बारामती: बारामती नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली. मात्र, या प्रक्रियेदरम्यान शहरात तीन वेगवेगळ्या ठिकाणी धक्कादायक प्रकार समोर आले आहेत. मूळ मतदार केंद्रावर पोहोचण्यापूर्वीच त्यांच्या नावावर दुसऱ्या कोणीतरी मतदान केल्याच्या घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. प्रशासनाच्या कारभारावर यामुळे प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
तीन ठिकाणी बोगस मतदानाचा संशय? शहरातील अहिल्यानगर देवी क्लब येथील मतदान केंद्रावर अमित दिलीप कुलथे हे मतदार मतदानासाठी गेले असता, त्यांचे मतदान आधीच झाल्याचे त्यांना सांगण्यात आले. या धक्कादायक प्रकारानंतर कुलथे यांनी आक्षेप घेतला. अखेर निवडणूक केंद्रातील कर्मचाऱ्यांनी त्यांची खातरजमा करून त्यांच्याकडून ‘टेंडर व्होट’ (Tender Vote) भरून घेतले आणि त्यांना मतदानाचा हक्क बजावू दिला. मात्र, त्यांच्या नावावर नक्की कोणी मतदान केले, याबाबत अधिकाऱ्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.
दुसरी घटना प्रभाग क्रमांक १३ मधील शाळा क्रमांक ७ येथे घडली. येथे गणेश कदम हे मतदार मतदानासाठी गेले असता, त्यांचेही मतदान आधीच पार पडल्याचे निदर्शनास आले. कदम यांनी यावर तीव्र संताप व्यक्त केला आहे.
तिसरा प्रकार ढवाणवस्ती मतदान केंद्रावर घडला. एक तरुण मतदार सायंकाळी साडेपाचच्या सुमारास केंद्रावर पोहोचला, परंतु तिथेही त्याच्या नावावर आधीच मतदान झाल्याचे आढळले. ओळखपत्रातील नावाच्या तफावतीमुळे तो तरुण दुसरे ओळखपत्र आणण्यासाठी गेला, परंतु परत आल्यावर त्याला केंद्रात प्रवेश नाकारण्यात आला. यामुळे आपल्याला मतदानापासून वंचित राहावे लागल्याचा आरोप या तरुणाने केला आहे.
अटीतटीची लढत बारामती नगरपरिषदेच्या ४१ जागांसाठी आणि नगराध्यक्षपदासाठी ही निवडणूक होत आहे. अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने ४१ पैकी ८ जागा आधीच बिनविरोध जिंकल्या आहेत. उर्वरित जागांसाठी राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना आणि बसपा यांच्यात अटीतटीची लढत पाहायला मिळाली. मात्र, या तीन घटनांमुळे मतदान प्रक्रियेतील पारदर्शकतेवर चर्चा सुरू झाली आहे.
