टी-२० विश्वचषकात सर्वात जलद शतक ठोकत दक्षिण आफ्रिकेच्या १६९ धावांचा पाठलाग किवींनी तब्बल ४३ चेंडू राखत ऐटीत पार करत रविवारी अहमदाबाद येथे होणाऱ्या अंतिम फेरीत धडक मारली.
भास्कर गाणेकर: विश्वचषकासारख्या मोठ्या स्पर्धेत बाद फेरीत तगड्या संघांत एकतर्फी विजय खूपच कमी पहिले गेलेत. पण न्यूझीलंडने ज्या प्रकारे दक्षिण आफ्रिकेच्या सर्वच गोलंदाजांची केलेली धुलाई स्पर्धेच्या इतिहासात नोंदली जाईल. १७० धावा पार करण्यास मैदानात उतरलेल्या किवी फलंदाजांना केवळ ७७ चेंडूच पुरेसे झाले. फिन एलेन व टीम सायफर्ट यांच्या घातकी फलंदाजीने संपूर्ण स्पर्धेत अपराजित राहिलेल्या दक्षिण आफ्रिकेला एकतर्फी पराभूत करत टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. केवळ ३३ चेंडूंचा सामना करत फिन एलेनने शतकीय व वादळी खेळी करीत ख्रिस गेलच्या ४७ चेंडूंतील वेगवान शतकाचा रेकॉर्ड मोडीतही काढला.
अगदी पहिल्याच चेंडूपासून धुलाई करण्यास सुरुवात केलेल्या न्यूझीलंड सलामीवीरांनी केवळ २५ चेंडूंत संघाचे अर्धशतक झळकावले. पावरप्लेच्या शेवटच्या षटकतात कॉर्बिन बॉशला २२ धावा ठोकत ८४ धावा धावफलकावर लगावला. टीम सायफर्टने २८ चेंडूंचा सामना करीत आपले अर्धशतक पूर्ण केले तर आठव्याच षटकात संघाला शंभरी गाठून दिली. या टी-२० विश्वचषकातील सर्वात विध्वंसक व सफल जोडी ठरलेल्या एलेन-सायफर्टने केवळ ५५ चेंडूंत ११७ धावांची सलामी भागीदारी रचून संघाचा विजय सुनिश्चित केला. सायफर्ट बाद झाल्यानंतर एलेनने सहाव्या गियरमध्ये आपली गाडी पळवत दहा चौकार व आठ षटकार खेचत केवळ ३३ चेंडूंत आपले शतक पूर्ण करत संघाला विजयी केले. मुख्य म्हणजे न्यूझीलंडने खेळलेल्या १३ षटकांत १० षटकांत दहाहून अधिक धावा ठोकत आपले इरादे स्पष्ट केले.
तत्त्वपूर्वी नाणेफेक जिंकत धावांचा पाठलाग करण्याचा निर्णय न्यूझीलंडला चांगलाच पचला. कोल मॅककोंचीने दुसऱ्याच षटकात क्विंटन डी-कॉक (१०) व रायन रिकलटन (०) यांना सलग बाद करत दक्षिण आफ्रिकेचे कंबरडे मोडीत काढले. एडन मार्कर्म व डेवाल्ड ब्रेव्हिस काहीसे सेट झालेलं दिसत असताना राहीन रवींद्रने मार्कर्मला १८ धावांवर माघारी धाडत आणखी एक धक्का दिला. मधल्या फळीतील फलंदाजांचे अपयश आफ्रिकेच्या माथी पडले आणि त्यांचा निम्मा संघ ७७ धावांत तंबूत परतला. सहाव्या गड्यासाठी ट्रिस्टन स्टब्स (२९) व मार्को यांसन (५५) यांच्या ७३ धावांच्या भागीदारीच्या जोरावर सन्मानजनक धावसंख्या उभारली.
न्यूझीलंडने केलेल्या या अभूतपूर्व पाठलागाचा भारत व इंग्लंड यांना सबक घ्यावा लागेल हे नक्की. वानखेडे येथे रंगण्याऱ्या दुसऱ्या सेमी फायनलमध्ये यजमान भारत व इंग्लंड यांच्यातील विजयी संघ न्यूझीलंडविरुद्ध रविवारी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर लाखो चाहत्यांच्या साक्षीने अंतिम सामना खेळेल.
