विजय हजारे ट्रॉफी: विदर्भाचे ऐतिहासिक विजेतेपद! अंतिम सामन्यात सौराष्ट्रवर ३८ धावांनी मात

Atharva Taide VHT

बेंगळुरू: अथर्व तायडेची शतकी खेळी आणि गोलंदाजांच्या शिस्तबद्ध कामगिरीच्या जोरावर विदर्भाने रविवारी विजय हजारे ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात सौराष्ट्रचा ३८ धावांनी पराभव करत इतिहास रचला. गेल्यावर्षी उपविजेतेपदावर समाधान मानणाऱ्या विदर्भाने यंदा मात्र कोणतीही चूक न करता पहिल्यांदाच या प्रतिष्ठित ट्रॉफीवर आपले नाव कोरले.

अंतिम सामन्यात सौराष्ट्रने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. विदर्भाकडून सलामीवीर अथर्व तायडेने दमदार फलंदाजी करत संघाला मोठ्या धावसंख्येकडे नेले. अथर्वने ११८ चेंडूत १५ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने १२८ धावांची शानदार शतकी खेळी केली. त्याला यश राठोडने (५४ धावा) योग्य साथ दिली. या दोघांच्या फटकेबाजीमुळे विदर्भाने निर्धारित ५० षटकांत ८ बाद ३१७ धावांचा डोंगर उभा केला. सौराष्ट्रकडून अंकुर पनवारने सर्वाधिक ४ बळी घेतले.

३१८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सौराष्ट्रची सुरुवात अडखळत झाली. त्यांचे आघाडीचे फलंदाज स्वस्तात माघारी परतले. मात्र, प्रेरक मंकड (८८ धावा) आणि चिराग जानी (६२ धावा) यांनी मधल्या फळीत चिवट लढा देत संघाच्या आशा जिवंत ठेवल्या होत्या. परंतु, ही जोडी फुटल्यानंतर सौराष्ट्रचा डाव गडगडला.

विदर्भाच्या गोलंदाजांनी मोक्याच्या क्षणी बळी मिळवत सामन्यावर पकड मिळवली. यश ठाकूर आणि नचिकेत भुते यांनी प्रत्येकी ३-३ गडी बाद करत सौराष्ट्रला ४८.५ षटकांत २७९ धावांत गुंडाळले.