कोकण रेल्वे गोव्यामध्ये अधिक परिवर्तनकारी विस्तार करणार आणि प्रवासी-केंद्रित उपक्रम आणि प्रकल्प राबवणार

Konkan Railway Meeting

कोकण रेल्वे गोव्यामध्ये अधिक परिवर्तनकारी विस्तार करणार आणि प्रवासी-केंद्रित उपक्रम आणि प्रकल्प राबवणार: कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांचे प्रतिपादन

पणजी: कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (केआरसीएल), गोव्यामधील रेल्वे कनेक्टिव्हिटी सुधारण्यात आणि प्रवाशांना प्रवासाचा अधिक चांगला अनुभव देण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे, असे कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांनी आज 16 डिसेंबर रोजी गोव्यात मडगाव येथे प्रसारमाध्यमांना संबोधित करताना सांगितले. कोकण रेल्वेची प्रमुख कामगिरी, सध्या सुरु असलेली कामे आणि भविष्यातील योजना यावर प्रकाश टाकताना झा यांनी महाराष्ट्र ते कर्नाटकपर्यंत पसरलेल्या 739 किलोमीटर लांबीच्या कोकण रेल्वे नेटवर्कमधील परिचालनाचा एक महत्त्वाचा विभाग म्हणून गोव्याचे महत्त्व अधोरेखित केले.

“गुंतागुंतीचा भूप्रदेश आणि अभियांत्रिकी आव्हानांसाठी ओळखला जाणारा गोवा विभाग हा भारतातील सर्वात उल्लेखनीय रेल्वे कॉरिडॉरपैकी एक असून, यात 91 बोगदे आणि जवळजवळ 1,900 पूल आहेत, तसेच या संपूर्ण मार्गाचे विद्युतीकरण झाले आहे. कठीण भौगोलिक परिस्थिती असूनही, कोकण रेल्वेने विश्वासार्ह आणि सुरक्षित परिचालन सुनिश्चित केले आहे. या मार्गावरील जवळजवळ 42 टक्के ट्रॅक बोगद्यांमधून अथवा खोल कटिंगमधून जात असून, ही कोकण रेल्वे विभागाची तांत्रिक लवचिकता आणि कौशल्याचे प्रतिबिंब आहे,” असे ते म्हणाले.

वाढत्या मागणीला प्रतिसाद म्हणून, प्रवासी सेवांमध्ये साततत्याने केल्या जात असलेल्या विस्ताराबद्दल बोलताना ते म्हणाले की, 2024-25 मध्ये, कोकण रेल्वेने दररोज सरासरी 55 प्रवासी आणि 17 मालवाहू गाड्या चालवल्या, तसेच हंगामी आणि सणासुदीच्या काळात गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी, विशेषतः गणपती आणि उन्हाळी सुट्ट्यांच्या काळात मोठ्या संख्येने विशेष गाड्या तैनात केल्या. “आगामी 2025-26 च्या वेळापत्रकात प्रवासाच्या वाढत्या गरजा पूर्ण करण्यासाठी अधिक विशेष सेवांची योजना आहे,” असे ते म्हणाले.

मडगावला मुंबई आणि मंगळुरुशी जोडणारी वंदे भारत एक्स्प्रेस रेल्वेसेवा सुरु केल्याने तसेच बांद्रा टर्मिनस आणि सिकंदराबादसाठी नवीन एक्स्प्रेस गाड्या आणि कानाकोनासारख्या स्थानकांवर अतिरिक्त थांबे सुरु केल्याने गोव्याला लांब पल्ल्याची सुधारित, उत्कृष्ट दर्जाची संपर्कयंत्रणा लाभली आहे असे झा यांनी सांगितले. या सेवांमुळे प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी झाला आहे आणि प्रवाशांसाठी सोयीसुविधांमध्ये सुधारणा झाली आहे, असे ते म्हणाले.

कोकण रेल्वे महामंडळाने गेल्या तीन वर्षांमध्ये संपूर्ण गोव्यासाठी प्रवासी सेवा सुविधा अद्ययावत करण्याच्या उद्देशाने मोठी गुंतवणूक केली आहे. मडगाव आणि थिवीम येथे एक्झिक्युटिव्ह लाउंज, मडगाव येथे अत्याधुनिक रेल्वे आर्केड, मनोरंजन आणि निरामयता कक्ष, तसेच करमाळी येथील लेक व्ह्यू रेस्टोरंट सारख्या प्रवासी केंद्रित सुविधांनी स्थानकांचा कायापालट झाला आहे. पर्यटन मंत्रालयाच्या केंद्रीय वित्तीय सहाय्य योजनेअंतर्गत मडगाव, थिवीम आणि करमाळी येथे 25 कोटी रुपयांचे प्रकल्प पूर्ण होऊन कार्यान्वित करण्यात आले आहेत, यामध्ये वाहनतळ उभारणी, उपहार गृह, प्रतीक्षा गृह, प्रकाश व्यवस्था, बाह्य विकास कामे आणि करंबोळी तलावासमोर पक्षी निरीक्षण डेक यांचा समावेश आहे, असे व्यवस्थापकीय संचालकांनी सांगितले.

याशिवाय डीजी लॉकर, महिलांसाठी खास पिंक बबल स्पेस, युपीआय वर आधारित क्यू आर कोड द्वारे तिकीट आरक्षण, एक स्थानक, एक उत्पादन विक्री केंद्र, स्थानिक उत्पादने आणि हस्तकला वस्तूंची विक्री, यासर्व प्रवासी केंद्रित उपक्रमांमुळे प्रवाशांना अधिक चांगला अनुभव मिळत आहे, असे ते म्हणाले. करमाळी स्थानकावर देखील एक्झिक्युटिव्ह आणि ट्रान्झिट लाउंजची निर्मिती करणे तसेच मडगाव येथे फूड कोर्ट सुविधांचा विस्तार करणे तसेच येत्या तीन वर्षात 11.6 कोटी रुपयांच्या स्थानक विकास कामांना गती देण्याची योजना कोकण रेल्वे आखत असल्याचे झा यांनी सांगितले. प्रवासी सेवांच्या व्यतिरिक्त कोकण रेल्वे गोव्याच्या दळणवळण परिसंस्थेचा विस्तार करण्यासाठी वर्णा येथे आधुनिक गोदाम आणि कंटेनर हाताळणी सुविधा तसेच बल्ली येथे मल्टीमॉडल लॉजिस्टिक्स पार्कची उभारणी करत आहे. यामुळे मालवाहतुक अधिक कार्यक्षम होईल आणि संपर्कव्यवस्थेत सुधारणा होईल, असे झा म्हणाले. परिचालन आणि देखरेख या क्षेत्रात कोकण रेल्वे विस्तार करत असून त्यासह आपल्या अभियांत्रिकी क्षमता वृद्धी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सहयोग यामुळे देशभरातील मोठ्या पायाभूत प्रकल्पांमधील एक विश्वसनीय भागीदार म्हणून कोकण रेल्वेने आपले स्थान निर्माण केले आहे.