सूर्यदादाची खेळी, अमेरिकेवर भारी!

Suryakumar Yadav scores fifty vs USA

टी-२० विश्वचषकात भारताचा विजयाने प्रारंभ

मुंबई (भास्कर गाणेकर): ‘फील द थ्रिल’ थीमवर आधारित टी-२० विश्वचषक स्पर्धेची चांगलीच सुरुवात करीत भारताने वानखेडेवर झालेल्या सामन्यात युनाइटेड स्टेट्स ऑफ अमेरिका अर्थात यूएसएचा २९ धावांनी पराभव करीत जेतेपद आपल्याकडेच ठेवण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले. पहिली फलंदाजी करताना भारताने केलेल्या १६१ धावांच्या प्रतिउत्तरादाखल यूएसएने १३२ धावांपर्यंतच मजल मारली.

सिराजला थेट संधी

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सराव सामन्यात जखमी झालेल्या हर्षित राणाच्या जागी संधी मिळालेल्या मोहम्मद सिराजला विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्यात संधी मिळाली. भारताचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमरा आजारी असल्यामुळे त्याच्या जागी अंतिम अकरामध्ये सिराजची थेट वर्णी लागली. अर्शदिपच्या जोडीला वेगवान गोलंदाजीची धुरा या सामन्यात सिराजने पार पडली.

पावरप्लेमध्ये भारताची दयनीय अवस्था

मागील दोन वर्षांपासून टी-२० क्रिकेटमध्ये दबदबा असलेल्या भारतीय संघाला आपल्या पहिल्याच सामन्यात अमेरिका सारख्या दुबळ्या संघाविरुद्ध तोंडात बोट घातल्यासाखे खेळावे लागले. एखाद्या क्लब क्रिकेट संघाप्रमाणे पावरप्लेमध्ये खेळ झाला. नाणेफेक जिंकून यूएसएने भारताला फलंदाजीस आमंत्रित केल्यानंतर दुसऱ्याच षटकात अभिषेक शर्मा भोपळाही न फोडता माघारी परतला. ईशान किशन व तिलक वर्माने काही प्रमाणात संघाला सावरण्याचा प्रयत्न सुरु केला असतानाच पावरप्लेच्या शेवटच्या षटकात शाडली वॅन शालवीकने भारताची आघाडी भेदत एकामागून एक तीन हादरे देत भारताची अवस्था चार बाद ४६ अशी दयनीय केली. अगोदर किशनला (२०), मग सेट दिसत असलेल्या तिलकला (२५) आणि लगेचच शिवम दुबेला शून्यावर माघारी धाडत भारताची केविलवाणी अवस्था केली.

डोनाल्ड ट्रम्प यांनी ५० टक्क्यांहून १८ टक्क्यांपर्यंत भारताचे टॅरिफ कमी केल्याने काहीशी ‘रिलॅक्स’ मोडमध्ये टीम इंडिया गेलेली दिसली. पावरप्लेमध्ये चार गडी गमावल्यानंतर मधल्या षटकांतही भारताला वानखेडेसारख्या फलंदाजीस पूरक खेळपट्टीवर धावा करायला अवघड गेल्या. पुढील चार षटकांत केवळ ११ धावा देत अमेरिकन संघाने भारताला चांगलेच जखडून ठेवले. एकामागून एक विकेट्स जात असताना भारताचा कर्णधार एक बाजूने किल्ला लढवत होता. १२व्या षटकात अक्षर पटेल माघारी परल्यानंतर आलेला हार्दिक पांड्या आपल्या मुंबई इंडियन्सच्या घरच्या मैदानावर फेल ठरला. ७७ धावांवर भारताने सहावा गडी गमावला, जी असोसिएट संघाविरुद्ध भारताची सर्वात खराब कामगिरी होती.

सूर्यादादाने एका बाजूने किल्ला लढवत ३६ चेंडूंत आपले अर्धशतक पूर्ण केल्यानंतर इंनिंग पाचव्या गियरमध्ये एक्सेलरेट केली. त्याने त्याचा एकेकाळीचा सहकारी सौरभ नेत्रावळकरला चांगलेच चोपून काढत भारताला १६० धावांचा पल्ला गाठून दिला. सूर्याने ४९ चेंडूंत दहा चौकार व चार दमदार षटकार खेचत ८४ धावांची नाबाद कप्तानी खेळी केली.

दोन्ही सराव सामन्यांत दोनशेहून अधिक धावा केलेल्या यूएसएने गोलंदाजीत कमाल दाखवल्यानंतर फलंदाजांनी केलेल्या सुमार कामगिरीचा फटका त्यांना बसला. चौथ्याच षटकात तीन गादी माघारी परतल्यानंतर भारताच्या अनुभवी गोलंदाजांसमोर यूएसएचा निभाव लागणार नाही हे स्पष्ट होते. त्यातल्यात्यात मधल्या फळीतील फलंदाजांनी केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर काही प्रमाणात भारताच्या गोलंदाजीचा सामना करीत शेवटच्या षटकापर्यंत प्रेक्षकांना मनोरंजित केले.

पहिल्या तीन फलंदाजांना दुहेरी आकडाही न गाठून देणाऱ्या भारतीय गोलंदाजांची नंतर मात्र दमछाक झाली. चौथ्या गड्यासाठी मिलिंद कुमार व संजय कृष्णामूर्थी यांनी ५२ चेंडूंत ५८ धावांची भागीदारी केली. मिलिंद कुमारला वरूनने चकवत भागीदारी मोडली. किशनने यष्ट्यांच्यामध्ये चलाखी दाखवत हा पराक्रम केला. काही अंतरानेच संजय कृष्णामूर्थीही अक्षरच्या गोलंदाजीवर बाद होत सामना जणू भारताच्या खिशात घातला. अक्षराने पुढच्याच चेंडूंवर हरमीत सिंगला बाद करीत आणखी एक हादरा दिला. गोलंदाजी करताना जखमी झालेल्या शुभम रांजणेने थोडासा प्रतिकार करत धावसंख्या वाढीवर भर दिला. त्याने २२ चेंडूंत दोन चौकार व तीन षटकारांसह ३७ धावा केल्या. परंतु त्याच्या या धावा संघासाठी पुरेशा ठरल्या नाही आणि पहिल्याच सामन्यात पराभव स्वीकारावा लागला.

संक्षिप्त धावफलक

भारत १६१/९ (२०) – सूर्यकुमार यादव ८४* (४९), तिलक वर्मा २५ (१६), शाडली वॅन शालवीक ४-२५

यूएसए १३२/८ (२०), शुभम रांजणे ३७ (२२), संजय कृष्णामूर्थी ३७ (३१), मोहम्मद सिराज ३-२९

भारत २९ धावांनी विजयी 

सामनावीर – सूर्यकुमार यादव