अहमदाबाद: वर्षाच्या शेवटी भारतीय क्रिकेट संघाने चाहत्यांना विजयाची खास भेट दिली आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या पाचव्या आणि अंतिम टी-२० सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा ३० धावांनी पराभव करत ५ सामन्यांची मालिका ३-१ अशा फरकाने जिंकली. भारताच्या २३२ धावांच्या विशाल आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा संघ २०१ धावांपर्यंतच मजल मारू शकला. या विजयासह भारताने सलग आठवी द्विपक्षीय टी-२० मालिका जिंकण्याचा विक्रमही केला.
दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला, जो त्यांच्या अंगलट आला. भारताचे सलामीवीर संजू सॅमसन (३७) आणि अभिषेक शर्मा (३४) यांनी संघाला वेगवान सुरुवात करून दिली. मात्र, खरी आतषबाजी पाहायला मिळाली ती मधल्या फळीत. युवा फलंदाज टिळक वर्माने जबाबदारीने खेळताना ४२ चेंडूत ७३ धावांची खेळी साकारली. त्याला साथ मिळाली ती अष्टपैलू हार्दिक पांड्याची. हार्दिकने अखेरच्या षटकांमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांची धुलाई करत अवघ्या २५ चेंडूत ६३ धावा कुटल्या. यात त्याने ५ षटकार आणि ५ चौकार लगावत भारताला २३१/५ या विशाल धावसंख्येपर्यंत नेले.
विशाल लक्षाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेनेही आक्रमक सुरुवात केली. क्विंटन डिकॉकने ३५ चेंडूत ६५ धावा करत भारताच्या गोलंदाजांवर दबाव निर्माण केला होता. डिकॉक आणि डेवाल्ड ब्रेविस यांनी दुसऱ्या विकेटसाठी वेगवान भागीदारी केली आणि सामना भारताच्या हातून निसटतो की काय, अशी स्थिती निर्माण झाली होती.
मात्र, मोक्याच्या क्षणी कर्णधार सूर्यकुमार यादवने आपला हुकमी एक्का जसप्रीत बुमराहला पाचारण केले. बुमराहने सेट झालेल्या डिकॉकला बाद करत सामन्याला कलाटणी दिली. त्याने आपल्या ४ षटकांत केवळ १७ धावा देत २ महत्त्वाचे बळी घेतले. दुसरीकडे, फिरकीपटू वरुण चक्रवर्तीने दक्षिण आफ्रिकेच्या मधल्या फळीला खिंडार पाडले. त्याने ५३ धावांत ४ बळी घेत पाहुण्या संघाच्या आशा संपुष्टात आणल्या. दक्षिण आफ्रिकेचा डाव २० षटकांत ८ बाद २०१ धावांवर थांबला.
अष्टपैलू कामगिरीसाठी हार्दिक पांड्याला ‘सामनावीर’ तर संपूर्ण मालिकेत उत्कृष्ट गोलंदाजी करणाऱ्या वरुण चक्रवर्तीला ‘मालिकावीर’ पुरस्काराने गौरवण्यात आले. २०२५ वर्षाचा शेवट अशा दणदणीत विजयाने झाल्यामुळे भारतीय गोटात आनंदाचे वातावरण आहे.
