पहिला सामना देवाला अर्पण करण्याची परंपरा अखेर मोडीत काढत मुंबई इंडियन्सने आपल्या घराच्या मैदानावर पहिल्या सामन्यात दमदार विजय मिळवला.
प्रेक्षकांनी खचाखच भरलेल्या वानखेडेवर अखेर मुंबई इंडियन्सने पहिल्या सामन्यात विजयश्री मिळवत २०१२ नंतर पहिला सामना गमावण्याची मालिका मोडली. कोलकाता नाईट रायडर्सच्या २२१ धावांचे आव्हान १९.१ षटकांत सहा गडी राखत आरामात पार केल्या. भारताचा माजी टी-२० विजेता कर्णधार व मुंबई इंडियन्सला सर्व पाच ट्रॉफी जिंकून देणाऱ्या रोहित शर्माने ७८ धावांची केलेली वादळी खेळी सामन्याचे वैशिष्ट्य ठरले.
मुंबई (भास्कर गाणेकर): नाणेफेकीचा कौल आपल्या बाजूने लावत हार्दिकने केकेआरला फलंदाजीस पाचारण केले. केकेआरचे नेतृत्व करणाऱ्या अजिंक्य राहाणेने आपल्या आवडत्या घरच्या मैदानावर तुफान फटकेबाजीचे प्रदर्शन करीत मुंबईच्या गोलंदाजांना पेचात टाकले. फिन एलेनसोबत अर्धशतकीय सलामी देत संघाला मोठ्या धावसंख्येकडे आगेकूच केले.
दरम्यान, २० दिवसांपूर्वी भारताला टी-२० विश्वचषक जिंकून देणाऱ्या सूर्यकुमार यादवला मुंबई इंडियन्सच्या पहिल्या सामन्यात, तेही आपल्या घरच्या वानखेडे स्टेडियमवर अंतिम ११ मध्ये स्थान मिळाले नाही. आयपीएलमध्ये ‘इम्पॅक्ट प्लेयर’ नियम असल्यामुळे मुंबई इंडियन्स संघाने हा निर्णय घेतला.
मुंबई इंडियन्ससाठी पदार्पण करणाऱ्या शार्दूल ठाकूरच्या हाती पावरप्लेचे शेवटचे षटक हार्दिकने सोपवले आणि शार्दूलने आपल्या कर्णधाराच्या विश्वासाला साजेशी गोलंदाजी करीत मुंबईला पहिला गडी बाद करून दिला. दुसरीकडे राहाणेने केवळ २७ चेंडूंत आपले अर्धशतक झळकावत १० षटकांच्या अखेरीस संघाला १२० धावा करून मजबूत पकड मिळवली.
तिसऱ्या क्रमांकावर बढती मिळालेल्या कॅमरुन ग्रीनला म्हणावी तशी खेळी करता आली नाही. शार्दुलच्याच गोलंदाजीवर मोठा फटका मारण्याच्या नादात डीप कव्हरला झेल देत माघारी परतला. राहाणेला त्याचा मुंबईकर साथीदार अंगक्रिश रघुवंशीने साथ देत चौथ्या गड्यासाठी ३८ धावांची भागीदारी केली. शार्दूलने आपल्या तिसऱ्या षटकात राहाणेने पांड्याकरवी झेलबाद करीत तिसरा गडी टिपला. राहाणेने ४० चेंडूंत पाच षटकार व तीन चौकार ठोकत ६७ धावांची खेळी केली. रघुवंशीनेही २८ चेंडूंत आपले अर्धशतक लगावल्यानंतर पुढच्याच चेंडूवर फटका मारण्याच्या नादात हार्दिकच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्याने आपल्या खेळीमध्ये दोन चौकार व सहा षटकार खेचले. रिंकू सिंगने २१ चेंडूंत चार चौकारांच्या साहाय्याने नाबाद ३३ धावांची खेळी करत केकेआरला २२० धावांचा पल्ला गाठून दिली. मुंबई इंडियन्सविरुद्ध वानखेडेवर त्यांची ही सर्वोत्कृष्ठ खेळी ठरली.
