भारतीय फलंदाजीचं आणि पुण्याच्या पिचचं जणू वेगळंच नातं आहे. २०१७ कांगारूंनी आणि आता किवींनी कसोटी क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या भारताला मोठा दणका देत मालिका आपल्या खिशात घातली.
पुणे: आयसीसी टेस्ट चॅम्पियन्सशिपच्या अंतिम सामन्यात सलग तिसऱ्यांदा प्रवेश करण्याच्या इराद्याने तयारी करत असलेल्या भारतीय संघाला न्यूझीलंडच्या फिरकीने अक्षरशः आपल्या तालावर नाचवत तीन कसोटी सामान्यांची मालिका २-० अशी नावे केली. बांगलादेशविरुद्ध धडाकेबाज खेळी करणारा भारतीय संघ मात्र या मालिकेतील दोन्ही सामन्यांत सपशेल फेल ठरला. फिरकी गोलंदाजीला चांगल्या खेळणाऱ्या भारतीय फलंदाजांना पहिल्या डावातील केवळ १५६ धावांनंतर पाहुण्यांनी ३५९ धावांचा मोठा पल्ला दिला. पण पुण्याच्या पिचमध्ये असलेली जादू मापण्यात भारतीय फलंदाज पुन्हा एकदा कमी पडले. परिणामी, आणखी एक मानहानीकारक पराभव माथी पडला.
रोहित, विराट, अश्विन, जडेजा अश्या अनुभवी खेळाडूंची स्टारकास्ट असलेला भारतीय संघ घराच्या मैदानावर कसोटी मालिका हरेल हे कोणाच्या ध्यानी-मनीही नसेल. २०१२ला ऍलिस्टर कूकच्या इंग्लंड संघाने भारताला भारतात कसोटी मालिकेत मात दिल्यानंतर कोणत्याच संघाला भारताला हरविणे शक्य झाले नव्हते. अगदी ऑस्ट्रि, दक्षिण आफ्रिकेच्या संघानाही. पण रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघाला एक मानहानीकारक पराभवाला सामोरे जावे लागले. न्यूझीलंडच्या ३५९ धावांच्या टार्गेटच पिच्छा करताना संघ २४५ धावांत बाद झाला आणि किवींनी मालिका आपल्या पदरी पाडून घेतली.
पहिल्या डावातील गळतीनंतर भारत चांगला धडा घेईल असे वाटले होते. परंतु टी-२० मोडमधून भारत बाहेर येण्यास काही तयार नव्हता. ५० चेंडूंत पन्नाशी तर १६व्या षटकात जरी संघाने शंभरी केली असली तरी एक बाजूने विकेट्स जात होत्या. मिचेल सॅन्टेनरने पहिल्या डावातील कामगिरीला ‘रिपीट’ करीत दुसऱ्या डावात सहा असे एकूण १३ बळी घेत भारतीय संघाचे कंबरडे मोडले. मोठ्या धावांचा पाठलाग करत असताना, विशेषतः कसोटी क्रिकेटमध्ये, मोठ्या भागीदारीही आवश्यक असते हि बाब बहुदा भारतीय फलंदाज विसरले. केवळ दुसऱ्या गड्यासाठी ६२ धावांची भागीदारी वगळता एकही मोठी भागीदारी भारतीय संघ करू शकला नाही. शिवाय सलामी फलंदाज यशस्वी जैसवालच्या ७७ धावा सोडल्या तर एकाही फलंदाजाला अर्धशतक करता आले नाही. दुसरीकडे, न्यूझीलंडने दोन्ही डावांत सावध खेळी करीत अनुक्रमे २५९ व २५५ धावा करीत सामन्यावर आपली पकड मजबूत केली.
रोहित, कोहलीच्या फ्लॉप शो नंतर मधली फळीही ढासळली. पाचव्या क्रमांकावर बढती मिळालेला रिषभ पंतही चोरटी धाव घेण्याच्या नादात धावबाद झाला. मागील सामन्यातील शतकवीर सर्फराज खानही या सामन्यात चमक दाखवू शकला नाही. भारताच्या याच कमजोरीचा फायदा पाहुण्यांनी घेत भारतामध्ये आपली पहिली कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम केला.
तेव्हा साळगावकर आता कोण?
२०१७ला जेव्हा भारत याच पुण्याच्या मैदानावर ३३३ धावांनी हारला होता तेव्हा तत्कालीन पीच क्युरेटर पांडुरंग साळगावकर यांना बोर्डाने ‘पीच-फिक्सिंग’च्या नावे निलंबित केले होते. कारण बोर्डाच्या मते त्या सामन्याची पीच खेळण्यास उपयुक्त नव्हती. पण त्याच पिचवर ऑस्ट्रेलियाने जवळपास साडे पाचशे धावा केल्या होत्या. विरुद्ध भारताने जेमतेम दोनशे. यावेळची परिस्थितीही काहीशी तशीच होती. एकीकडे न्यूझीलंड फलंदाजांनी भेटेल त्या संधीतून धावा केल्या तर भारतीय फलंदाजांनी झटपट धावा करण्याच्या नादात एकामागून एक विकेट्स फेकले. यावेळेस मात्र भारताकडे दुसरे साळगावकर नव्हते ज्यांना ते दोष देऊ शकले असते.
रोहित-विराटला उतरती कळा
भारताचे आजी-माजी कर्णधार सध्या कसोटीमध्ये आपल्या ‘बॅड-पॅच’ मधून जात आहेत असे दिसून येते. टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर रोहित शर्मा व विराट कोहली यांची कसोटीतील कामगिरी अगदी सुमार झालेली दिसून येते. रोहित मागील चार कसोटींत आठ डावांमध्ये केवळ १०४ धावा करू शकला आहेत तर दुसरीकडे कोहली, जो पुण्याच्या याच मैदानावर कसोटीला आपली सर्वोत्तम खेळी खेळाला होता; त्याने रोहितपाठोपाठ आठ डावांत केवळ १८७ धावाच केल्या आहेत. मुख्य म्हणजे दोघेही केवळ एकदाच पन्नाशी गाठू शकले आहेत. दोघांचा सध्याचा फॉर्म पाहता पुढील वर्षी होणाऱ्या आयसीसी टेस्ट चॅम्पियन्सशिप स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्याच्या भारताच्या आशा धूसर दिसत आहेत.