अक्षर पटेलला उपकर्णधार पदाची जबाबदारी दिली असून जितेश शर्माला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.
मुंबई (भास्कर गाणेकर): पन्नास दिवसांहून कमी अवधी असलेल्या बहुचर्चित टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी भारताचा संघ आज येथे जाहीर करण्यात आला. निवडसमिती अध्यक्ष अजित आगरकर व कर्णधार सूर्यकुमार यादव यांनी १५ जणांच्या जमूची घोषणा केला. मुख्य म्हणजे भारताचा एकदिवसीय व कसोटी कर्णधार शुभमन गिल याला संघातून डच्चू देण्यात आला आहे तर जितेश शर्मावरही संघ व्यवस्थापनाने विश्वास न दाखवता सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत सर्वाधिक धावा करत झारखंडला पहिल्यांदाच जेतेपद मिळवून देणाऱ्या ईशान किशनला संघात स्थान दिले गेले आहे.
गेल्या काही महिन्यांपासून टी-२० क्रिकेटमध्ये शुभमन गिलला अपेक्षित कामगिरी करता आली नव्हती. निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले की, “शुभमन गिल हा दर्जेदार खेळाडू आहे, पण सध्या तो धावांसाठी संघर्ष करत आहे. संघाच्या समतोल राखण्यासाठी आणि ‘कॉम्बिनेशन’च्या गरजेनुसार त्याला वगळण्याचा कठीण निर्णय घेण्यात आला.” गिलच्या अनुपस्थितीत संघाचे उपकर्णधारपद अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेलकडे सोपवण्यात आले आहे.
दुसरीकडे, यष्टिरक्षक फलंदाज ईशान किशनसाठी हे पुनरागमन अत्यंत खास ठरले आहे. नुकत्याच पार पडलेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये (SMAT) त्याने झारखंडचे नेतृत्व करताना संघाला ऐतिहासिक विजेतेपद मिळवून दिले. या स्पर्धेत ईशानने ५१७ धावा कुटल्या होत्या. त्याच्या या सातत्यपूर्ण कामगिरीची दखल घेत निवड समितीने त्याला संघात स्थान दिले आहे. त्याच्यासोबतच फिनिशर रिंकू सिंगचेही संघात पुनरागमन झाले आहे.
वर्ल्ड कपपूर्वी होणाऱ्या न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठीही हाच संघ कायम ठेवण्यात आला आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील या संघात अभिषेक शर्मा, संजू सॅमसन आणि टिळक वर्मा यांसारख्या आक्रमक फलंदाजांचा भरणा आहे. गोलंदाजीची मदार जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग आणि वरुण चक्रवर्ती यांच्यावर असेल.
टी-२० वर्ल्ड कप ही स्पर्धा ७ फेब्रुवारी २०२६ पासून भारत आणि श्रीलंकेत आयोजित केली जाणार आहे. भारताची पहिली लढत मुंबईत होणार आहे.
असा आहे भारतीय संघ:
सूर्यकुमार यादव (कर्णधार), अक्षर पटेल (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, रिंकू सिंग, जसप्रीत बुमरा, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, वरून चक्रवर्ती, वॉशिंग्टन सुंदर, ईशान किशन (यष्टीरक्षक)
