कोची: हिरो इंडियन सुपर लिगच्या (आयएसएल) तिसऱ्या मोसमात केरळा ब्लास्टर्स एफसी संघाला अद्याप एकही गोल करता आलेला नाही. आयएसएलमध्ये इंग्लंडच्या प्रशिक्षकांना फारसे यश लाभलेले नाही. यासंदर्भातील अपशकुनी मालिका खंडित करण्याचा केरळाचे प्रशिक्षक स्टीव कॉप्पेल यांचा निर्धार आहे. केरळाला सलामीच्या लढतीत नॉर्थईस्ट युनायटेड, तर त्यानंतर अॅटलेटीको डी कोलकाता संघाकडून पराभूत व्हावे लागले. स्थानिक प्रेक्षकांचा जोरदार पाठिंबा मिळणाऱ्या या संघाने तिसऱ्या लढतीत दिल्ली डायनॅमोजविरुद्ध गोलशू्न्य बरोबरी साधली. त्यामुळे गुणांचे खाते उघडले असले तरी केरळाची गोलची प्रतिक्षा कायम आहे. [gallery columns="4" link="file" ids="2028,2029,2030,2031,2032"] आयएसएलमध्ये यापूर्वी पीटर टेलर, टेरी फेलॅन आणि डेव्हिड प्लॅट अशा इंग्लंडच्या प्रशिक्षकांना फार काही करून दाखविता आले नाही. हे चित्र तसेच महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर मालक असलेल्या या संघाचे नशीब पालटण्याची कॉप्पेल यांची जिद्द आहे. इंग्लंडच्या 21 वर्षांखालील तसेच लेस्टर सिटी या संघांना मार्गदर्शन केलेल्या टेलर यांनी मागील मोसमाच्या मध्यासच केरळा क्लबचा निरोप घेतला. त्यांच्या जागी चेल्सी तसेच मँचेस्टर सिटीचे माजी फुल-बॅक टेरी यांची नियुक्ती करण्यात आली, पण संघ शेवटच्या स्थानावर फेकला गेला. एफसी पुणे सिटीला सुद्धा इंग्लंडचे प्रशिक्षक फलदायी ठरले नाहीत. गेल्या मोसमात प्लॅट पुण्याला बाद फेरीतही नऊ शकले नाहीत. मोसमाच्या प्रारंभी आघाडीवर राहिलेले पुणे दुसऱ्या टप्यात भरकटले आणि उपांत्य फेरीपासून दूर राहिले. पहिल्या मोसमात केरळाकडे इंग्लंडचेच प्रशिक्षक होते. गोलरक्षक डेव्हिड जेम्स याने मार्की खेळाडू तसेच प्रशिक्षक अशी दुहेरी भूमिका पार पाडली होती. त्यांनी केरळाला अंतिम फेरी गाठून दिली, पण इंग्लंडचे प्रशिक्षक आणि आयएसएल अशा संदर्भात त्यांची कामगिरी प्रातिनिधीक नव्हे तर अपवादात्मकच राहिली आहे. या पार्श्वभूमीवर कॉप्पेल म्हणाले की, येथे इंग्लंडचे प्रशिक्षक यशस्वी का ठरले नाहीत हे मला कोडेच पडले आहे, पण यात बदल घडविण्याची माझी जिद्द आहे. प्रशिक्षकपदी नियुक्ती झाल्यानंतर दोन दिवस माझी झोप उडाली होती, याचे कारण मी अत्यंत गांभीर्याने याकडे पाहात होतो. प्रशिक्षकपदाचा विपुल अनुभव असलेल्या कॉप्पेल यांना केरळा संघाचे प्रेक्षक खुणावत होते. त्यांनी सांगितले की, कोचीमध्ये केरळा ब्लास्टर्सला मिळणारा पाठिंबा अफलातून आहे. आमच्या सर्व खेळाडूंना याचे कौतूक वाटते आणि आमच्यावर विश्वास टाकणाऱ्या चाहत्यांच्या अपेक्षा संघाला पूर्ण करायच्या आहेत. कॉप्पेल यांनी आयएसएलचे मागील दोन मोसम उत्सुकतेने पाहिले आहेत. आता ते आपला अनुभव पणास लावून पारडे फिरविण्याची जिद्द बाळगून आहेत. इंग्लंडमध्ये दहा महिने चालणाऱ्या लीगच्या तुलनेत त्यांना 11 आठवड्यांची स्पर्धा आव्हानात्मक वाटते. त्यांनी सांगितले की, हे अशासाठी अवघड आहे की इंग्लंडच्या प्रशिक्षकांना दहा महिन्यांच्या कालवधीत संघबांधणी करण्याची जास्त सवय असते. येथे मात्र सारे काही झटपट करावे लागते. संघाच्या कच्या-पक्या बाजू लवकर समजून घेण्याची मला आशा आहे. संघाकडून सर्वोत्तम कामगिरी करून घेण्याचा माझा प्रयत्न राहील. सुरवातीच्या चिन्हांवरून भारतीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडूंमध्ये मोसमाच्यादृष्टिने चांगला समन्वय निर्माण होत असल्याचे दिसते. मँचेस्टर युनायटेडचे माजी विंगर असलेले कॉप्पेल यांच्या गाठीशी प्रशिक्षक म्हणून काही प्रमुख क्लबचा अनुभव आहे. मँचेस्टर सिटी, ब्रेंटफोर्ड, ब्रिस्टल सिटी आणि ब्रायटन अशा क्लबना त्यांनी मार्गदर्शन केले आहे. इंग्लंडबाहेरील क्लबची जबाबदारी त्यांनी प्रथमच स्विकारली आहे. आयएसएलच्या खडतर वेळापत्रकाचा ते अंदाज घेत आहेत. त्यांनी सांगितले की, खेळाडू आणि प्रशिक्षक म्हणून मी सारे जीवन इंग्लंडच्या फुटबॉलमध्ये काढले. तेथे दहा महिन्यांच्या कालावधीत सर्व प्रकारचे हवामान आणि सर्व प्रकारच्या परिस्थितीचा सामना करावा लागतो. जवळपास वर्षभर मानसिक आणि शारिरीक कसोटी लागते. मी यापूर्वी सहभागी घटक राहिलेल्या कोणत्याही स्पर्धेच्या तुलनेत आयएसएल सर्वस्वी वेगळी आहे. ते पुढे म्हणाले की, लांबून पाहताना पहिली दोन वर्षे मी आयएसएलमुळे मोहित व्हायचो आणि हे आकर्षण आजही कायम आहे. या स्पर्धेचे समीकरण कसे जुळवले तर यश मिळेल याचे मला औत्सुक्य आहे. हे मला नक्कीच जमेल अशी आशा आहे. Photo by ISL/ SPORTZPICS]]>
Related Posts
भारत वि. दक्षिण आफ्रिका: दिग्गजांची ‘विराट’ कामगिरी आणि नव्या युगाचा उदय
Rohit Sharma and Virat Kohli delivered beyond expectations and now step out of the spotlight as attention shifts back to T20Is.
