कांगारूंसमोर भारताची नांगी, मालिका गमावली

Adam Zampa with Australian cricketers

रोहित शर्मा-विराट कोहली या एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वात अनुभवी जोडीची शेवटची ऑस्ट्रेलिया मालिका असल्याने ती जिंकणे भारतासाठी जिकरीचे होते. परंतु फलंदाजीचे अपयश आणि कमकुवत गोलंदाजीने भारताला दुसरा एकदिवसीय सामना दोन गड्यांनी गमवावावा लागला.  

ऍडलेट (प्रतिनिधी): २०२७च्या एकदिवसीय विश्वचषकाची पूर्वतयारी करण्याच्या अनुषंगाने मैदानात उतरलेल्या भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाचे वातावरण काहीसे जुळले नाही असेच म्हणावे लागेल. तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत अगोदरच पहिल्या सामन्यात सपाटून मार खाल्यानंतर दुसऱ्या सामन्यातही काहीशी तशीच परिस्थिती भारतीय संघाची झाली. २६५ धावांचा पाठलाग करताना कांगारूंनी दोन गडी व २२ चेंडू राखत विजय मिळवला व मालिका २-०ने जिंकली. 

भारताचे दोन दिग्गज – रोहित शर्मा व विराट कोहली बऱ्याच कालांतराने भारतासाठी आंतरराष्ट्रीय सामना खेळण्यास उतरल्याने त्यांच्यावर साऱ्या विश्वाच्या नजरा होत्या. पहिला सामन्यात दोन्ही फलंदाज स्वस्तात माघारी परतल्याने आज ते काही कमाल करतील अशी भोळी आशा चाहत्यांना होती. मात्र ऑस्ट्रेलियाच्या भेदक गोलंदाजीसमोर आजही भारताच्या आघाडीने सपशेल हार पत्करली. कर्णधार गिल ९ तर कोहलीने पुन्हा एकदा शून्यावर बाद होत भारताला अडचणीत टाकले. पण रोहित शर्माने दुसरीकडे आपल्या नैसर्गिक खेळाला काहीसा बाजूला ठेवत मुंबईकर साथीदार श्रेयस अय्यरसोबत तिसऱ्या गड्यासाठी शतकीय भागीदारी करीत एक सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली. अक्षर पटेलने नंतर धावा केल्याने भारताला अडीचशेचा पल्ला गाठून दिला.  

भारताकडे अनुभवी गोलंदाज असूनही कुलदीप यादवला अंतिम ११ मध्ये स्थान न दिल्यामुळे अगोदरच गोलंदाजी कमकुवत होती. नवखे अर्शदिप सिंग व हर्षित राणा यांनी सुरुवातीचे विकेट्स काढत भारताला सामन्यात जिवंत ठेवले. परंतु फलंदाजीत सातत्य व परिपक्वता असणाऱ्या ऑस्ट्रेलिया फलंदाजांनी सामना चांगलाच रंगवला. मॅथ्यू शॉर्टच्या अर्धशतकानंतर अष्टपैलू कूपर कोनोलीने नाबाद अर्धशकात लगावत कांगारूंना विजयश्री खेचून आणले.

संक्षिप्त धावफलक

भारत २६४/९ (५०) – रोहित शर्मा ७३(९७), श्रेयस अय्यर ६१(७७), ऍडम झाम्पा ४-६०

ऑस्ट्रेलिया २६५/८ (४६.२) – मॅथ्यू शॉर्ट ७४(७८), कूपर कोनोली ६१*(५३), वॉशिंग्टन सुंदर २-३७

ऑस्ट्रेलिया दोन गडी २२ चेंडू राखत विजयी, मालिका २-० ने जिंकली