मुंबई प्रतिनिधी: मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई, धुरु हॉल ट्रस्ट आणि दादर सार्वजनिक वाचनालय व मराठी विचारधारा प्रतिष्ठान गोरेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने
दिनांक २७ रोजी सायंकाळी ५:३० वाजता छबीलदास रोड, धुरु हॉल येथे कविश्रेष्ठ कुसुमाग्रज जन्मदिन मराठी भाषा गौरवदिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ज्येष्ठ पत्रकार सचिन परब, आमदार आणि मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर, कामगार नेते दिवाकर दळवी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहाणार आहेत.
‘कृत्रिम बुद्धिमत्ता (ए आय ) तंत्रज्ञान मराठी भाषेसाठी किती उपयुक्त’ या विषयावर ३० वर्षे संगणक क्षेत्रात अध्यापन करणारे सुप्रसिद्ध भानुदास साटम यांचे व्याख्यान होणार आहे. त्याचप्रमाणे संघाच्या वतीने घेण्यात आलेल्या आणि महाराष्ट्र तसेच इतर राज्यातून व अमेरिका, शिकागो, सिंगापूर येथून आलेल्या ४९ व्या राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेचा तसेच “अभिजात मराठी भाषा चला ज्ञानभाषा करूया” या लेखस्पर्धेचे पारितोषिक वितरण होणार आहे.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी चितळे बंधू उद्योगाचे सहकार्य लाभले आहे. अधिक माहितीसाठी संघाध्यक्ष रवींद्र मालुसरे यांच्याशी ९३२३११७७०४. या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन प्रमुख कार्यवाह प्रशांत घाडीगावकर यांनी केले आहे.