महिला विश्वचषकातील महाराष्ट्राच्या तीन खेळाडूंचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ७ नोव्हेंबर सत्कार होणार आहे.
मुंबई (भास्कर गाणेकर): महाराष्ट्र सरकारने विजेत्या भारतीय महिला संघाचा भाग असलेल्या राज्यातील खेळाडूंचा सत्कार करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ७ नोव्हेंबर रोजी मुंबईत एका कार्यक्रमात त्यांचा सन्मान करतील.नेरुळ, नवी मुंबई येथे झालेल्या विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेवर ५२ धावांनी विजय प्राप्त करीत पहिल्यांदाच विश्वचषकावर आपले नाव कोरले होते. बीसीसीआयने महिलांच्या या कामगिरीवर खुश होत तब्बल ५१ कोटींचे बक्षीस जाहीर केले होते. त्याच्यात भर म्हणून महाराष्ट्र सरकारनेही आपल्या राज्यातील खेळाडूंना बक्षीस जाहीर करून त्यांचा गुणगौरव करण्याचा निर्णय घेतला आहे.
विश्वचषक जिंकून इतिहास रचणाऱ्या १५ खेळाडूंच्या संघात उपकर्णधार आणि सलामीवीर स्मृती मानधना, फलंदाज जेमिमा रॉड्रिग्ज आणि फिरकी गोलंदाज राधा यादव यांचा समावेश होता. तिन्ही खेळाडूंचा जन्म मुंबईत झाला आहे. राज्य सरकारकडून सन्मानित करण्यात येणाऱ्यांमध्ये अमोल मुझुमदार (मुख्य प्रशिक्षक) आणि आविष्कार साळवी (गोलंदाजी प्रशिक्षक) हे दोघेही मुंबईचे माजी खेळाडू आहेत. मुझुमदार हे मुंबई क्रिकेटचे दिग्गज आहेत आणि मुंबईचे माजी गोलंदाज साळवी यांनी भारताकडून चार एकदिवसीय सामने खेळले आहेत.
मुंबईतील ममता शिरसुल्ला आणि पूर्वा काटे या दोघीही सपोर्ट स्टाफचा भाग होत्या आणि त्यांनाही सन्मानित केले जाईल. तसेच संघाचे कामगिरी विश्लेषक अनिरुद्ध देशपांडे, जे अमरावतीचे आहेत, त्यांचाही सन्मानया कार्यक्रमात केला जाईल.
