संजू सॅमसनची अफलातून इंनिंग, भारत सेमी फायनलमध्ये

Sanju Samsan

१९५ धावांचा पाठलाग करताना संजू सॅमसनच्या नाबाद ९७ धावांच्या जोरावर भारताने ‘करो वा मरो’ सामन्यात दोन वेळेच्या टी-२० चॅम्पियन्स वेस्ट इंडिजला चारीमुंड्या चित करीत सेमी फायनलचे आपले तिकीट पक्के केले.

कोलकाता: ऐन विश्वचषकाच्या तोंडावर न्यूझीलंड विरुद्धच्या टी-२० मालिकेत खराब कामगिरीमुळे ज्या खेळाडूला संघात स्थान दिल्याबद्दल टीकेची झोड सोसावी लागली होती, ज्याला अंतिम ११ मध्ये आपले स्थान मिळवले जिकरीचे होत होते त्याने मोक्याच्या क्षणी भारताला तगड्या वेस्ट इंडिजला विक्रमी धावांचा पाठलाग करत पराभूत करत भारताला उपांत्य फेरीत स्थान मिळवून दिले. १९५ धावांचा पाठलाग करताना एकहाती किल्ला लढवत त्याने डझनभर चौकार व चार षटकार ठोकत ५० चेंडूंत ९७ धावांची नाबाद अद्भुत खेळी करत एक अश्यक्य असा पराक्रम केला.

इंग्लंडविरुद्ध उपांत्य फेरीत स्थान पक्के करण्यासाठी दोन्ही संघांना विजय आवश्यक होता. सुपर ८ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या मानहानीकारक पराभवामुळे भारताचे स्पर्धेतील स्थान धोक्यात होते. जिंकणारा संघ आपले स्थान ५ मार्चला होणाऱ्या वानखेडेवरील सेमी फायनलमध्ये स्थान पक्के करणार होता. अश्यातच दबाव अर्थातच भारतावर होता. नाणेफेक जिंकून सूर्यकुमार यादवने वेस्ट इंडिजला फलंदाजीस आमंत्रित केले. त्यांच्या बिग हिटर्सनी धडाकेबाज इंनिंग्स खेळात १९५ धावांचा लक्ष भारतासमोर ठेवला. वेस्ट इंडिजसाठी जरी एकही खेळाडूने अर्धशतकीय खेळी केली नसली तरी सर्व फलंदाजांनी धडाकेबाज खेळी करत मोठी धावसंख्या उभारली.

भारताला कोणत्याही परिस्थितीत विजय आवश्यक होता. गतविजेत्या भारताला आपल्या चाहत्यांना आणखी एकदा ट्रॉफी उचलत खुश करण्यासाठीही या सामन्यात विजय आवश्यक होता. फलंदाजीचा भरणा असलेल्या भारताला म्हणावे तशी फलंदाजी आतापर्यंत करता आली नसली तरी सांघिक खेळ करून सामना जिंकायचा होता. अभिषेक शर्मा आणि ईशान किशन प्रत्येकी १० धावांवर पावरप्लेमध्ये परतल्यानंतर भारत सामना गमावतो कि काय असेच दिसत होते. पण सॅमसनने पहिल्यांदा सूर्यकुमारसोबत ५८ धावांची भागीदारी करत भारताला सामन्यात आणले. मागील विश्वचषकात भारत जरी विजयी ठरला असला तरी एकही सामना न खेळणाऱ्या संजू सॅमसनने मिळालेली जणू शेवटची संधी आपल्या बाजूने करत २६ चेंडूंत विश्वचषक स्पधेर्तील आपले पहिले अर्धशतक झळकावत आपणही मोठ्या सामान्यांचे खेळाडू आहोत हे दाखवून दिले. 

एक बाजूने खेळाडू बाद होत असताना संजूने आपली बाजू धरून ठेवली. त्याने मिळालेल्या प्रत्येक चेंडूंवर अगदी सावधपणे खेळ करीत भारताचा रनरेट आवश्यक असणाऱ्या रनरेटसोबत जुळत ठेवला. त्याने ज्या प्रकारे फलंदाजी केली त्यानुसार एक यादगार खेळी विश्वचषक स्पर्धेत ठरली. त्याच्या या यादगार खेळीच्या जोरावर भारताने शेवटच्या षटकात संजूने षटकार व चौकार ठोकत चार चेंडू राखत विजय मिळवला.