भारताचा अंडर-१९ विश्वविजेता कर्णधाराला मागील वर्षीच्या लिलावात कोणत्याच संघाने बोली लावली नव्हती.
अबुधाबी: महाराष्ट्राचा स्टार फलंदाज पृथ्वी शॉला अखेर इंडियन्स प्रीमियर लीग २०२६ च्या लिलावात बोली लावत संघ मिळाला. मागील वर्षी जेद्दाह येथे झालेल्या लिलाव प्रक्रियेत त्याला एकही संघाने विकत न घेता त्याचा आयपीएलचा हंगाम वाया गेला होता. पहिल्या फेरीत पुन्हा एकदा कोणत्याच संघाने रस न दाखवता याही वेळेस तो ‘अनसोल्ड’ जातो कि काय असे वाटत असताना शेवटच्या राउंडमध्ये त्याला त्याचा पूर्वीचा संघ दिल्ली कॅपिटल्सने ७५ लाखात खरेदी करत अखेर आयपीएलमध्ये घर वापसी केली.
आयपीएल २०२५ च्या लिलावापूर्वी संघातून मुक्त (रिलीज) करण्याआधी, शॉने दिल्लीसोबत सात हंगाम घालवले होते. गेल्या वर्षीच्या लिलावात या २६ वर्षीय खेळाडूला संघ मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागला होता, कारण दिल्ली कॅपिटल्सने आता महाराष्ट्राकडून खेळणाऱ्या या फलंदाजाला आपल्या संघात न घेण्याचा निर्णय घेतला होता.
मुख्य लिलावात निवड न झाल्यामुळे शॉला वाट पाहावी लागली आणि ‘एक्सेलरेटेड’ प्रक्रियेत त्याचे नाव येईल की नाही, यासाठी त्याला प्रतीक्षा करावी लागली. अखेरीस, अगदी शेवटच्या फेरीत, अंतिम एक्सेलरेटेड फेरीसाठी निवडलेल्या ११ खेळाडूंमध्ये शॉचा समावेश झाला आणि त्याला त्याच्या जुन्या संघाने ७५ लाख रुपयांना विकत घेतले.
२०१८ च्या आयपीएल लिलावात, शॉला दिल्ली डेअरडेविल्सने (जे आता दिल्ली कॅपिटल्स आहेत) १.२ कोटी रुपयांना खरेदी केले. ही रक्कम त्याच्या २० लाख रुपयांच्या मूळ किमतीच्या सहा पट होती. १९ वर्षांखालील विश्वचषक विजयानंतर शॉ आणि शुभमन गिल हे दोघेही नवीन तारे म्हणून उदयाला आले होते. आज गिल भारताचा कर्णधार आहे, तर दुसरीकडे शॉची कारकीर्द मात्र रुळावरून घसरली आहे.
