भास्कर गाणेकर: १९९० साली रिलीज झालेल्या ‘अप्पू राजा’ (हिंदी अनुवादित) चित्रपटातील हे अजरामर गीत आजही साऱ्या देशात वाजवले जाते. कमल हसन यांच्या या चित्रपटात प्रसिद्ध गायक एस. पी. बालसुब्रमण्यम यांच्या खास शैलीत गायले गेलेले हे गीत विराट कोहलीच्या रविवारच्या शतकीय खेळीला अगदी सूट करते. ‘शेरों का मैं हूं शेर यारो, अरे कोई ना मुझ सा दलेर प्यारो।’ या ओवींचा समस्त भारतीयांना अनुभव देत त्याने रांचीचे मैदान ज्या प्रकारे गाजवले त्यावरून त्याची क्रिकेट विश्वातील दिलेरी आणि राजेशाही थाट पुन्हा एकदा जिवंत झाला असेच म्हणता येईल.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या शेवटच्या टप्प्यावर आलेल्या विराट कोहलीला ऑस्ट्रेलिया दौऱ्यात फारसी चमकदार कामगिरी करता आली नव्हती. मुळात केवळ एकदिवसीय क्रिकेट खेळणाऱ्या विराट कोहलीची ऑस्ट्रेलिया सिरीज शेवटची असेल असे बऱ्याच मीडिया हाऊसने लिहिलेही होते. भरीला भर म्हणून पहिल्या दोन सामन्यात भोपळाही न फोडता त्याला माघारी परतावे लागले होते. पण सिडनीच्या शेवटच्या सामन्यात नाबाद अर्धशतक झळकावून त्याने पुन्हा फाईन फॉर्ममध्ये आल्याचे संकेत दिले. त्याचा हा फाईन फॉर्म त्याने रविवारी झालेली दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात ५२ वे एकदिवसीय शतक झळकावत या फॉरमॅटचा आपण राजा का आहोत हे दाखवून दिले.
“मी आधीही सांगितले आहे की जर मला कुठेतरी पोहचायचे असेल तर मी १२०% वर पोहोचेन. मी इथे लवकर आलो कारण मला परिस्थिती थोडीशी समजून घ्यायची होती. दिवसात दोन सत्रे फलंदाजी करायची होती आणि संध्याकाळी एक सत्र, त्यामुळे माझे तयारीचे काम पूर्ण झाले. मी ३७ वर्षांचा असल्याने खेळापूर्वी एक दिवस सुट्टी घेतली. मला रिकव्हरीकडे लक्ष द्यावे लागेल. मी माझ्या मनात खेळाचे खूप चित्रण करतो. जर मी स्वतःला तितकाच तीव्र, तीक्ष्ण, क्षेत्ररक्षणात तत्पर आणि गोलंदाजांना तोंड देत असल्याचे पाहतो, तर मला माहित आहे की मी चांगल्या स्थितीत आहे आणि मी थोडा आराम करतो आणि तिथे खेळतो.” हे बोल होते कोहलीचे जेव्हा त्याला सामनावीराचा पुरस्कार बहाल करण्यात आला. आज जरी तो ३७ वर्षांचा असला तरी एखाद्या तरुणाला लाजवेल अशी कामगिरी मैदानात करतो. मग ती फलंदाजी असो वा क्षेत्ररक्षण. त्याची क्रिकेटची भूक आजही तशीच आहे. आणि याच गोष्टी एखाद्या खेळाडूला ‘राजा माणूस’ बनवतात. जिवंत उदाहरण म्हणजे महान सचिन तेंडुलकर.
क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे आपणा सर्वांना माहित आहे. खेळाडूचा फॉर्म कधी असेल, कधी नसेल हे काळच ठरवतो. विराटच्या बाबतीतही तसेच झाले. २०११ ते २०१९ च्या सुवर्ण काळात त्याने ना केवळ चांगली फलंदाजी केली तर भारताला परदेशात जिद्दीने खेळून जिंकूनही दाखवले. २०१७ साली तिन्ही फॉरमॅटचे कर्णधारपद मिळाल्यानंतर त्याचा खेळ आणखी बहराला आणि पांढऱ्या चेंडूंचा बादशाह अशी त्याची आगळी-वेगळी ओळख निर्माण झाली. २०१७, २०१८ व २०१९ या तीन वर्षांत एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने तब्बल १७ शतके लागावात एक नाव विक्रम केला. २०१७ ची विश्वचषक स्पर्धेत जरी भारताला अंतिम फेरीपर्यंत पोहचू शकला नसला तरी त्याने संघात निर्माण केलेली एकी आणि भारतीय संघाला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील दबदबा वाखाण्याजोगे होता.
कोरोना महामारीमुळे विराटच्या कारकिर्दीवर जणू ग्रहणच लागले. पहिल्यांदा २०२१ च्या टी-२० विश्वचषकानंतर त्याने त्या प्रकारातील कर्णधारपद सोडले. त्याच वर्षी एकदिवसीय क्रिकेटचे कर्णधारपदी त्याला सोडण्यास बीसीसीआयने भाग पडले. महिन्याभरात लगेचच कसोटी कर्णधारपदाला रामराम ठोकत त्याने फक्त खेळाडू म्हणून संघात आपली भूमिका बजावली. मुळात बोर्डाच्या अंतर्गत वादाचा फटका विराटला सहन करावा लागला आणि एक महत्वाकांक्षी कर्णधार भारताने गमावला. २०२० ते २०२२ या तीन वर्षांच्या कालावधीत त्याची कामगिरी इतकी खालावली कि त्याला एक-एक धावेसाठी अक्षरशः संघर्ष करावा लागला. २०२०-२०२१ या दोन वर्षांत त्याने १२ सामन्यांत एकदाही तिहेरी आकडा गाठला नाही. तर २०२२ मध्ये सरते शेवटी एक शतक करत काही अंशी दुष्काळ संपवला. पण २०२४ मध्ये केवळ तीन सामने खेळलेल्या विराटला फक्त ५८ धावा करता आल्या. त्यामुळे त्याच्या एकदिवसीय संघातील समावेशावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले.
विराटसारखे खेळाडू हे एका पिढीतून एकदाच निर्माण होतात. निर्माण होताना त्यांनी घेतलेली मेहनत, परिश्रम लोकांना फार कमी दिसतात. संघाच्या उभारणीसाठी घेतलेली मेहनत, स्वतःच्या खेळात आणि वैयक्तिक आयुष्यात केलेली तडजोड खेळाडूला महान बनवतात. विराटने स्वतःमध्ये आमूलाग्र बदल घडवून फिटनेसमध्ये एक उदाहरण निर्माण केले. त्याच्याच जोरावर त्याने आपला खेळ बहरवला आणि महान खेळाडूंच्या यादीत आपले नाव मिळवले. पण काही सामन्यांतील निराशजनक कामगिरीमुळे त्याच्या संघात असण्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थतीत केले आणि त्याला संघातून बाहेर काढा असाही फुकटचा सल्ला दिला. विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शतक लगावून टीकाकारांचे तोंड चांगलेच गप्प केले. ३७ व्या वर्षातही एका २०-२२ वर्षाच्या तरुणाइतकी ऊर्जा घेऊन मैदानात उतरत १००% हुन अधिक खेळ तो दिवसेंदिवस करतो. पुढील काही सामन्यांत त्याने जर असाच फॉर्म ठेवला तर २०२७ एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेपासून त्याला कोणीच रोखू शकत नाही असेच सध्यातरी दिसते.
