मुंबईचा धुमधडाका, हरियाणाला केले पराभूत

Yashasvi Jaiswal shares his Player of the Match award with Sarfaraz Khan

सय्यद मुस्ताक अली चषक: यशस्वी जयस्वालच्या शतकाने केला २३४ धावांचा सहज पाठलाग

पुणे (भास्कर गाणेकर): बाद फेरीच्या महत्वपूर्ण सामन्यात मुंबईने हरियाणाच्या २३४ धावांचा पाठलाग चार गडी व तब्बल १५ चेंडू राखत परत करत स्पर्धेतील आपल्या आशा जिवंत ठेवल्या. उभय संघातील टी-२० सामन्यात ४७२ धावा होत नवा विक्रम झाला.

शार्दूल ठाकूरने नाणेफेक जिंकत हरियाणाला फलंदाजीस पाचारण केले. हैद्राबादविरुद्ध झालेल्या पराभवामुळे मुंबईला या सामन्यात विजय मिळवून आपले आव्हान टिकून ठेवणे जिकरीचे होते. हरियाणाने तुफानी सुरुवात करत मुंबईच्या गोलंदाजांची अक्षरशः पिसे काढली. हरियाणाचा कर्णधार अंकित कुमारने ४२ चेंडूंत दहा चौकार. व सहा षटकार ठोकत ८९ धावांची कप्तानी पारी खेळात हरियाणाला २०० धावांचा पल्ला गाठून दिला. निशांत सिंधूनेही आपल्या कर्णधाराला साथ देत ३८ चेंडूंत चार चौकार व तीन षटकार खेचत ६३ धावांची खेळी केली. सुमित कुमारने चार चेंडूंत चार चौकार खेचत धावांचा आकडा २३४ वर नेला.

मुंबईने धावांचा पाठलाग अगदी शिस्तबद्द पद्धतीने केला. भारताचा सुपरस्टार यशस्वी जयस्वाल व माजी कर्णधार अजिंक्य राहाणेने तिसऱ्या षटकातच पन्नाशी गाठून देत आपले मनसुबे स्पष्ट केले. अजिंक्य २१ धावांवर बाद झाल्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या सर्फराज खानने आतिषबाजी करीत यशस्वीसोबत ८८ धावांची भागीदारी केली. सर्फराजने केवळ २५ चेंडूंत नऊ चौकार व तीन षटकार ठोकत ६४ धावांची खेळी केली. या दोघांनी मुंबईसाठी विजय जवळपास निश्चित केला. दरम्यान, यशस्वीनेही दोनशेच्या स्ट्राईक रेटने आपले शतक पूर्ण करत मुंबईला विजयश्री मिळवून दिले. त्याने बाद होण्यापूर्वी ५० चेंडूंत १६ चौकार व एका शतकारासह १०१ धावा केल्या.

सुपर लीगच्या शेवटच्या सामन्यात मुंबईची गाठ राजस्थानसोबत असेल. मुंबईला तो सामना जिंकून अंतिम सामन्यात आपले स्थान पक्के करण्याचा इरादा असेल.