इंदूर: डॅरिल मिशेल (१३७) आणि ग्लेन फिलिप्स (१०६) यांच्या तडाखेबंद शतकांनंतर गोलंदाजांनी केलेल्या शिस्तबद्ध कामगिरीच्या जोरावर न्यूझीलंडने तिसऱ्या आणि निर्णायक एकदिवसीय सामन्यात भारताचा ४१ धावांनी पराभव केला. या विजयासह किवी संघाने ३ सामन्यांची मालिका २-१ अशी खिशात घालत भारतीय भूमीवर तब्बल ३८ वर्षांनंतर द्विपक्षीय एकदिवसीय मालिका जिंकण्याचा इतिहास रचला. भारताचा ‘चेस मास्टर’ विराट कोहलीने झुंजार शतक (१२४) ठोकले, पण त्याला इतर फलंदाजांची म्हणावी तशी साथ न मिळाल्याने भारताचा डाव २९६ धावांत आटोपला.
नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीस आलेल्या न्यूझीलंडची सुरुवात खराब झाली. अवघ्या ५८ धावांत ३ गडी गमावल्यानंतर डॅरिल मिशेल आणि ग्लेन फिलिप्स यांनी डावाची सूत्रे हाती घेतली. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी २१९ धावांची विक्रमी भागीदारी रचत भारताला बॅकफूटवर ढकलले. मिशेलने १३१ चेंडूंत १३७ धावांची खेळी केली, तर फिलिप्सने ८८ चेंडूंत १०६ धावा कुटल्या. या दोघांच्या फटकेबाजीमुळे न्यूझीलंडने निर्धारित ५० षटकांत ८ बाद ३३७ अशी मजल मारली. भारताकडून हर्षित राणा आणि अर्शदीप सिंग यांनी प्रत्येकी ३ बळी घेतले.
३३८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरुवात अडखळती झाली. कर्णधार रोहित शर्मा (११) आणि शुभमन गिल (२३) स्वस्तात माघारी परतले. पाठोपाठ श्रेयस अय्यर आणि केएल राहुलही अपयशी ठरल्याने भारताची अवस्था ४ बाद ७१ अशी बिकट झाली होती.
अशा कठीण परिस्थितीत विराट कोहलीने पुन्हा एकदा आपल्या क्लासचे दर्शन घडवले. त्याने एक बाजू लावून धरत १०८ चेंडूंत १२४ धावांची शानदार खेळी केली. हे त्याचे एकदिवसीय कारकीर्दीतील ५४ वे शतक ठरले. नितीश रेड्डी (५३) आणि हर्षित राणा (५२) यांनी अर्धशतके झळकावून विराटला चांगली साथ दिली, पण वाढत्या धावगतीचे दडपण आणि नियमित अंतराने पडत गेलेल्या विकेट्समुळे भारताला पराभवाचा सामना करावा लागला.
इंदूरचे होळकर स्टेडियम हे भारतासाठी अभेद्य किल्ला मानले जात होते. या मैदानावर भारताने यापूर्वीचे सर्व ७ एकदिवसीय सामने जिंकले होते. मात्र, न्यूझीलंडने या मैदानावरील भारताची विजयी घोडदौड रोखली.
