नवी दिल्ली: संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या आगामी लोकसभा निवडणुका २०१९ चं वेळापत्रक निवडणुक आयोगानं अखेर जाहीर केलं. देशाच्या १७व्या लोकसभा निवडणुकांचं मतदान एकूण सात टप्प्यांत होणार असून २३ मी रोजी मतमोजणी होणार आहे. संपूर्ण देशभरात ११ एप्रिल २०१९ ते १९ मे २०१९ या कालावधीत एकूण सात टप्प्यांत मतदानाची प्रकिया पार पडणार आहे. महाराष्ट्र या सातपैकी एकूण चार टप्प्यांत मतदान पार पडणार आहे. राज्यात ११, १८, २९, २९ एप्रिल २०१९ रोजी मतदान पार पडणार आहे.
निवडणूक आयोगाचे आयुक्त सुनील अरोरा यांनी पत्रकार परिषद घेत देशवासियांचं लक्ष वेधलेल्या निवडणुकांचं वेळापत्रक जाहीर करीत आजपासून आचारसंहिता लागू झाल्याचीही घोषणा केली. राजधानी दिल्लीतील विधान भवनात निवडणूक आयोगाने हि पत्रकार परिषद घेत हे वेळापत्रक जाहीर केलं. देशभरात लोकसभेच्या एकूण ५४३ जागांसाठी हे मतदान होणार आहे.
पहिल्या टप्प्यात २० राज्यांतील ९१ मतदार संघांत ११ एप्रिलला मतदान होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात मतदान १८ एप्रिलला १३ राज्यांतील ९७ मतदार संघांत, तिसऱ्या टप्प्यात १४ राज्यांतील ११५ मतदार संघांत २३ एप्रिलला, चौथ्या टप्प्याचं मतदान २९ एप्रिलला नऊ राज्यांतील ७१ मतदार संघांत, पाचव्या टप्प्यात ७ राज्यांत ५१ मतदार संघांत ६ मे रोजी, सहाव्या टप्प्याचं मतदान १२ मेला सात राज्यांतील ५९ मतदार संघांत तर सातव्या व अंतिम टप्प्यातील मतदान १९ मे रोजी एकूण आठ राज्यांतील ५९ मतदार संघांत पार पडणार आहे. तर मतदार राजाचा कौल २३ मे रोजी साऱ्या देशाला समजणार आहे. महाराष्ट्रात यातील चार टप्प्यांत मतदान होणार आहे.
निवडणुकांच्या तारखा जाहीर होताच आचारसंहिताही लागू करण्यात आली आहे. तसेच प्रत्येक प्रचार सभेसह सोशल मीडियावरही निवडणूक आयोगाची करडी नजर असणार आहे. फेसबुक ट्विटर, युट्यूब यांसारख्या सोशल मीडिया साईट्सवर पेड न्यूजवर निवडणूक आयोगाची विशेष नजर असणार आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ईव्हीएमची मुव्हमेंट पाहण्यासाठी जीपीएसचा वापर करण्यात येणार आहे. शिवाय, रात्री दहानंतर कोणत्याही प्रचार सभेला परवानगी नसणार आहे. आणि अत्यंत महत्वाचं म्हणजे, रात्री दहा ते सकाळी सहा पर्यंत लाउडस्पीकरचा वापर करता येणार नाही. आचार संहिता भंग करणाऱ्या उमेदवारांवर कठोर कारवाई केली जाणार असून नागरिकही मोबाईल ऍपच्या द्वारे निवडणूक आयोगाकडे थेट तक्रार करू शकतात.
निवडणुकांचं बिगुल वाजलं, महाराष्ट्रात होणार चार टप्प्यांत मतदान
आगामी लोकसभा निवडणुकांचं मतदान महाराष्ट्रात ११, १८, २३ आणि २९ एप्रिलला पार पडणार