पहिल्या टी-२० सामन्यात १७५ धावांचे लक्ष्य पार करण्यास उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेला स्वस्तात गुंडाळून भारताने १०१ धावांनी सामना जिंकला.
कट्टक: फेब्रुवारी महिन्यात होऊ घातलेल्या टी-२० विश्वचषकाच्या अनुषंगाने भारत आफ्रिका यांच्या चालू असलेल्या पाच टी-२० सामन्यांच्या मालिकेत भारताने पाहुण्यांना १०१ धावांनी नमवत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीनंतर सर्वच गोलंदाजांनी केलेली अचूक टप्प्याची गोलंदाजी भारताच्या विजयाचे वैशिष्ट्य ठरले.
नाणेफेक गमावल्यानंतर अडखळत सुरुवात केलेल्या भारताला मधल्या फळीने सावरले. हार्दिक पांड्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बऱ्याच कालावधीने पुनरागमन करीत आफ्रिकेच्या गोलंदाजांना बदडले. ४८ धावांत पहिले तीन फलंदाज गमावलेल्या भारताने हार्दिकच्या खेळीच्या जोरावर १७५ धावांपर्यंत मजल मारली. तिलक वर्मा (२६) व अक्षर पटेल (२३) यांनी त्याला योग्य साथ दिली. हार्दिकने २८ चेंडूंचा सामना करीत सहा चौकार व चार षटकार ठोकत ५९ धावांची खेळी केली. त्याचे टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधले हे सहावे अर्धशतक ठरले.
धावांचा पाठलाग करण्यास उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेला भारतीय गोलंदाजांनी एका मागून एक धक्के देत सामन्यात परतण्याची संधीच दिली नाही. भारताचा टी-२० क्रिकेटमधला सर्वात यशस्वी गोलंदाज अर्शदीप सिंगने क्विंटन डी-कॉकला भोपळाही न फोडू देता माघारी धाडत दक्षिण आफ्रिकेच्या डावाला गळती लावली. पुन्हा तिसऱ्या षटकात स्टब्सला बाद करीत पाहुण्यांची अवस्था दोन बाद १६ अशी केली. अक्षर पटेलने मार्कमचा त्रिफळा उडवत डाव उध्वस्थ करण्यास सुरुवात केली.जसप्रीत बुमरा, वरूण चक्रवर्ती या स्पेशालिस्ट गोलंदाजांनीही आपला अनुभव पणाला लावत प्रत्येकी दोन गादी बाद केले. १३ व्या षटकातच ७४ धावांत खुर्दा पाडत सामना १०१ धावांनी जिंकला.
