केवळ औपचारिकता म्हणून असलेल्या सामन्यात पावसाने विजयी मुसंडी मारली. बांगलादेशचे १२६ धावांचे आव्हान पार करताना भारताच्या नवव्या शतकात पावसाने मोठा व्यत्यय आणला. परिणामी सामना रद्द करावा लागला.
नवी मुंबई (भास्कर गाणेकर): अवकाळी पावसाचा वारंवार व्यत्यय आल्यामुळे २७ षटकांच्या झालेल्या सामन्यात भारताने आपली पकड पहिल्या षटकापासूनच मजबूत ठेवतठेवली. बांगलादेशला ११९ धावांवर रोखल्यानंतर भारताने डकवर्थ-लुईस-स्टर्न (डीएलएस) नियमानुसार धावांचा पाठलाग करताना वेगवान सुरुवात केली. परंतु पावसाने भारताच्या डावातही व्यत्यय आणल्याने शेवटी सामना रद्द करावा लागला. अगोदरच सेमी फायनलचे तिकीट पक्के केलेल्या भारताचा आजच्या सामन्याची केवळ औपचारिकता पार पाडायची होती.
डीएलएस नुसार १२६ धावांचे आव्हान पार करताना भारताने जखमी प्रतीका रावलच्या जागी सलामीला अमनज्योत कौरला पाठवले. स्मृती मानधनाच्या जोडीला तिनेही चांगली फलंदाजी करीत सातव्याच षटकात भारताला पन्नाशी गाठून दिली. मानधनाने चौथ्या षटकात निशिता अकतेरच्या गोलंदाजीवर चार चौकार ठोकत आपले मनसुबे स्पष्ट केले. पण दिवसभर पावसाचा चाललेला लपंडाव शेवटी जिंकला. भारत वेगवान धावा करत होता. परंतु दहाच्या सुमारास ३०-४० मिनिटे पाऊस पडल्याने पंचांना सामना रद्द करावा लागला.
पावसाचा लपंडाव, नाणेफेक उशिरा
ऑक्टोबर महिना संपायला आला असला तरीही नवी मुंबई व आसपासच्या परिसरात पावसाचा जोर कमी झालेला दिसत नव्हता. भारताचा शेवटचा साखळी सामना आज येथे पार पडला. दुपारी २:३० वाजता नाणेफेक अपेक्षित असताना पावसाच्या संथ सरींनी नाणेफेकीचा कार्यक्रम पुढे ढकलला. अगोदरच कोलंबो, श्रीलंका येथील बरेचसे सामने पावसामुळे रद्द झाल्यामुळे आयसीसी व बीसीसीआयच्या नियोजनावर प्रश्चचिन्ह निर्माण केले गेले. डी. वाय. पाटील स्टेडियमच्या परिसरात सकाळीच वरुणराजाने हजेरी लावल्याने सामना होईल की नाही याकडे सर्वांचे लक्ष होते. त्यात ऐन नाणेफेकीच्या वेळेशी पावसाचे दर्शन झाल्याने उपस्थित प्रेक्षकांचा आनंदावर काही प्रमाणात विरजण पडले.
हरमनप्रीत कौरने नाणेफेकीचा कौल आपल्या बाजूने लावत पाहुण्यांना प्रथम फलंदाजीस आमंत्रित केले. पहिल्याच षटकात रेणुका सिंह ठाकूरने सुमैय्या अकतेरचा अडथळा दूर करीत भारताची सुरुवात दमदार केली. दुसऱ्या बाजूने अनुभवी दीप्ती शर्माने अचूक माऱ्याने गोलंदाजी करीत पाऊस येण्याआधी १०व्या षटकात रुबीया हैदरला तंबुत धाडले.
१३व्या षटकात पावसाचा व्यत्यय आल्यानंतर २७ षटकांच्या सामन्यात बांगलादेशचे आव्हान होते ते एक समाधानकारक धावसंख्या उभारणे. केवळ चार चौकार लागवलेल्या बांगलादेश फलंदाजांनी ब्रेकनंतर काहीसा आक्रमक पवित्रा घेतला. मात्र त्यांना विकेट्सही गमवावे लागले. भारताच्या स्पिनर्सनी अचूक गोलंदाजी करीत बांगलादेशला मोठ्या धावसंख्येपासून रोखले. शर्मीन अकतेर (३६) व शोभना मोस्तरी (२६) यांचा अपवाद वगळता इतर फलंदाजांना चांगली खेळी करता आली नाही. आजच्या सामन्यात संधी मिळालेल्या राधा यादवने ३० धावांत सर्वाधिक तीन गडी बाद केले. तिला श्री चरणीने उत्तम साथ देत २३ धावांत दोन गडी बाद केले.
प्रतीका रावल जखमी
बांगलादेशच्या २१व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर सीमेरेषेजवळ क्षेत्ररक्षण करताना चेंडू अडवण्याचा नादात पावसामुळे ओलं झालेल्या मैनादावर पाय घसरून पडली आणि जखमी झाली. तिच्या वेदना इतक्या होत्या की फिजिओसोबत स्ट्रेचरही बोलवावे लागले. सुदैवाने स्ट्रेचरचा उपयोग करण्याची गरज पडली नाही. तिचा उजवा पाय चांगलाच मुरगळल्याचं मोठया स्क्रिनववर दिसलं.
संक्षिप्त धावफलक:
बांगलादेश ११९/९ (२७) – शर्मीन अकतेर (३६), शोभना मोस्तरी (२६), राधा यादव ६-०-३०-३
भारत ५७/० (८.४) – स्मृती मानधना ३४*(२७), अमनज्योत कौर १५*(२५)
पावसामुळे सामना रद्द
