पुण्यात दक्षिण कमांडतर्फे विजय दिवस साजरा; वीरांचा सन्मान

Indian Army

पुणे: 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धातील भारताच्या निर्णायक विजयाला 54 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त 16 डिसेंबर 2025 रोजी, पुणे येथील दक्षिण कमांड युद्ध स्मारक येथे आयोजित दिमाखदार सोहळ्यात पारंपरिक लष्करी इतमामात विजय दिवस 2025 साजरा करण्यात आला. लेफ्टनंट जनरल धीरज सेठ, पीव्हीएसएम, एव्हीएसएम, जनरल ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ, दक्षिण कमांड, यांच्या निरीक्षणाखाली हा सोहळा पार पडला. यावेळी भारतीय लष्कर, भारतीय हवाई दल आणि भारतीय नौदलाच्या सेवेतील, तसेच सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

युद्धस्मारकावर आयोजित प्रमुख समारंभात, लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांनी दक्षिण कमांडच्या सर्व श्रेणीच्या वतीने पुष्पचक्र अर्पण केले आणि देशाच्या सार्वभौमत्वाच्या आणि स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या तिन्ही सेना दलांच्या शूर सैनिकांना आदरांजली वाहिली. यावेळी 1971 च्या युद्धातील हुतात्म्यांच्या स्मरणार्थ, त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मौन पाळण्यात आले.

विजय दिनाच्या सोहळ्याचा भाग म्हणून, 1971 च्या युद्धात सहभागी झालेल्या माजी सैनिकांसह, सर्व माजी सैनिकांचा, त्यांची असाधारण सेवा, आणि भारताच्या सर्वात मोठ्या लष्करी विजयांपैकी एक असलेल्या कामगिरीमध्ये दिलेल्या योगदानाबद्दल सन्मान करण्यात आला.  या समारंभात वीर नारींचाही सन्मान करण्यात आला. सशस्त्र दलांच्या नीतिमत्तेचा अविभाज्य भाग असलेले त्यांचे धैर्य, लवचिकता आणि चिरस्थायी बलिदानाची दखल घेण्यात आली. लष्कराचे माजी सैनिक आणि वीर नारी यांचे धैर्य, कर्तव्य निष्ठा आणि त्याग याचा अनेक पिढ्यांचा वारसा जतन करण्याप्रति भारतीय लष्कराची वचबद्धता या सत्कार सोहळ्यामधून प्रतिबिंबित झाली.  

युद्ध स्मारकाशेजारी असलेल्या सदर्न कमांड म्युझियम लॉनमध्ये आर्मी कमांडर, सेवारत कर्मचारी, वीर नारी आणि माजी सैनिक यांच्यातील संवादाने या स्मरणोत्सवाचा समारोप झाला. सेवा, बलिदान आणि विजयाच्या सामायिक वारशाने जोडल्या गेलेल्या सैनिकांच्या अनेक पिढ्या आणि कुटुंबांमधील चिरस्थायी बंध या सोहळ्याने अधिक दृढ केले