वैभव सूर्यवंशीचे वादळी शतक; भारताची आशिया चषकात विक्रमी सलामी

Vaibhav Suryavanshi

दुबई: १९ वर्षांखालील आशिया चषक (U-19 Asia Cup) स्पर्धेत भारतीय संघाने यजमान युएईचा २३४ धावांनी धुव्वा उडवत स्पर्धेची दिमाखदार सुरुवात केली आहे. या विजयाचा शिल्पकार ठरला तो भारताचा १४ वर्षीय युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी, ज्याने आपल्या आक्रमक फलंदाजीने क्रिकेट विश्वाचे लक्ष वेधून घेतले. वैभवने केवळ ९५ चेंडूंचा सामना करत १७१ धावांची ऐतिहासिक खेळी साकारली. त्याच्या या खेळीत ९ खणखणीत चौकार आणि तब्बल १४ उत्तुंग षटकारांचा समावेश होता. यासह वैभवने १९ वर्षांखालील वनडे क्रिकेटमध्ये एका डावात सर्वाधिक षटकार मारण्याचा विश्वविक्रम आपल्या नावावर केला. त्याने ऑस्ट्रेलियाच्या मायकेल हिलचा (१२ षटकार) आणि आशिया चषकातील अफगाणिस्तानच्या दरविश रसूलीचा (१० षटकार) विक्रम मोडीत काढला. ही भारतीय १९ वर्षांखालील क्रिकेटमधील दुसरी सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या ठरली असून, २००२ मध्ये अंबाती रायुडूने केलेल्या १७७ धावांच्या विक्रमाच्या तो अगदी जवळ पोहोचला होता.

नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीस आलेल्या भारतीय संघाची सुरुवात अडखळती झाली, कर्णधार आयुष म्हात्रे अवघ्या ४ धावांवर बाद झाला. मात्र, त्यानंतर वैभवने मैदानाचा ताबा घेतला. त्याने ५६ चेंडूंत शतक झळकावले आणि आरोन जॉर्जसोबत (६९ धावा) दुसऱ्या विकेटसाठी २१२ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. विहान मल्होत्रानेही ५५ चेंडूंत ६९ धावा करत भारताला ४०० चा टप्पा ओलांडून दिला. भारताने निर्धारित ५० षटकांत ६ बाद ४३३ धावांचा डोंगर उभा केला, जी या स्पर्धेच्या इतिहासातील सर्वोच्च सांघिक धावसंख्या आहे. सामन्यादरम्यान युएईच्या यष्टिरक्षकाने केलेल्या स्लेजिंगला वैभवने “मी बिहारचा आहे, पाठीमागून कोण काय बोलतं याचा मला फरक पडत नाही,” असे म्हणत चोख प्रत्युत्तर दिले.

४३४ धावांच्या महाकाय आव्हानाचा पाठलाग करताना युएईचा संघ दडपणाखाली दिसला. भारतीय गोलंदाजांनी अचूक टप्प्यावर मारा करत त्यांना ५० षटकांत ७ बाद १९९ धावांवर रोखले. युएईकडून उद्दिश सुरीने (७८*) आणि पृथ्वी मधूने (५०) थोडा प्रतिकार केला, परंतु भारताचा विजय निश्चित होता. या मोठ्या विजयासह भारताने स्पर्धेत आपली दावेदारी सिद्ध केली आहे.