२००५ व २०१७ सालच्या नैराशेला बाजूला सारत नेरूळच्या डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियमवर भारतीय संघाने इतिहास रचत पहिल्यांदाच विश्वचषक करंडकावर आपले नाव कोरले.
नवी मुंबई (भास्कर गाणेकर): रविवारी (२ नोव्हेंबर) रोजी पावसामुळे सुमारे दोन तास सुरु झालेल्या महिला विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत मध्यरात्री (३ नोव्हेंबर) रोजी भारतीय महिलांनी ५२ धावांनी दक्षिण आफ्रिकेचा पराभव करीत पहिल्यांदाच विश्वचषकावर नाव कोरत महिला क्रिकेटमध्ये एक नवा अध्याय लिहिला. भारतीय महिलांच्या या कामगिरीवर बीसीसीआयही भलताच खुश होताना दिसतोय. तब्बल ५१ कोटींचे बक्षीस जाहीर करून महिला खेळाडूंना खुश केले. आयसीसीच्या ४० कोटींच्या बक्षीसाव्यतिरिक्त हे ५१ कोटी आता भारतीय महिला संघाला त्यांच्या कोचेस व सपोर्ट स्टाफला मालामाल करणार आहेत.
आताचे आयसीसी चेयरमन जय शाह जेव्हा भारतीय क्रिकेटचे सचिव होते तेव्हा त्यांनी पुरुष व महिला खेळाडूंना समान मॅचफीची घोषणा केली होती. सध्याच्या घडीला महिला व पुरुष खेळाडूंना एका कसोटीमागे सुमारे १५ लाख, एकदिवसीय सामन्याला ६ लाख तर टी-२० सामन्याला ३ लाख इतकी मॅच फी मिळते. जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड आपल्या महिला व पुरुष क्रिकेटपटूंना सर्वोतपरी मदत करण्याचे प्रयत्न नेहमी करत असतो. एखादा खेळाडू जखमी जरी झाला तरी त्या क्रिकेटपटू सर्वोत्तम इलाज पुरविण्याचे कामही बोर्ड करते.
काय घडलं सामन्यात?
३५,२०० प्रेक्षकांच्या उपस्थित पावसाने लपंडाव सुरु ठेवत दुपारी एक वाजल्यापासून सुमारे तीन-चार वेळेस हजेरी लावली. उशिरा सुरु झालेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय महिलांनी २९८ धावांपर्यंत मजल मारली. शफाली वर्मा (८७) व दीप्ती शर्मा (५८) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने ही मजल मारली. डी. वाय. पाटील स्टेडियमवर धावांचा पाठलाग सहज होत असल्यामुळे प्रतिस्पर्ध्यांचे विकेट्स काढत सामना जिंकणे कधीही सोपे नसते. उत्तरादाखल, दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लॉरा वॉलवोर्ट (१०१) हिने एकहाती किल्ला लढविण्याचा प्रयत्न केला. परंतु इतर फलंदाजांनी साथ न दिल्याने त्यांचा डाव २४६ धावांवर आटोपला. शफालीने आपल्या कामचलाऊ गोलंदाजीने दोन तर दीप्तीने निम्मा संघ तंबूत धाडला.
विजय पाटील यांचा आनंद गगनात मावेना
डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियमचे अध्यक्ष श्री. विजय पाटील यांच्याही चेहऱ्यावर आनंदाचा वर्षाव दिसत होता. इनिंग ब्रेकमध्ये झालेल्या रंगारंग कार्यक्रमाने उपस्थित प्रेक्षकांचे डोळे दिपवून टाकले. दोन आयपीएल फायनल, २०२२ सालचे आयपीएलचे सामने, वुमेन्स प्रीमियर लीग आणि आता महिला विश्वचषक. डी. वाय. पाटील स्टेडियमने नेहमीच आपला सर्वोत्तम प्रयन्त देत सर्व स्पर्धा उत्तमरीत्या पार पडल्या. भारतीय महिला क्रिकेट संघाचे जणू होम ग्राउंड असलेल्या डी. वाय. पाटील स्टेडियमवर विश्वचषक उंचावत जणू स्टेडियमची शान वाढवली. रायगड टाइम्सशी विशेष बातचीत करताना त्यांनी आपला आनंद व्यक्त केला. शिवाय बीसीसीआय, आयसीसी व सर्वच संस्थांनी केलेल्या मदतीसाठी त्यांनी आभार मानले. आगामी काळात अश्या मोठ्या स्पर्धा पार पाडण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
