भगूर, नाशिक (मनोज बंडोपंत कुवर): भगूर येथील मुंजा बाबा मंदिर हे स्थानिक आणि अनेक भक्तांचे श्रद्धास्थान आहे. सुमारे शंभर वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या या मंदिरात देवता शीळा स्वरूपात प्रतिष्ठित करण्यात आली आहे. मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे येथे असलेला पवित्र पिंपळ वृक्ष, जो भक्तांसाठी विशेष धार्मिक महत्वाचा मानला जातो. हिंदू धर्मशास्त्रानुसार पिंपळ वृक्षात भगवान विष्णूंचा वास असतो, म्हणूनच या वृक्षाची पूजा विशेष महत्त्वाची मानली जाते.
पूर्वी मंदिराजवळ एक पुरातन पिंपळाचे झाड होते, पण ते काही कारणास्तव सुकून गेले आणि नाहीसे झाले. या वृक्षाची आठवण म्हणून, सुमारे २५ वर्षांपूर्वी स्थानिकांनी एक नवा पिंपळ रोवला आणि त्या सोबत मंदिराचाही जीर्णोद्धार केला. विशेष म्हणजे, स्थानिक भक्तांनी त्या लहानशा पिंपळाचे व्यवस्थित पालनपोषण केले आणि त्याचा पहिला वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला. आता तो पिंपळ वृक्ष खूप मोठा झाला आहे, हे मंदिर परिसराला सौंदर्य देत आहे आणि मंदिराला सावलीसुद्धा प्रदान करत आहे.
या पवित्र वृक्षाच्या पहिल्या वाढदिवसानंतर दरवर्षी तिसऱ्या श्रावणी शनिवारी भक्त मंडळींनी कावड यात्रा सुरू केली आहे. गोदावरी नदीतून पवित्र जल आणून मुंजा बाबाचा अभिषेक पूजा केली जातो. या यात्रेत अनेक भक्त सहभागी होतात आणि शहरभर कावड मिरवली जाते. यानंतर मंदिरात महाप्रसादाचे वितरण केले जाते, ज्यामुळे भक्तांच्या श्रद्धेला अधिक बळकटी मिळते.
मुंजा बाबा आणि पिंपळ वृक्ष हे भगूरच्या धार्मिक आणि सांस्कृतिक वारशाचे प्रतीक बनले आहेत. हे ठिकाण भाविकांसाठी श्रद्धा आणि समर्पणाचे स्थान आहे. तेव्हा भाविकांनी अशा ऐतिहासिक ठिकाणी नक्कीच एकदा भेट द्यावी.