१८८ धावांचा पाठलाग करण्यास उतरलेल्या बटलर-राहणे जोडीने पावरप्लेच्या षटकांत ५९ धावा मारत राजस्थानच्या डावाचा चांगलाच आगाज केला. आपल्या फेव्हरेट वानखेडे मैदानावर खेळणाऱ्या राहाणेने २१ चेंडूंत सहा चौकार व एक षटकार खेचत ३७ धावांचा योगदान दिलं. यात त्याच्या क्लासिक कव्हर ड्राईव्हने मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंचीही वाहवाह मिळवली. राहाणे बाद झाल्यानंतर आलेल्या संजू सॅमसनने बटलरला योग्य साथ देत दुसऱ्या गड्यासाठी ४२ चेंडूंत ८७ धावांची भागीदारी करीत राजस्थानचा विजय निश्चित केला.
फिल्डिंगमध्ये आपली झोप सोडल्यानंतर बटलरने मुंबईच्या गोलंदाजांना चांगलेच पिसून काढले. मुंबईचा युवा गोलंदाज अलझारी जोसेफ, ज्याने इंडियन प्रीमियर लीगच्या आपल्या पहिल्याच सामन्यात १२ धावांत सहा गडी बाद करण्याचा पराक्रम केला होता, त्याच्या तर जणू बटलर हात धुवून मागे पडला होता. रॉयल्सच्या डावातील १३व्या षटकात बटलरने जोसेफला चार चौकार व दोन षटकार खेचत तब्बल २८ धावा ठोकत सामना मुंबईच्या हातातून काढला.
सॅमसन (३१) व स्मिथ (१२) पाठोपाठ बाद झाल्यानंतर राहुल त्रिपाठी (१) व नवखा लायम लिविंगस्टोन (१) यांनाही लवकरच बाद करण्यात कृणाल पांड्या व बुमराला यश आला. पण श्रेयस गोपालच्या चिवट फलंदाजीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने शेवटच्या षटकात विजय साकारला.
तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून अजिंक्य रहाणेने मुंबई इंडियन्सला प्रथम फलंदाजीस आमंत्रित केले. सिद्धेश लाडच्या जागी रोहित शर्मा पुन्हा संघात आल्याने मुंबईची सलामी जोडी आज भक्कम होती. दक्षिण आफ्रिकन क्विंटन डी-कॉक व रोहितने पहिली दोन षटके अगदी सावधरीत्या खेळून काढत तिसऱ्या षटकापासून विरोधी गोलंदाजांवर हल्ला चढवण्यास सुरुवात केली. पहिल्या दोन षटकांत केवळ चार धावा काढलेल्या या जोडीने पुढील तीन षटकांत तब्बल ४४ धावा कुटल्या. पावरप्लेअखेरीस मुंबईने इंडियन्सने बिनबाद ५७ अशी धावसंख्या धावफलकावर लगावली होती.राजस्थान रॉयल्सच्या जवळजवळ सर्वच प्रमुख गोलंदाजांना धारेवर धरले. दुखापतीमुळे मागील सामना मुकलेल्या रोहित शर्माने मुंबई इंडियन्ससाठी कर्णधार म्हणून आज आपला १००वा सामना खेळताना ३२ चेंडूंत ४७ धावांची खेळी करीत पहिल्या गड्यासाठी डी-कॉकसोबत ६५ चेंडूंत ९६ धावांची सलामी दिली. ११व्या षटकात जोफ्रा आर्चरच्या गोलंदाजीवर लॉंग-ऑनला षटकार मारण्याच्या नादात रोहित जोस बटलरकडे झेल देत बाद झाला आणि मुंबईला पहिला धक्का बसला. दमदार सुरुवातीनंतर मुंबई इंडियन्स दोनशेचा आकडा सहज गाठेल असे दिसत होते. परंतु, पहिल्या विकेटनंतर राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांनी मुंबईच्या मधल्या फळीला चांगलेच घेरले. सूर्यकुमार यादव (१६) व कायरान पोलार्ड (६) हे स्वस्तात माघारी परतल्यानंतर धावगतीची जबाबदारी आली ती सलामीवीर डी-कॉकवर. त्याने एक हाती किल्ला लढवीत ५२ चेंडूंचा सामना करीत सहा चौकार व एक षटकार खेचत ८१ धावांचं योगदान दिलं. पण त्याला मधल्या फळीने म्हणावी तशी साथ न दिल्याने मुंबईला समाधानकारक धावसंख्या गाठता आली नाही. ईशान किशनही केवळ पाच धावा काढून तंबूत परतला. पाचव्या क्रमांकावर आलेल्या हार्दिक पांड्याने शेवटी-शेवटी केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने कश्याबश्या १८७ धावा फलकावर लावल्या. हार्दिकने ११ चेंडूंचा सामना करीत एक चौकार व तीन षटकार खेचत नाबाद २८ धावा केल्या. राजस्थान रॉयल्ससाठी आर्चरने सर्वाधिक तीन बळी टिपले तर धवल कुलकर्णी व जयदेव उनादकत यांना प्रत्येकी एक-एक गडी बाद करता आला. इंग्लंड संघासाठी यष्टिरक्षणाची भूमिका बजावणारा जोस बटलर क्षेत्ररक्षणात आज मात्र वेगळ्याच मूडमध्ये दिसत होता. रोहीत शर्मा, डी-कॉक व ईशान किशन यांच्या अफलातून झेल घेत राजस्थान रॉयल्ससाठी मोलाची कामगिरी बजावली.
]]>