महिला विश्वचषक २०२५: करो व मरो सामन्यात भारतीय महिलांनी आपला सर्वोत्तम खेळ करीत स्पर्धेच्या अंतिम चारमध्ये दिमाखात प्रवेश केला. न्यूझीलंडला ५३ धावांनी पराभूत करीत हा विजय संपादित केला.
नवी मुंबई (भास्कर गाणेकर): दोनदा पावसाचा व्यत्यय आल्यानंतरही उपांत्य फेरीचा प्रवेश निश्चित करणाऱ्या सामन्यात भारतीय महिलांनी आधी फलंदाजीत, नंतर गोलंदाजीत उत्कृष्ठ नजराणा पेश करीत डकवर्थ-लुईस-स्टर्न (डीएलएस) नियमानुसार न्यूझीलंडचा ५३ धावांनी पराभव करीत सामना जिंकला. यजमान भारताने स्पर्धेचे पहिले दिन सामने जिंल्यानंतर सलग तीन सामने गमावले होते. साखळी फेरीतच आव्हान संपुष्ठात येण्याची नामुष्की ओढवणाऱ्या यजमानांनी आज मात्र येथील डी. वाय. पाटील स्टेडियमवर अष्टपैलू खेळ पेश करीत विक्रमी स्पर्धकांना खुश केले.
पावसामुळे ४४ षटकांत ३२५ धावांचे आव्हान पार करण्यास उतरलेल्या न्यूझीलंडला दुसऱ्याच षटकात धक्का देत सुरुवातीपासून भारताने सामन्यावर पकड मिळवण्यास सुरुवात केली. ठराविक अंतराने विकेट्स जात असल्याने न्यूझीलंडला सामन्यात डोके वर काढण्याची पुरेशी संधी भारतीय गोलंदाजांनी दिली नाही. मधल्या फळीत अमेलिया कर (४५), ब्रुक हालिडे (८१), इसाबेल गेझ (६५*) यांनी झुंज देण्याचा प्रयत्न केला खरा, परंतु जवळपास आठच्या सरासरीने धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडला २७१ धावांपर्यंतच मजल मारता आली.
पावसाच्या व्यत्यय येण्यापूर्वी काहीशी सावध सुरुवात केलेल्या भारतीय सलामी जोडीने जम बसल्यानंतर आपला नैसर्गिक खेळ दाखवला. पहिल्या पावरप्ले अखेरीस केवळ ४० धावा केलेल्या प्रतिका रावल – स्मृती मंधाना या जोडीने पहिल्या गड्यासाठी २१२ धावांची भागीदारी केली. दोघीनींही वैयक्तिक शतक झळकावत भारताला सुसुस्थीत आणले. स्पर्धेत आपले स्थान टिकून ठेवण्याच्या दृष्टीने महत्वाच्या सामन्यात भारतीयांकडून अपेक्षित खेळ झाला. ११व्या षटकात अर्धशतकीय व १८व्या षटकात शतकीय भागीदारी रचल्यानंतर सलामी जोडीने आक्रमक पवित्र घेतला. मंधानाने केवळ ८८ चेंडूंत आपले १४वे एकदिवसीय शतक लागवल्यानंतर ती बाद झाली. पुढे प्रतिकाने काहीसा वेळ खेत १२२ चेंडूंत आपले शतक पूर्ण केले.
मैदानाच्या चहू बाजूंनी फटके लगावत ४०व्या षटकात संघाला २५० धावांचा पल्ला गाठून दिला. दोन्ही सलामीवीर बाद झाल्यानंतर जेमिमा रॉड्रिग्सने आक्रमक खेळ चालू ठेवत अर्धशतक झळकावले. तिने प्रतिकासोबत ५८ चेंडूंत ७६ धावांची महत्वपूर्ण भागीदारी रचली. जेमिमाने ५५ चेंडूंत ११ चौकार ठोकत ७६ धावांची नाबाद केली केली. तिच्या या खेळीच्या जोरावर भारताने ४९ षटकांच्या आपल्या डावात तीन बाद ३४० धावांपर्यंत मजल मारली.
आकड्यांचा खेळ
- प्रतिका रावलने २३ डावांत एकदिवसीय क्रिकेटमध्ये आपल्या १००० धावा पूर्ण केल्या. सर्वात वेगवान १००० धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये तिने आता अव्वल स्थान फटकावले आहे.
- भारताची स्टार फलंदाज स्मृती मंधानाने आणखी एक खणखणीत शतक लगावत यंदाचे पाचवे शतक पूर्ण केले. वर्षात सर्वाधिक शतक लागवणाऱ्या यादीत तिने आता अव्वल स्थानी झेल घेतली.
- मंधानाच्या आजच्या शतकानंतर तिने एकदिवसीय कारकिर्दीत सर्वाधिक शतके ठोकण्याच्या यादीत दुसरे स्थान गाठले आहे. तिने आज आपले १४वे शतक लगावले. ऑस्ट्रेलियाची मेग लॅनिंग (१५) हिच्या नंतर स्मृती या यादीत दुसऱ्या स्थानी आहे.
- नवी मुंबईच्या डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये आजच्या सामन्यात तब्बल २५,१६६ प्रेक्षकांनी हजेरी लावली. कोणत्याही महिला विश्वचषक स्पर्धेच्या साखळी सामान्यांसाठी इतकी उपस्थिती कधीच झाली नव्हती. स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात (भारत विरुद्ध श्रीलंका) २२,८४३ प्रेक्षकांनी हजेरी लावली होती. तो विक्रम आजच्या सामान्याने मोडीत काढला.
