टी-२० विश्वचषक २०२६: बांगलादेशचा पत्ता कट; भारतामध्ये खेळण्यास नकार दिल्याने स्कॉटलंडला संधी

Scotland

दुबई/नवी दिल्ली: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने टी-२० विश्वचषक २०२६ बाबत एक अत्यंत मोठा आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. भारतात खेळण्यास नकार दिल्याने बांगलादेश क्रिकेट संघाला या स्पर्धेतून अधिकृतपणे वगळण्यात आले असून, त्यांच्या जागी आता स्कॉटलंड संघाचा समावेश करण्यात आला आहे. आयसीसीने शनिवारी (२४ जानेवारी) याबाबतची अधिकृत घोषणा केली.

नेमके प्रकरण काय?
भारतात होणाऱ्या सामन्यांबाबत बांगलादेश क्रिकेट मंडळाने सुरक्षेचे कारण पुढे करत आक्षेप घेतला होता. बांगलादेशचे सर्व सामने सह-यजमान देश असलेल्या श्रीलंकेत हलवावेत, अशी मागणी बीसीबीने आयसीसीकडे केली होती. मात्र, आयसीसीने स्वतंत्र सुरक्षा तपासणी केल्यानंतर भारतात बांगलादेशच्या खेळाडूंना कोणताही धोका नसल्याचे स्पष्ट केले आणि सामन्यांचे ठिकाण बदलण्यास नकार दिला.

आयसीसीने बांगलादेशला आपला अंतिम निर्णय कळवण्यासाठी २४ तासांची मुदत दिली होती. मात्र, बीसीबीने आपली भूमिका कायम ठेवत संघ भारतात पाठवण्यास नकार दिला. या हट्टी भूमिकेमुळे अखेर आयसीसीने बांगलादेशला स्पर्धेतून बाहेरचा रस्ता दाखवला.

आयपीएल आणि राजकीय तणावाचे पडसाद
या वादाची ठिणगी आयपीएल २०२६ च्या लिलावापूर्वीच पडली होती. कोलकाता नाईट रायडर्सने बांगलादेशचा वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमानला संघातून मुक्त केले होते. त्यानंतर बांगलादेशने भारतात खेळण्याबाबत सुरक्षिततेचा मुद्दा उपस्थित केला होता. बांगलादेशचे क्रीडा सल्लागार आसिफ नजरुल आणि बीसीबीचे अध्यक्ष अमीनोल इस्लाम यांनी खेळाडूंच्या सुरक्षेबाबत साशंकता व्यक्त करत भारताच्या दौऱ्यावर बहिष्कार टाकण्याची भूमिका घेतली होती.

स्कॉटलंडला लॉटरी
बांगलादेश बाहेर पडल्याने त्यांच्या जागी आयसीसी क्रमवारीनुसार पात्र ठरलेल्या स्कॉटलंडला संधी मिळाली आहे. आता स्कॉटलंडचा संघ ‘क’ गटात इंग्लंड, वेस्ट इंडिज, इटली आणि नेपाळ यांच्यासोबत खेळेल.

स्कॉटलंडचा पहिला सामना ७ फेब्रुवारीला कोलकात्यात वेस्ट इंडिजविरुद्ध होणार आहे. त्यानंतर ९ फेब्रुवारीला इटली आणि १४ फेब्रुवारीला इंग्लंडविरुद्ध ते ईडन गार्डन्सवर खेळतील. तर १७ फेब्रुवारीला नेपाळविरुद्धचा सामना मुंबईत होणार आहे.