकडे ट्रीयाडीसला पास दिला, पण ही संधीही वाया गेली.

पुणे सिटीच्या दिएगो कार्लोसने ४०व्या मिनिटाला उजवीकडून आगेकूच करीत चेंडू नेटच्या दिशेने मारला. इयन ह्युमने चेंडू नेटमध्ये घालविला, पण त्याने थोडी आधीच धाव घेतली होती. त्यामुळे ऑफसाईडचा इशारा झाला.

तीन मिनिटांनी आदिलने केलेल्या प्रयत्नावर चेंडू थेट पवन कुमारच्या हातात गेला. वास्तविक त्याला हेडिंगवर आणखी सरस प्रयत्न करता आला असता.

]]>

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *