जयपूर: कर्णधार शार्दुल ठाकूरचा भेदक मारा आणि शम्स मुलाणीच्या फिरकीच्या जोरावर मुंबईने विजय हजारे करंडक (२०२५-२६) स्पर्धेत आपला धडाका कायम ठेवला आहे. ‘एलिट क’ गटातील सामन्यात सोमवारी मुंबईने छत्तीसगडचा ९ गडी राखून धुव्वा उडवला आणि स्पर्धेतील सलग तिसरा विजय नोंदवत गुणतालिकेत अव्वल स्थान भक्कम केले.
शार्दुल आणि शम्सचा कहर जयपूरिया विद्यालय ग्राउंडवर झालेल्या या सामन्यात मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. कर्णधार शार्दुल ठाकूरने आपल्या पहिल्याच स्पेलमध्ये छत्तीसगडच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. त्याने अवघ्या ५ षटकांत १३ धावा देत ४ बळी टिपले. शार्दुलच्या या तडाख्यामुळे छत्तीसगडची अवस्था ५ व्या षटकात ४ बाद १० अशी दयनीय झाली होती.
त्यानंतर फिरकीपटू शम्स मुलाणीने आपली जादू दाखवली. त्याने ९.१ षटकांत ३१ धावा देत ५ गडी बाद केले आणि छत्तीसगडचा डाव अवघ्या १४२ धावांवर गुंडाळला. छत्तीसगडकडून कर्णधार अमनदीप खरे (६३) आणि अजय मंडल (४६) यांनी पाचव्या विकेटसाठी १०५ धावांची भागीदारी करत संघाला सावरण्याचा प्रयत्न केला, पण इतर कोणत्याही फलंदाजाला दुहेरी धावसंख्याही गाठता आली नाही.
अंकृश आणि सिद्धेशची अर्धशतकी खेळी विजयासाठी १४३ धावांचे माफक लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या मुंबईने हे आव्हान २४ षटकांत १ गडी गमावून सहज पार केले. सलामीवीर ईशान मूलचंदानी १९ धावांवर बाद झाला. मात्र, त्यानंतर आलेल्या सिद्धेश लाडने आणि अंकृश रघुवंशीने बाजी मारली. अंकृशने ६६ चेंडूत ६ चौकार आणि २ षटकारांसह नाबाद ६८ धावांची खेळी केली, तर अनुभवी सिद्धेश लाडने ४२ चेंडूत नाबाद ४८ धावा केल्या. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी अभेद्य १०२ धावांची भागीदारी करत मुंबईला विजय मिळवून दिला.
रोहित शर्माची अनुपस्थिती विशेष म्हणजे, भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा या सामन्यासाठी उपलब्ध नव्हता, तो पहिल्या दोन सामन्यानंतर घरी परतला होता. त्याच्या अनुपस्थितीतही मुंबईने एकतर्फी विजय मिळवत आपली ताकद सिद्ध केली आहे.
