रणजी ट्रॉफी: मुंबई वि. राजस्थान सामना अनिर्णित

Yashasvi Jaiswal

राजस्थानच्या पहिल्या डावातील ३६३ धावांच्या आघाडीला भेदत मुंबईने यशस्वी जयस्वालच्या १५६ धावांच्या जोरावर शेवटच्या दिवशी सामना अनिर्णित राखण्यात यश मिळवले.

जयपुर (प्रतिनिधी): प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत तिसऱ्या फेरीच्या रणजी सामन्यात ४२ वेळेस विजेत्या राहिलेल्या मुंबईला अखेर राजस्थानविरुद्ध सामना अनिर्णित राखण्यात यश आले. राजस्थानने पहिल्या डावात ६१७ धावांचा डोंगर उभारत ३६३ धावांची आघाडी घेतली. सामना वाचवण्यासाठी मुंबईला आघाडी भेदून काढणे अत्यंत महत्वाचे होते. भारताला कसोटी सलामीवीर यशस्वी जयस्वालने पहिल्या डावातील अर्धशतकानंतर दुसऱ्या डावात १५६ धावांची खेळी करत अखेर सामना अनिर्णित राखला. आपल्या खडूस फलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या सिद्धेश लाडने १०५ चेंडूंचा सामना करीत १९ धावांवर नाबाद राहत मुंबईला सामना वाचवण्यास मदत केली.

पहिल्या डावात केवळ २५४ धावा केल्यानंतर राजस्थानने आपल्या घरच्या मैदानाचा पुरेपूर फायदा घेत मुंबईच्या गोलंदाजांना अक्षरशः धुवून काढले. सलामीवीर सचिन यादवच्या ९२ धावांच्या खेळीनंतर दीपक हुडाने २२ चौकार व दोन षटकार खेचत २४८ धावांची द्विशतकीय खेळी केली. कार्तिक शर्मानेही सहाव्या क्रमांकावर येत १३ चौकार व तीन षटकारांच्या मदतीने १३९ धावांची खेळी करत राजस्थानला सहाशेचा आकडा गाठून दिला.

मुंबईला ३६३ धावांच्या पिछाडीनंतर केवळ दोनच पर्याय उरले होते. एक सामना वाचवणे व दुसरा पराभूत होणे. छत्तीसगढविरुद्धच्या मागील सामन्यात विजयापासून वंचित राहावे लागल्यामुळे सामना पराभूत होणे मुंबईसाठी परवडणारे नव्हते. तिसऱ्या डावात जयस्वाल व मुशीर खान यांनी तिसऱ्या दिवसाखेरीस नाबाद ८९ धावांची भागीदारी रचित आपले मनसुबे स्पष्ट केले. त्यांनी शतकीय भागीदारी करीत मुंबईला ड्रॉकडे वळविले. मुशीर ६३ धावा करून बाद झाल्यानंतर माजी कर्णधार अजिंक्य राहाणेला फारशी चमकदार कामगिरी करता आली नाही. तोही ५७ चेंडूंत १८ धावा करून माघारी परतला. जयस्वालने एक बाजूने आपली फटकेबाजी चालू ठेवत दीड-शतक ठोकत प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये आपले १७ वे शतक पूर्ण केले. सिद्धेश लाडने शेवटी चिवट फलंदाजी करीत सामना अनिर्णित राखून दिला.

मुंबईचा पुढील सामनाहिमाचल प्रदेश विरुद्ध बीकेसी येथील मैदानावर शनिवारी आठ नोव्हेंबरला होणार आहे. त्या सामन्यात विजय मिळवून आपल्या गटात अव्वल स्थान कायम ठेवण्याचे आव्हान मुंबईचे असेल.