२२१ धावांचा मोठा पाठलाग करण्यास उतरलेल्या मुंबई इंडियन्सने धडाकेबाज सुरुवात करीत केकेआरच्या गोलंदाजांची पिसे काढण्यास सुरुवात केली. पहिल्या दोन षटकांत सावध फलंदाजी केल्यानंतर पावरप्लेच्या उरलेल्या चार षटकांत तब्बल ६५ धावा कुटत ८० धावांपर्यंत मजल मारली. मुंबईला पाच जेतेपद मिळवून देणाऱ्या रोहित शर्माने तुफान फटकेबाजी करीत केवळ २३ चेंडूंत आपले अर्धशतक झळकावत हाऊसफुल वानखेडेच्या प्रेक्षकांना जणू पर्वणीच दिली. त्याचे आयपीएलमधील हे वेगवान अर्धशतक ठरले.
सलामीवीर रायन रिकेलटनने रोहितला उत्तम साथ देत संघाचे २५ चेंडूंत अर्धशतक व ४९ चेंडूंत शतक लगावत धावांचा पाठलाग सोपा केला. रिकेलटनने २४ चेंडूंत आपले अर्धशतक झळकावले. रोहित-रिकेलटन जोडीने षटकार-चौकारांची तुफान आतिषबाजी करीत पहिल्या गड्यासाठी १४८ धावांची भागीदारी करून देत सामना आपल्या बाजूने झुकवला. मुंबई इंडियन्सच्या इतिहासातील ही तिसरी सर्वोत्तम भागीदारी ठरली. शतकाकडे आगेकूच करणाऱ्या रोहित शर्माचा अडथळा अखेर वैभव अरोराने १२व्या षटकात दूर केला. अनुकूल रॉयने एक अप्रतिम झेल टिपत अखेर रोहितच्या डावाचा अंत केला. त्याने बाद होण्यापूर्वी केवळ ३८ चेंडूंत अर्धा डझनभर चौकार व तितकेच षटकार ठोकत ७८ धावांची वादळी खेळी केली.
इम्पॅक्ट प्लेयर आलेल्या सूर्याला फारशी चमक दाखवता आली नाही. आठ चेंडूंत तीन चौकारांसह १६ धावा करत तो डीप मिड विकेटला झेलबाद झाला. रिकेलटन चांगल्या रंगात दिसत असताना एक चोरटी धाव घेण्याच्या नादात धावबाद झाला. त्याने ४३ चेंडूंचा सामना करीत चार चौकार व आठ उत्तुंग षटकार ठोकत ८१ धावांची खेळी केली.
तीन गडी तंबूत परतल्यानंतर हार्दिक व तिलक वर्माने ३१ धावांची भागीदारी रचत सामन्यावर शिक्कामोर्तब केला. तिलक २० धावा करून बाद झाल्यानंतर नमन धीरने २०व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर चौकार खेचत धावांचा पाठलाग करत सर्वात मोठा विजय नोंदवला.
मुंबईकर चमकले
वानखेवर आज झालेल्या सामन्यात दोन्ही संघांकडून मुंबई खेळाडू चमकले. पहिल्या डावात केकेआरकडून अजिंक्य राहाणेने ६७ तर अंगक्रिश रघुवंशीने ५१ धावांची खेळी केली. मुंबई इंडियन्ससाठी शार्दूल ठाकूरने चार षटकांत ३९ धावा खर्च करत सर्वाधिक तीन गडी टिपले. धावांचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सकडून ‘मुंबईचा राजा’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या रोहित शर्माने केवळ ३८ चेंडूंत ७८ धावांची वादळी खेळी करीत संघाच्या विजयाचा पाय भक्कम केला.
