मुंबई (भास्कर गाणेकर): वांद्रे-कुर्ला संकुलातील एमसीए मैदानावर पार पडलेला मुंबई आणि दिल्ली यांच्यातील रणजी करंडक एलिट ‘डी’ गटातील सामना अनिर्णीत राहिला. मात्र, पहिल्या डावात घेतलेल्या महत्त्वपूर्ण आघाडीच्या जोरावर मुंबईने या सामन्यातून महत्त्वाचे गुण वसूल केले आहेत. मुंबईचा कर्णधार सिद्धेश लाड याने हंगामातील आपले पाचवे शतक झळकावत संघाला सुस्थितीत नेले, तर दिल्लीकडून आयुष डोसजा आणि सनत सांगवान यांनी झुंजार फलंदाजी केली.
दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात २२१ धावा केल्या. दिल्लीकडून सलामीवीर सनत सांगवान याने एकाकी झुंज देत ११८ धावांचे शानदार शतक झळकावले. मात्र, मुंबईच्या मोहित अवस्थीच्या भेदक मार्यासमोर दिल्लीची फलंदाजी गडगडली. अवस्थीने ६२ धावांत ५ बळी टिपत दिल्लीला रोखण्यात मोलाची भूमिका बजावली.
उत्तरादाखल मुंबईने आपल्या पहिल्या डावात ३१७ धावा करून ९६ धावांची महत्त्वपूर्ण आघाडी घेतली. मुंबईकडून कर्णधार सिद्धेश लाडने पुन्हा एकदा जबाबदारीने खेळत १०३ धावांची शतकी खेळी केली. हे त्याचे या हंगामातील पाचवे शतक ठरले. सुवेद पारकर (५८) आणि मुशीर खान (५७) यांनी त्याला चांगली साथ दिली. दिल्लीकडून दिविज मेहराने उत्कृष्ट गोलंदाजी करत ६४ धावांत ५ गडी बाद केले.
दुसऱ्या डावात ९६ धावांनी पिछाडीवर असलेल्या दिल्लीने दमदार पुनरागमन केले. कर्णधार आयुष डोसजा याने मैदानावर नांगर टाकत १५९ धावांची मॅराथॉन खेळी केली. त्याला वैभव कांडपाल (६१) आणि सनत सांगवान (२४) यांची साथ मिळाली. दिल्लीने दुसऱ्या डावात ६ बाद ४०७ धावांवर मजल मारली असताना सामना अनिर्णीत घोषित करण्यात आला.
सामना अनिर्णीत राहिला असला तरी, पहिल्या डावातील आघाडीच्या आधारावर मुंबईला ३ गुण मिळाले, तर दिल्लीला १ गुणावर समाधान मानावे लागले. या हंगामात मुंबईच्या फलंदाजांनी आणि गोलंदाजांनी सातत्यपूर्ण कामगिरी केल्याचे या सामन्यातून पुन्हा एकदा सिद्ध झाले.
साखळी सामान्यांची सांगता झाल्यानंतर बाद फेरीत मुंबईचा सामना उपांत्यपूर्व फेरीत तगड्या कर्नाटक विरुद्ध होईल.
