विश्वविजेती दीप्ती शर्मा ठरली सर्वात महागडी खेळाडू

Deepti Sharma

वूमेन्स प्रीमियर लीग २०२६ लिलाव 

दिल्ली: भारताची अष्टपैलू खेळाडू आणि महिला विश्वचषक २०२५ ची सर्वोत्तम खेळाडू ठरलेल्या दीप्ती शर्माने वूमेन्स प्रीमियर लीग (डब्लूपीएल) २०२६ साठी झालेल्या लिलाव प्रक्रियेत बाजी मारली. युपी वॉरियर्सने तिला या सत्रात रिटेन न करता लिलाव प्रक्रियेत सहभागी केले आणि आपली राईट-टू-मॅच (आरटीएम) द्वारे ३ करोड २० लाखांत खरेदी करत यंदाच्या लिलाव प्रक्रियेत मोठी बाजी मारली. 

पुरुषांच्या आयपीएलप्रमाणेच भारतीय क्रिकेट बोर्डाने २०२३ सालापासून पाच महिला संघांत चालू केलेल्या डब्लूपीएल अर्थात वूमेन्स प्रीमियर लीग स्पर्धेने पहिल्या मोसमपासूनच महिला क्रिकेट विश्वात छाप सोडली आहे. याच महिन्याच्या सुरवातीला भारतीय महिला संघाने विश्वचषक जिंकल्यानंतर महिला क्रिकेटकडे चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात आकर्षित होत आहे. त्याच अनुषंगाने डब्लूपीएलच्या नव्या सत्राकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. दिल्ली येथे झालेल्या लिलाव प्रक्रियेत दीप्ती शर्मासोबतच मुंबई इंडियन्सची अमेलिया कर हिलाही ३ करोडची बोली लागली. 

न्यूझीलंडची सोफिया डिव्हाईन (२ करोड – गुजरात जायंट्स) व ऑस्ट्रेलियाची मेग लॅनिंग (१ करोड ९० लाख – युपी वॉरियर) या दोन महान खेळाडूंनीही लिलाव प्रक्रियेत मोठी रक्कम लुटली. भारताची युवा फिरकीपटू श्री चरणीनेही १ करोड ३० लाख इतकी बोली जिंकत दिल्ली कॅपिटल्सने आपल्या संघात समाविष्ट केले. 

९ जानेवारी ते ५ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत बडोदा तसेच नवी मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडियमवर डब्लूपीएलचे चौथे सत्र खेळवले जाणार आहे. गतविजेत्या मुंबई इंडियन्सला आपले जेतेपद कायम राखण्याचे मोठे आव्हान असणार आहे.