बुलावायो: आयसीसी १९ वर्षांखालील पुरुष क्रिकेट विश्वचषकात भारतीय संघाने आपल्या पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा ५८ धावांनी पराभव करत दिमाखात उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. ‘सुपर सिक्स’ फेरीतील गट २ मधील या अत्यंत महत्त्वाच्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना २५२ धावांचे आव्हान ठेवले होते, ज्याचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ १९४ धावांत गारद झाला.
वेदांत त्रिवेदीची संयमी खेळी नाणेफेकीचा कौल गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीस आलेल्या भारतीय संघाची सुरुवात संमिश्र झाली. मात्र, वेदांत त्रिवेदीने ९८ चेंडूंत ६८ धावांची महत्त्वपूर्ण खेळी करत डावाला आकार दिला. त्याला कनिष्क चौहानने २९ चेंडूंत ३५ धावा करून चांगली साथ दिली. या सांघिक कामगिरीच्या जोरावर भारताने ४९.५ षटकांत सर्वबाद २५२ धावांपर्यंत मजल मारली. पाकिस्तानकडून अब्दुल सुभानने ३३ धावांत ३ बळी घेतले, तर मोहम्मद सय्यामने २ गडी बाद केले.
आयुष म्हात्रे आणि खिलन पटेलचा भेदक मारा २५३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या पाकिस्तान संघाला भारतीय गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच दडपणाखाली ठेवले. पाकिस्तानकडून उस्मान खानने एकाकी झुंज देत ९२ चेंडूंत ६६ धावांची खेळी केली आणि हमजा जहूरने ४२ धावांचे योगदान दिले. मात्र, इतर कोणत्याही फलंदाजाला खेळपट्टीवर टिकता आले नाही.
भारताच्या आयुष म्हात्रेने ८ षटकांत केवळ २१ धावा देत ३ महत्त्वाचे बळी टिपले. त्याला खिलन पटेलने ३५ धावांत ३ बळी घेत उत्तम साथ दिली. भारतीय गोलंदाजांच्या या शिस्तबद्ध आक्रमणासमोर पाकिस्तानचा डाव ४६.२ षटकांत १९४ धावांवर संपुष्टात आला.
