महाराष्ट्रात होणार ‘आंतरराष्ट्रीय रामायण महोत्सव’ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

हरियाणातील फरीदाबाद येथे आयेाजित 33 व्या सुरजकुंड आंतरराष्ट्रीय शिल्प मेळ्यातील क्षणचित्रे

नवी दिल्ली: रामायण महाकाव्याने जगाला मुल्य व नवी दिशा दिली. हाच विचार जगभर पोहचविण्यासाठी महाराष्ट्रात ‘आंतरराष्ट्रीय रामायण महोत्सवाचे’ आयोजन करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज ‘सुरजकुंड आंतरराष्ट्रीय मेळ्यात’ केली. या महोत्सवासाठी त्यांनी देश -विदेशातील पर्यटकांना निमंत्रणही दिले.

हरियाणातील फरीदाबाद येथे आयेाजित 33 व्या सुरजकुंड आंतरराष्ट्रीय शिल्प मेळ्याचे उद्घाटन आज मुख्यमंत्री फडणवीस आणि हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या हस्ते झाले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी ही घोषणा केली. याप्रसंगी महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल, हरियाणाचे पर्यटन मंत्री रामबिलास शर्मा, भारतातील थायलंडचे राजदूत चुटिन्ट्रोन गोंगस्कडी यावेळी उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले, ‘रामायण’ हे महाकाव्य जगातील सर्वच लोकांना मार्गदर्शक आहे. वेगवेगळ्या देशातही रामायणाचे सादरीकरण होते. मुख्यत: फिलिपायीन, कंबोडीया, थायलंड या देशातील कलाकारांनी त्यांच्या देशात सादर होणारे ‘रामायण’ या महोत्सवात सादर करावे तसेच भारतातील रामायणाचे सादरीकरण जगभर पोहचावे या माध्यमातून विचारांची देवाण-घेवाण व्हावी हा या महोत्सवाचा उद्देश आहे, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. २५ ते २८ फेब्रुवारी २०१९ या कालावधीत मुंबई येथे हा महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री म्हणाले, हरियाणा आणि महाराष्ट्र यांचे नाते अतूट असून हे ‘माती व रक्ताचे’ नाते आहे. हरियाणाच्या मातीत महाराष्ट्रातील सैन्यानी देश रक्षणासाठी पानिपत युध्दात आपले रक्त सांडले. हा गौरवपूर्ण इतिहास जगापुढे घेऊन जाण्यासाठी हरियाणा सरकारने पुढाकार घेतला आहे. हरियाणा सरकारने पानिपत युध्द स्मारक विकासासाठी सुरु केलेल्या कार्यायाला महाराष्ट्र शासन पूर्ण सहकार्य करेल, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

पर्यटन हा संपूर्ण देशाला एका सुत्रात जोडणारा धागा असून उत्पन्नाचेही उत्तम साधन आहे. सुरजकुंड मेळ्याच्या माध्यमातून देशातील हस्तकलाकारांना मोठी बाजारपेठ उपलब्ध होते. हा मेळा देश-विदेशातील पर्यटकांचेही मोठे आकर्षण आहे. या मेळ्याला भेट देणाऱ्या पर्यटकांनी पानिपत येथील युध्द स्मारकालाही भेट द्यावी अशा भावना मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केल्या. या मेळयात महाराष्ट्राला थीम स्टेटचा मान दिल्याबद्दल त्यांनी आयोजकांचे आभार मानले. तसेच या मेळ्यात सहभागी झालेल्या देश-विदेशातील सर्व कलाकारांना त्यांनी शुभेच्छा दिल्या.

आज सादर झालेला केंद्रीय अर्थसंकल्प देशातील गरीब, सामान्य माणूस, शेतकरी, मध्यमवर्गीय व महिलांसाठी मोठी भेट असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले.

पानिपत युध्द स्मारकासाठी सर्वतोपरी मदत करु – मुख्यमंत्री खट्टर
पानिपतच्या तिसऱ्या युध्दात महाराष्ट्रातील सैनिकांनी प्राणाची बाजी लावून देशाचे संरक्षण केले. या युध्दात पराभव पत्करावा लागला तरी मराठा सैन्यांची शूरगाथा हरियाणा व देशातील जनतेसाठी मोलाची आहे. हरियाणा सरकारने मराठा सैन्याचा हाच गौरवशाली इतिहास लोकांपर्यंत घेऊन जाण्यासाठी पानिपत युध्द स्मारकाचे काम हाती घेतले आहे. या माध्यमातून पानिपत येथील कालाआम परिसरात स्थित ८ एकरावरील जमिनी सोबतच आणखी १२ एकर जमीन खरेदी करुन एकूण २० एकरावर युध्द स्मारक विकासाचे काम सुरु करण्यात येणार आहे. पानिपत येथील जीटी – कर्नाल राष्ट्रीय महामार्गाशेजारी ४ एकरावर ‘लाईट ॲन्ड साऊंड शो’ च्या माध्यमातून पानिपत युध्दाचा गौरवशाली इतिहास दर्शविण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. पानिपत युध्द स्मारक विकासासाठी महाराष्ट्र शासनाने दिलेल्या ३ कोटींच्या निधीबद्दल त्यांनी महाराष्ट्र शासनाचे आभार मानले.

महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांना भेट द्या – जयकुमार रावल
महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी उपस्थिताना संबोधित करताना सांगितले, राज्याचा पर्यटन विभाग पैठणी साडी, वारली पेटींग आदींची ओळख जगाला करुन देण्याचा प्रयत्न करीत आहे. सुरजकुंड मेळ्याच्या माध्यमातून महाराष्ट्रातील गड-किल्ले, गुंफा व अन्य पर्यटनस्थळ प्रदर्शित करण्यात आले आहेत. राज्याच्या हस्तकलाकारांनाही या मेळ्याच्या माध्यमातून जागतिक बाजारपेठ उपलब्ध झाली असल्याचे त्यांनी सांगितले. राज्याला लाभलेला ७५० कि.मी चा समुद्र किनारा, घनदाट जंगल, अजिंठा वेरुळ सारख्या जग प्रसिध्द लेण्या, ३५० गड-किल्ले आदी पर्यटनाची सामर्थ्य स्थळे आहेत. देश विदेशातील पर्यटकांनी महाराष्ट्रातील या पर्यटन स्थळांना भेट द्यावी, असे आवाहन ही त्यांनी यावेळी केले.

यावेळी हरियाणाचे पर्यटन मंत्री रामबिलास शर्मा , भारतातील थायलंडचे राजदूत चुटिन्ट्रोन गोंगस्कडी,. केंद्रीय पर्यटन मंत्रालयाचे सचिव तथा सुरजकुंड प्राधिकरणाचे अध्यक्ष योगेंद्र त्रिपाठी, हरियाणा पर्यटन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव तथा सुरजकुंड मेला प्राधिकरणाचे उपाध्यक्ष विजय वर्धन,महाराष्ट्र राज्य पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव विनीता सिंघल यांनी उपस्थितांना संबोधीत केले.

हरियाणाच्या ‘लूर’ या प्रसिद्ध लोक नृत्याचे सादरीकरण यावेळी झाले. थायलंडच्या कलाकारांनी झायलोफोन वादनाचे सादरीकरण केले तसेच सुरीन प्रोव्हिन्सच्या कलाकारांनी ‘कृतदा हिनिहीन’ लोकनृत्य सादर केले. महाराष्ट्राच्या कलाकारांनी ‘लावणी’ हे प्रसिध्द लोकनृत्य सादर केले.

]]>

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *