कोलकाता: हिरो इंडियन सुपर लिगच्या (आयएसएल) पाचव्या मोसमात संभाव्य विजेत्या एटीकेला सलग दुसरा पराभव पत्करावा लागला. नॉर्थइस्ट युनायटेड एफसीने पूर्वेची डर्बी एकमेव गोलने जिंकत पहिला विजय नोंदविला. स्पर्धेतील पहिल्या रेड कार्डची नामुष्की एटीकेच्या सेना राल्टेवर ३२व्या मिनिटालाच ओढविली. त्यानंतरही निकराचा बचाव केलेल्या एटीकेला अवघा एक मिनिट बाकी असताना रॉलीन बोर्जेसच्या गोलमुळे निराशाजनक पराभवाचा धक्का बसला. हा गोल सेट-पीसवर झाला. फेडेरिको गॅलेगोने उजवीकडून चेंडू हवेत मारला आणि बोर्जेसने उडी घेत हेडिंग केले. एटीकेचा गोलरक्षक अरिंदम भट्टाचार्य याला झेप टाकूनही नेटच्या डाव्या कोपऱ्याच्या दिशेने आलेला चेंडू रोखता आला नाही. हा गोल आणि पर्यायाने हा निकाल एटीकेसाठी निराशाजनक ठरला. दोन वेळच्या विजेत्या एटीकेला मोसमातील पहिले दोन सामने घरच्या मैदानावर खेळण्याची संधी मिळाली. यात सलामीला दाक्षिणात्य डर्बीत केरळा ब्लास्टर्सकडून त्यांना ०-२ अशा धक्का बसला. त्यानंतर पुर्वेकडील डर्बीत नॉर्थइस्टचे आव्हान त्यांच्यासमोर होते. त्यातही त्यांना अपयश आले. मुख्य म्हणजे एटीकेची पहिल्या गुणाची आणि पहिल्या गोलची प्रतिक्षा सुद्धा कायम राहणे विवेकानंद युवा भारती क्रीडांगणावरील १९ हजार ८५३ प्रेक्षकांमधील बहुसंख्य जणांसाठी निराशाजनक ठरले. राल्टेने १९ आणि नंतर ३२व्या मिनिटाला धसमुसळा खेळ केला. आधी त्याने रेडीम ट्लांगला पाडले होते. नंतर त्याने निखील कदमला ठोसा लगावला. त्यावेळी दुसऱ्या यलो कार्डसह त्याला मैदान सोडावे लागले. तसे पाहिले तर तोपर्यंतच्या खेळात एटीकेला सूर असा गवसला नव्हता. चेंडूवरील ताब्यात नॉर्थइस्टने ६२-३८ असे वर्चस्व राखले होते. याशिवाय पासेसच्या संख्येतही २२०-११९ असा शतकी फरक होता. त्यातच पूर्वार्धात अखेरच्या मिनिटाला एटीकेची मदार असलेल्या आणि गेल्या मोसमात एफसी गोवाकडून चमकलेल्या मॅन्युएल लँझरॉतने मारलेला फटका नॉर्थइस्टचा गोलरक्षक टी. पी. रेहेनेशने अडविला. त्यामुळे मध्यंतरास गोलशून्य बरोबरीची कोंडी फुटू शकली नाही. नॉर्थइस्टने आधीच्या सामन्यात गोव्याला २-२ असे बरोबरीत रोखले होते. त्यांनी सुरवात सकारात्मक केली. तिसऱ्या मिनिटाला निखील कदमने डावीकडून मुसंडी मारत रेडीमला पास द्यायचा प्रयत्न केला, पण चेंडू बाजूने फेडेरिको गॅलेगोकडे गेला. गॅलेगोने चपळाईने चेंडूवर नियंत्रण मिळवित मारलेला फटका एटीकेच्या गेर्सन व्हिएराने ब्लॉक केला. चेंडू बाहेर गेल्याने मिळालेल्या कॉर्नरवर काही घडले नाही. पाचव्या मिनिटाला एटीकेच्या अल मैमौनी नौसैरने डावीकडून मारलेला फटका नॉर्थइस्टच्या खेळाडूने हेडिंगवर बाहेर घालविला. त्याचवेळी रेहेनेश आक्रमण करीत सरसावला. त्याने व्हिएराच्या छातीवर हात मारला, पण त्याच्या व नॉर्थइस्टच्या सुदैवाने हे पंचांच्या दृष्टिस पडले नाही. अन्यथा रेहेनेशला लाल कार्ड मिळाले असते. नवव्या मिनिटाला गॅलेगोला पाडल्याबद्दल एटीकेच्या प्रोणय हल्दरला यलो कार्ड दाखविण्यात आले. २०व्या मिनिटाला नॉर्थइस्टने फ्री किक दवडली. त्याआधी सेनाने रेडीमला पाडले होते. त्यामुळे त्याला यलो कार्डला सामोरे जावे लागले. गॅलेगोने घेतलेल्या फ्री किकवर मात्र बार्थोलोम्यू ओगबेचे याने स्वैर फटका मारला. दुसऱ्या सत्रात एकूण 50व्या मिनिटाला गॅलेगोने एटीकेच्या जॉन जॉन्सनला दाद न देता हेडिंगवर चेंडू नियंत्रित करून फटका मारला, पण व्हिएराने तो बाहेर घालविला. त्यानंतर एटीकेने दोन चांगल्या संधी दवडल्या. ५२व्या मिनिटाला नौसैरने घेतलेल्या फ्री किकवर डावीकडे एव्हर्टन सँटोसने हेडिंग करीत लँझरॉतसाठी संध निर्माण केली, पण रेहेनेशने नॉर्थइस्टचे नेट सुरक्षित राखले. 68व्या मिनिटाला पुन्हा फ्री किक वाया गेली. लँझरॉतने उजवीकडून छान मारलेल्या चेंडूवर जॉन्सनचा फटका थोडक्यात नेटजवळून बाहेर गेला.]]>
Related Posts
कांगारूंसमोर भारताची नांगी, मालिका गमावली
Fifties from Rohit and Iyer weren’t enough as Short and Connolly led the chase after Zampa and Bartlett shared seven wickets.
