हरारे/बुलावायो: १९ वर्षांखालील विश्वचषकाच्या सुपर सिक्स फेरीत आशियाई संघांनी आपली वर्चस्व गाजवले आहे. मंगळवारी झालेल्या सामन्यांमध्ये भारताने यजमान झिम्बाब्वेचा २०४ धावांनी धुव्वा उडवला, तर दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानने न्यूझीलंडवर ८ गडी राखून सहज विजय मिळवला.
विहान मल्होत्राचे दमदार शतक बुलावायो येथील क्वीन्स स्पोर्ट्स क्लबवर झालेल्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत ८ बाद ३५२ धावांचा डोंगर उभा केला. भारताकडून उपकर्णधार विहान मल्होत्राने १०७ चेंडूत नाबाद १०९ धावांची शतकी खेळी केली. त्याला वैभव सूर्यवंशी (३० चेंडूत ५२) आणि अभिज्ञान कुंडू (६२ चेंडूत ६१) यांनी सुरेख साथ दिली. शेवटच्या षटकांमध्ये खिलेन पटेलने अवघ्या १२ चेंडूत ३० धावा कुटून भारताची धावसंख्या साडेतीनशेच्या पार नेली.
विशाल लक्षाचा पाठलाग करताना झिम्बाब्वेचा संघ ३७.४ षटकांत केवळ १४८ धावांत गारद झाला. भारताचा कर्णधार आयुष म्हात्रेने १४ धावांत ३ बळी घेतले, तर आर.एस. अंब्रीश आणि इतर गोलंदाजांनी त्याला योग्य साथ दिली. या विजयासह भारताने उपांत्य फेरीच्या दिशेने भक्कम पाऊल टाकले आहे.
पाकिस्तानचा न्यूझीलंडवर एकतर्फी विजय दुसरीकडे, हरारे स्पोर्ट्स क्लबवर झालेल्या सामन्यात पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाजांनी न्यूझीलंडच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. अब्दुल सुभान (११ धावांत ४ बळी) आणि अली रजा (३६ धावांत ३ बळी) यांच्या भेदक वाऱ्यासमोर न्यूझीलंडचा संघ २८.३ षटकांत अवघ्या ११० धावांत सर्वबाद झाला. न्यूझीलंडकडून ह्युगो बोगने सर्वाधिक ३९ धावा केल्या.
विजयासाठीचे सोपे लक्ष्य पाकिस्तानने १७.१ षटकांतच पूर्ण केले. समीर मिन्हासने ५९ चेंडूत नाबाद ७६ धावांची आक्रमक खेळी करत संघाला ८ गडी राखून विजय मिळवून दिला.
