राजापूर, प्रतिनिधी : नगरपरिषद निवडणुकीसाठी हिंदू महासभेने नगराध्यक्ष पदासाठी वैद्य ज्योती सुनील खटावकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
समाजसेवा, आरोग्य संवर्धन आणि स्वदेशी संस्कार यासाठी कार्यरत असलेल्या खटावकर या राजापूर शहरात योग शिक्षिका म्हणून कार्यरत असून, पतंजली आयुर्वेद क्षेत्रातही त्यांनी उल्लेखनीय योगदान दिले आहे.
देशी गाईंचे संगोपन, त्यांच्यापासून तयार होणाऱ्या शेण-गोमूत्रावर आधारित ‘जीवामृत’ निर्मिती आणि विषमुक्त शेतीचे मार्गदर्शन हे त्यांचे विशेष कार्यक्षेत्र आहे. पर्यावरण संवर्धनासाठी प्लास्टिक मुक्त भारत अभियानात त्या सक्रिय असून, कापडी पिशव्यांच्या वापरास प्रोत्साहन देतात.
राजापूर शहरात योग प्रशिक्षणाद्वारे आरोग्य जागरूकता निर्माण करणे, हिंदू समाजामध्ये धर्मप्रबोधन करणे, तसेच सर्व जाती-धर्मातील रुग्णांना उपचार आणि मार्गदर्शन देणे, अशी विविध सामाजिक क्षेत्रातील सेवा खटावकर यांनी दिली आहे.
त्यांचा परिसरात दांडगा संपर्क असून, सर्व समाजघटकांमध्ये त्यांचे कार्य व्यापक पातळीवर पोहोचले आहे. त्यांच्या या सर्वसमावेशक कार्याचा विचार करून हिंदू महासभेने त्यांना राजापूर नगरपरिषद २०२५ च्या नगराध्यक्ष पदासाठी अधिकृत उमेदवार म्हणून घोषित केले आहे.