मुंबई इंडियन्सने पहिला सामना थाटामाटात जिंकूनही वानखेडेवर पंजाब किंग्सविरुद्ध एकतर्फी झालेल्या सामन्यात ३ गड्यांनी सलग चौथा पराभव स्वीकारला.
मुंबई (भास्कर गाणेकर): दुष्काळात तेराव्या महिन्यात जगणाऱ्या मुंबई इंडियन्सला मुंबईकर श्रेयस अय्यरच्या पंजाब किंग्सने धु-धु धुवत ३ विकेट्सने पराभूत करत २०२६च्या आयपीएलमधील सलग चौथ्या पराभवाला सामोरे जावे लागले. १९६ धावांचा पाठलाग करणाया उतरलेल्या पंजाबने पहिल्याच षटकात दीपक चहरला २१ धावा ठोकत सापळे मनसुबे स्पष्ट केले होते. त्याला प्रभसिमरन सिंग व श्रेयस अय्यरच्या दमदार खेळीने चार चांद लगावत १७व्या षटकात अगदी आरामात लक्ष्याचा पाठलाग करत आपली विजयी घोडदौड सुरु ठेवली.
पावरप्लेमध्ये गझनफरने दोन गडी बाद केल्यानंतर मुंबई इंडियन्स पंजाबला टक्कर देईल असे वाटत होते. परंतु कसलेला कर्णधार श्रेयस अय्यरने सलामीवीर प्रभसिमरनच्या जोडीने मोर्चा आपल्या हाती घेत तिसऱ्या गड्यासाठी १३९ धावांची भागीदारी रचित सामन्याचे चित्रच पालटून टाकले. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत अगोदरच कमकुवत असलेल्या मुंबईला पंजाब किंग्सने चांगलेच झोडून काढले. प्रभसिमरनने केवळ २३ चेंडूंत आपले अर्धशतक लागवल्यानंतर श्रेयसनेही सलग दुसरे अर्धशतक पटकावले. श्रेयसला अखेर शार्दूल ठाकूरने ६६ धावांवर बाद केले. परंतु तोपर्यंत फारच उशीर झाला होता. प्रभसिमरन ११ चौकार व दोन षटकार खेचत ८० धावांवर नाबाद राहिला.
भारताचा आघाडीचा डावखुरा गोलंदाज अर्शदीप सिंगने पंजाब किंग्सला धडाकेबाज सुरुवात करून देत अगोदरच चाचपडत खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सला सलग दोन धक्के दिले. सलामीवीर रायन रिकेलटन (२) व सूर्यकुमार यादव (०) यांना तिसऱ्या षटकात बाद करीत आयपीएलमधील आपला १०० वा बळीही टिपला. नमन धीरला चौथ्या क्रमांकावर बढती देत उजव्या-डाव्या फलंदाजांची जोडी मुंबईने धावपट्टीवर चालू ठेवत धावांची गती वाढवण्यावर भर दिला. नमनला १० धावांवर चहलने जीवदान देत जणू मुंबईला गिफ्ट दिले.
एकेकाळचा मुंबई इंडियन्सचा भरवश्याचा सलामीवीर पाहिल्या जाणाऱ्या क्विंटन डी-कॉकने घरवापसी चांगल्या प्रकारे करत एका बाजूने मुंबईसाठी किल्ला लढवला. २८ चेंडूंत आपले अर्धशतक पूर्ण करत त्याने संघाला मोठ्या धावसंख्येकडे आगेकूच केले. नमनेही दुसऱ्या संधीचे सोने करत आयपीएलमधील आपले दुसरे अर्धशतक लगावत डी-कॉकसोबत तिसऱ्या गड्यासाठी ६८ चेंडूंत १२२ धावांची भागीदारी करीत मुंबईला काढले. शशांक सिंगने आपली कामचलाऊ गोलंदाजी करत नमनचा अडथळा दूर केला. नमनने तीन चौकार व तीन षटकार खेचत ५० धावांचे योगदान दिले.
पावरप्लेमध्ये दोन गडी गमावलेल्या मुंबई इंडियन्सने सावध पवित्रा घेतल्यानंतर मधल्या षटकांत वरचढ फलंदाजी केली. युझवेन्द्र चहलला टार्गेट करत त्याच्या तीन षटकांत ४५ धावा कुटल्या. डी-कॉकने यंदाच्या हंगामातील पहिलाच सामना खेळताना मुंबई इंडियन्ससाठी आपले पहिलेच तर आयपीएल कारकिर्दीतील तिसरे शतक ठोकले. हार्दिकसोबत चौथ्या गड्यासाठी ४१ धावांची भागीदारी केल्यानंतर मुंबई दोनशेचा आकडा सहज गाठेल असेल वाटत होते. परंतु मार्को यान्सन व अर्शदीपने डेथ ओव्हर्समध्ये चतुर गोलंदाजी करीत मुंबईला तो आकडा गाठू दिला नाही. डी-कॉकने ६० चेंडूंत आठ चौकार व सात षटकार खेचत नाबाद ११२ धावांची खेळी तर पंजाब किंग्ससाठी अर्शदीपने तब्बल १३ निर्धाव चेंडू टाकत केवळ २२ धावांत ३ गडी गारद करीत मुंबईला १९५ धावांत रोखले.
मुंबई इंडियन्सचा संघ कागदावर जरी तगडा दिसत असला तरी प्रमुख खेळाडूंच्या ‘आउट ऑफ फॉर्म’ ची चिंता त्यांना सामन्यागणिक सतावत आहे. सूर्यकुमार यादवचा फॉर्म, बुमराची फिकी गोलंदाजी आणि संघातील ताळमेळ त्यांना खूपच संकटात घेऊन जात आहे. त्यात रोहित शर्माची दुखापत त्यांच्यासाठी डोकेदुखी ठरत आहे. पाच वेळेचा चॅम्पियन मुंबई इंडियन्स मागील पाच-सहा वर्षांत म्हणावा तितका गरजला नाही. शिवाय हार्दिक पंड्याचे निर्णय संघासाठी फलदायी ठरलेले दिसत नाही. मुंबई इंडियन्सला स्पर्धेत आपले अस्तित्व टिकून ठेवण्यासाठी उर्वरित सामन्यात दमदार कमबॅक करून एकामागोमाग एक असे सामने जिंकावे लागणार आहेत.
