लायन हार्ट ग्रुप नवी मुंबई व पनवेल महापालिकेच्या विविध योजनांना प्रारंभ
नवी मुंबई : लायन हार्ट ग्रुप नवी मुंबई व पनवेल महापालिकेच्या समाज विकास विभागामार्फत जागतिक दिव्यांग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. दिव्यांग बांधवांसाठी विविध नवीन योजनांचे उद्घाटन तसेच बहुविध उपक्रम आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन कलंबोली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रेक्षागृहात करण्यात आले.
या कार्यक्रमाचे उद्घाटन अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या हस्ते झाले. यावेळी दिव्यांग भवन फाऊंडेशनचे व्यवस्थापकीय संचालक बी.जी. पाटील, लायन हार्ट ग्रुप नवी मुंबईचे संस्थापक अध्यक्ष विरेंद्र म्हात्रे उर्फ गुरुभाई, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे, हाजी शहानवाज खान फाउंडेशनचे अध्यक्ष कोविड योद्धा हाजी शहानवाज खान, महापालिकेच्या उपायुक्त ममता शिंदे, सहाय्यक आयुक्त निवेदिता घार्गे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, तसेच दिव्यांग भवन फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी परेश गांधी उपस्थित होते. सामाजिक कार्यकर्ते, विविध संघटनांचे प्रतिनिधी, दिव्यांग बांधव, त्यांचे पालक आणि शहरातील नागरिक मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित राहिले. दिव्यांग बांधवांच्या सक्षमीकरणासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांविषयी मार्गदर्शन तसेच सांस्कृतिक सादरीकरणांनी कार्यक्रमाला रंगत आली.
पनवेल महापालिकेतर्फे दिव्यांग बांधवांसाठी उपलब्ध सुविधा, जेवण, आरोग्य शिबिर, नवीन योजना आणि समावेशकतेसाठी सुरू असलेल्या उपक्रमांची माहिती या कार्यक्रमातून देण्यात आली.
