दुबई: येथील आयसीसी अकादमी मैदानावर झालेल्या १९ वर्षांखालील आशिया चषक स्पर्धेतील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हाय-व्होल्टेज सामन्यात भारताने पाकिस्तानवर ९० धावांनी मोठा विजय मिळवला. या विजयासह भारतीय संघाने गट ‘अ’ मध्ये अव्वल स्थान पटकावले आहे.
नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने ४६.१ षटकांत सर्वबाद २४० धावांचे लक्ष्य पाकिस्तानसमोर ठेवले. भारताकडून ॲरन जॉर्ज याने अप्रतिम फलंदाजी करत ८८ चेंडूत १२ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने ८५ धावांची सर्वाधिक खेळी केली. त्याला कनिष्क चौहान याने ४६ चेंडूत ४६ धावा करून चांगली साथ दिली. मुख्य म्हणजे कर्णधार आयुष्य म्हात्रे आणि मागील सामन्याचा हिरो वैभव सूर्यवंशी यांच्या मोठ्या खेळीशिवायही भारताने २४० धावांपर्यंत मजल मारली. पाकिस्तानसाठी मोहम्मद सय्यम (६७/३) आणि अब्दुल सुभान यांनी प्रत्येकी तीन बळी घेत भारताला मोठी धावसंख्या करण्यापासून रोखले.
२४१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ सुरुवातीपासूनच भारतीय गोलंदाजांसमोर संघर्ष करताना दिसला. त्यांचा संपूर्ण संघ ४१.२ षटकांत केवळ १५० धावांवर बाद झाला. पाकिस्तानकडून फक्त हुजैफा अहसान याने एकाकी झुंज देत ८३ चेंडूत ९ चौकार आणि २ षटकारांसह ७० धावा केल्या. इतर फलंदाजांना मोठी भागीदारी करता आली नाही. भारताच्या गोलंदाजीसमोर पाकिस्तानचा डाव पूर्णपणे कोसळला. दीपेश देवेंद्रन याने केवळ ७ षटकांत १६ धावा देत ३ महत्त्वपूर्ण बळी घेतले. कनिष्क चौहान याने फलंदाजीत ४६ धावा केल्यानंतर गोलंदाजीतही आपली चमक दाखवली. त्याने १० षटकांत ३३ धावा देत ३ बळी घेतले.
दीपेश देवेंद्रन आणि कनिष्क चौहान यांच्या प्रभावी कामगिरीमुळे भारताने ९० धावांनी मोठा विजय मिळवून स्पर्धेत आपला दबदबा कायम ठेवला आहे.
