भास्कर गाणेकर: टी-२० क्रिकेटमध्ये अद्यावत पण अफलातून स्किल्स असलेला भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव सध्या आपल्या कारकिर्दीतील सर्वात कठीण काळातून जात आहे. मागील २५ सामन्यांत त्याला केवळ एकदाच पन्नाशी पार करण्यात यश आले आहे. एके काळचा आयसीसी क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या सूर्यकुमारला नक्की झाले काय? फेब्रुवारी महिन्यात होऊ घातलेल्या टी-२० विश्वचषकात जर त्याचा असाच फॉर्म राहिला तर भारत आपले जेतेपद कायम टिकवून ठेवेल का? ३५ वर्षीय सूर्या संघात तरी राहील का? असे अनेक प्रश्न त्याच्या सध्याच्या फॉर्मवरून क्रिकेट रसिकांना पडत आहेत.
२०२३ च्या विश्वचषक अंतिम फेरीनंतर एकदिवसीय संघातून बाहेर फेकल्या गेलेल्या सूर्यकुमारला २०२४ च्या टी-२० विश्वचषकात संधी देण्यात आली होती. त्याने घेतलेला डेव्हिड मिलरचा तो झेल जणू भारताला ट्रॉफी देऊनच गेला. रोहित शर्मा त्या विश्वचषकानंतर क्रिकेटच्या सर्वात छोट्या प्रकारातून निवृत्त होत सूर्यकुमारकडे संघाची कमान सोपवून गेला. हार्दिक पांड्यासारखा आयपीएल विजेता कर्णधार असतानाही संघ व्यवपस्थापनाने सूर्यकुमारवर विश्वास ठेवत नेतृत्वाची जबाबदारी दिली. सूर्यानेही ती लीलया पार पाडत संघाला एकामागून एक मालिका जिंकून दिल्या. त्याच्या वैयक्तिक खेळातही सुधारणा करीत खोऱ्याने धावा उपासल्या. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २०२३ च्या टी-२० मालिकेत एक शतक व एक अर्धशतक झळकावत त्याने मालिकेत बरोबरी साधून दिली.
मागील वर्षांपासून सूर्याच्या कामगिरीवर जणू ग्रहणच लागेल आहे. नोव्हेंबर २०२४ पासून सूर्याकुमार यादवने टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये २१ डावांत केवळ २२९ धावा केल्या असून त्याची सरासरी १३.२७ आणि स्ट्राइक रेट १२०.१० आहे. या कालावधीत त्याला एकही अर्धशतक करता आलेले नाही, तसेच फक्त दोन डाव २० चेंडूंहून अधिक काळ टिकले आहेत. सध्या चालू असलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या टी-२० मालिकेतही त्याला फारशी चमक दाखवता आलेली नाही. पहिल्या सामन्यात १२, दुसऱ्या सामन्यात ५ व आजची १२ धावांवर तो बाद झाला. मुख्य म्हणजे त्याने त्याच्या तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीस न येत चौथ्या क्रमांकावर येत फलंदाजीचा क्रमही गडबडवला.
सूर्यकुमारची कमी धावसंख्या चिंतेची बाब असली तरी, त्याच्या बाद होण्यामागे कोणताही ठरावीक पॅटर्न दिसून येत नाही. नोव्हेंबर २०२४ पासून तो वेगवान गोलंदाजांविरुद्ध १७ वेळा बाद झाला आहे—कधी सीमारेषेवर झेल देत, कधी विकेटकीपरकडे झेल देत, तर कधी चेंडू स्वतःच्या विकेटवर मारत—आणि फिरकीपटूंविरुद्ध तो फक्त एकदाच बाद झाला आहे. अशी कमी कामगिरी कोणत्याही फलंदाजाकडून होऊ शकते, विशेषतः टी-२०मध्ये उच्च जोखमीचा क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूकडून. सूर्यकुमार याआधीही अशा परिस्थितीतून गेला आहे आणि त्याने त्या खराब फॉर्ममधून यशस्वीपणे बाहेर पडले आहे, हे विसरणे सोपे आहे.
सूर्यकुमारने इंग्लंडविरुद्ध घरच्या मैदानावर पाच डावांत दोनदा शून्यावर बाद झाल्यानंतर आयपीएल २०२५मध्ये प्रवेश केला होता. मात्र त्याने नेत्रदीपक कामगिरी करत आपल्या फॉर्ममध्ये जबरदस्त बदल घडवला. १६ डावांत ६५.१८ च्या सरासरीने आणि १६७.९१ च्या स्ट्राइक रेटने त्याने ७१७ धावा केल्या. त्या वर्षी त्याने एमव्हीपी पुरस्कार जिंकला आणि मुंबई इंडियन्सला नॉकआउट फेरीत पोहोचवण्यात मोलाचा वाटा उचलला. आयपीएल आधी आणि नंतर मोठ्या धावा फारशा झालेल्या नाहीत, पण भारताच्या संघ व्यवस्थापनाला आशा आहे की आगामी मायदेशातील विश्वचषकाच्या तयारीत सूर्यकुमार पुन्हा एकदा आपली फॉर्म परत मिळवेल.
