विंटेज रोहित-विराटने दिला भारताला विजय

Rohit Sharma and Virat Kohli

रोहित शर्माने नाबाद १२१ धावा केल्या आणि विराट कोहली ७४ नाबाद राहिला, ज्यामुळे भारताने ऑस्ट्रेलियावर नऊ गडी राखून विजय मिळवला. हर्षित राणाने ३९ धावांत ४ बळी घेत ऑस्ट्रेलियाला २३६ धावांत गारद केले.

सिडनी (प्रतिनिधी): सिडनी क्रिकेट मैदानावरील बहुसंख्य प्रेक्षकांना त्यांना हवे ते पाहायला मिळाले, कारण रोहित शर्मा आणि विराट कोहली — जे कदाचित ऑस्ट्रेलियामधील त्यांच्या शेवटच्या सामन्यांमध्ये खेळत होते — यांनी भारताला दिला दिलासा देणारा नऊ विकेट्सचा विजय मिळवून दिला आणि मालिकेत व्हाईटवॉश होण्यापासून वाचवले.

ऍडलेडमध्ये केलेल्या लढाऊ ७३ धावांच्या खेळीवर आधारित खेळ करत, रोहितने १०५ चेंडूत आपले ३३वे एकदिवसीय शतक झळकावले — जे ऑस्ट्रेलियाविरुद्धचे त्याचे नववे शतक ठरले — तर मालिकेच्या सुरुवातीला दोन वेळा शून्यावर बाद झालेल्या कोहलीने तब्बल ४० हजारांहू अधिक प्रेक्षकांसमोर नाबाद ७४ धावा करत प्रत्युत्तर दिले. बहुतेक प्रेक्षक त्यांच्या प्रत्येक फटक्यावर आनंद व्यक्त करत होते.

या दोघांनी, ज्यांच्या नावावर मिळून २६,००० हून अधिक एकदिवसीय धावा आहेत, १७० चेंडूत १६८ धावांची नाबाद भागीदारी करत भारताला विजयाच्या उंबरठ्यावर नेले. रोहितने चौफेर आतिषबाजी करत लक्ष्य जवळ आणले, आणि अखेर कोहलीने नाजूक थर्ड मॅनकडे खेचलेला फटका मारून सामना जिंकला.

ऑस्ट्रेलियाने १८३ धावांत ३ गडी राखून चांगली स्थिती गाठल्यानंतर ५३ धावांत ७ गडी गमावले आणि अखेरीस २३६ धावांवर सर्वबाद झाले. अशा परिस्थितीत भारताने प्रभावी कामगिरी करत वर्चस्व गाजवले. मॅट रेनशॉने आपल्या वनडे कारकिर्दीतील पहिल्या अर्धशतकाच्या जोरावर संघाला भक्कम सुरुवात करून दिली होती. पण कोणीही मोठी खेळी उभारू शकला नाही. हर्षित राणाने आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम ३९ धावांत ४ बळी घेतले, तर भारताच्या तिन्ही फिरकीपटूंनी उत्कृष्ट गोलंदाजी केली.

रोहित आणि शुभमन गिल यांनी भारताच्या धावांचा पाठलाग उत्तमरीत्या सुरू केला. दोघेही संघासाठी आवश्यक ते करत असताना, विराट कोहलीसाठी प्रेक्षकांच्या आरोळ्या अधिकाधिक वाढत गेल्या. गिलने कूपर कॉनॉलीच्या चेंडूवर षटकार ठोकल्यानंतर लगेचच जोश हेजलवुडकडे झेल दिला, आणि मग रंगमंच सज्ज झाला.

कोहली जेव्हा ड्रेसिंग रूममधून मैदानात आला तेव्हा प्रचंड जल्लोष झाला, पण त्याच्या पहिल्याच चेंडूवर मिड-ऑनच्या बाहेरून एक चोरटी धाव घेतली, तेव्हा आनंदाचा आणि गर्जनांचा आवाज आणखी वाढला. कोहलीने स्मित हास्यासह आणि मुठ घट्ट आवळत त्या क्षणाचा आनंद घेतला.

तेथून पुढे, नेहमीप्रमाणेच कोहलीचा तोच अवतार दिसला. मिचेल स्टार्कच्या चेंडूवर त्याने मारलेला सरळ ड्राइव्ह खास ठरला. जरी तो ३६ धावांवर नाथन एलिसविरुद्धच्या पायचीत अपीलमधून थोडक्यात बचावला.

रोहितच्या खेळीतील एक ठळक क्षण म्हणजे अ‍ॅडम झॅम्पाविरुद्ध मारलेला इनसाइड-आऊट फटका जो थेट षटकार गेला. त्यानंतर त्याने लेगस्पिनरविरुद्ध स्लॉग स्वीपने आणखी एक षटकार जोडला. त्याचे शतक साध्या पद्धतीने आले. लाँग-ऑफकडे एक ड्राइव्ह आणि नंतर प्रेक्षकांकडे हलक्या हाताने बॅट उंचावून अभिवादन.

मालिका आधीच जिंकलेली असतानाही, ऑस्ट्रेलियाने हॅझलवूड किंवा मिचेल स्टार्कला विश्रांती दिली नाही. त्यांनी मिळून फक्त ११ षटकं टाकली. हॅझलवूड पुन्हा उत्कृष्ट होता. पण सामना जवळपास निश्चित झाल्यावर त्यांना पुन्हा गोलंदाजीसाठी आणले नाही, कदाचित पुढील योजनांचा विचार करून. झेव्हियर बार्टलेटच्या जागी आलेल्या एलिससाठी मात्र ही रात्र कठीण ठरली.

नाणेफेक जिंकल्यावर मिचेल मार्शने फलंदाजीचा निर्णय घेतला, ज्यामुळे भारत सलग १८ वेळा वनडे सामन्यांमध्ये नाणेफेक गमावली. मार्श आणि ट्रॅव्हिस हेड; ज्याने डावांच्या संख्येनुसार ३००० वनडे धावा पूर्ण करणारा ऑस्ट्रेलियाचा सर्वात वेगवान फलंदाज होण्याचा मान मिळवला, या दोघांनी पहिल्या दहा षटकांत वेग वाढवला. मार्शने प्रसिध कृष्णाच्या डावातील पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकला आणि त्या षटकात १३ धावा झाल्या.

संक्षिप्त धावफलक:

ऑस्ट्रेलिया २३६/१० (४६.४) – मॅट रेनशॉ ५६, हर्षित राणा ४-३९

भारत २३७/१ (३८.३) – रोहित शर्मा १२१*, विराट कोहली ७४*

भारत नऊ गडी व ६९ चेंडू राखून विजयी 

ऑस्ट्रेलिया २-१ ने मालिका विजयी