१९ वर्षांखालील विश्वचषक: मुंबईकर आयुष म्हात्रेकडे भारतीय संघाची धुरा

aayush mhatre

मुंबई (भास्कर गाणेकर): भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने  २०२६ च्या १९ वर्षांखालील पुरुषांच्या विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेसाठी मुंबईचा युवा फलंदाज आयुष म्हात्रे याची कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे, तर विहान मल्होत्रा उपकर्णधारपदाची धुरा सांभाळेल.

दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिका दौऱ्याला मुकणार

येत्या १५ जानेवारी ते ६ फेब्रुवारी २०२६ दरम्यान झिम्बाब्वे आणि नामिबिया येथे हा विश्वचषक खेळवला जाणार आहे. मात्र, विश्वचषकापूर्वी भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेचा दौरा करणार आहे. दुर्दैवाने, कर्णधार आयुष म्हात्रे आणि उपकर्णधार विहान मल्होत्रा या दोघांनाही मनगटाची दुखापत झाली आहे. त्यामुळे हे दोघेही दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यात सहभागी होऊ शकणार नाहीत. ते बेंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (NCA) उपचारासाठी जातील आणि थेट विश्वचषकासाठी संघासोबत जोडले जातील.

वैभव सूर्यवंशीकडे हंगामी नेतृत्व

आयुष म्हात्रेच्या अनुपस्थितीत, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी वैभव सूर्यवंशीकडे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. ही मालिका ३ ते ७ जानेवारी दरम्यान खेळवली जाईल.

भारताचे वेळापत्रक

१९ वर्षांखालील विश्वचषकात भारताला ‘ब’ गटात स्थान मिळाले आहे. या गटात भारतासोबत न्यूझीलंड, अमेरिका आणि बांगलादेश हे संघ आहेत. भारतीय संघ आपली मोहीम १५ जानेवारीला अमेरिकेविरुद्धच्या सामन्याने सुरू करेल. त्यानंतर १७ जानेवारीला बांगलादेश आणि २४ जानेवारीला न्यूझीलंडविरुद्ध सामने होतील.

१९ वर्षांखालील विश्वचषकासाठी भारतीय संघ:

आयुष म्हात्रे (कर्णधार), विहान मल्होत्रा (उपकर्णधार), वैभव सूर्यवंशी, ॲरॉन जॉर्ज, वेदांत त्रिवेदी, अभिज्ञान कुंडू (यष्टीरक्षक), हरवंश सिंग (यष्टीरक्षक), आर.एस. अंबरीश, कनिष्क चौहान, खिलन ए. पटेल, मोहम्मद एनान, हेनिल पटेल, डी. दीपेश, किशन कुमार सिंग, उद्धव मोहन.